मृगळ या माशाचा समावेश अस्थिमत्स्य वर्गाच्या सायप्रिनिफॉर्मिस गणाच्या सायप्रिनिडी कुलात केला जातो. त्याचे शास्त्रीय नाव सिऱ्हिनस मृगाला आहे. मृगाला हा शब्द बंगाली भाषेतील आहे. मृगळ हा गोड्या पाण्यातील मासा असून पंजाब, पश्चिम बंगाल, ओडिशा, आंध्र प्रदेश, कर्नाटक व महाराष्ट्र या राज्यांतील नद्या, तळी व पाझर तलाव यांमध्ये आढळतो.
मृगळाचा रंग रुपेरी असून पाठ काळसर करड्या रंगाची असते. पाठीवर तांबूस झाक असते. वक्षपर, अधरपर आणि गुदपर नारिंगी रंगाचे असून त्यांवर काळी झाक असते. शरीरावर चक्राभ (सायक्लॉइड) खवले असून काही वेळा परांवर एक किंवा अधिक काटे असतात. मृगळ मासा रोहू माशासारखाच दिसतो; परंतु मृगळाचे मुख जास्त रुंद असते. मृगळ मासा मुख्यत: पाणवनस्पती, शैवाल आणि सूक्ष्मजीव यांवर जगतो. तो सु. १ मी.पर्यंत लांब वाढू शकतो.
मृगळ माशाचे संवर्धन दक्षिण भारतातील गोदावरी, कृष्णा, कोयना, वारणा इ. नद्यांतील वाहते पाणी अडवून तळ्यांमध्ये करतात. अशा तळ्यांत प्रजननक्षम नर आणि माद्या सोडतात. प्रजननाचा हंगाम जुलै–सप्टेंबर असतो. सर्वसाधारणपणे दोन किग्रॅ. वजन असलेल्या मृगळाच्या मादीत सु. दोन लाख अंडी असतात; परंतु ही सर्व अंडी पाण्यात सोडली जातात किंवा फलित होतात, असे नाही. मादीने सोडलेल्या व फलित झालेल्या अंड्यांतून १८–२० तासांनी लहानलहान पिले बाहेर पडतात. ही पिले मत्स्यतळ्यात सोडली जातात व तेथे त्यांचे संवर्धन केले जाते. या माशांना तीळ व भुईमुगाची पेंड खाद्य म्हणून दिली जाते. अशा मत्स्यतळ्यात एका वर्षात त्यांची पूर्ण वाढ होऊन ते ५६–६६ सेंमी. लांब आणि १·४–२·८ किग्रॅ. वजनापर्यंत वाढतात. मत्स्यतळ्यात कटला, मृगळ, रोहू अशा माशांची मत्स्यशेती केली जाते. अनेक जणांच्या आहारात मृगळ माशाचा समावेश असतो.