एक पालेभाजी. मेथी ही वनस्पती फॅबेसी कुलाच्या पॅपिलनिडी उपकुलातील असून तिचे शास्त्रीय नाव ट्रायगोनेला फीनम-ग्रीकम आहे. ती मूळची दक्षिण यूरोपातील आहे. अफगाणिस्तान, ईजिप्त, इराण, पाकिस्तान, नेपाळ व फ्रान्स या देशांत, तसेच भारतात राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात इ. राज्यांत तिची लागवड केली जाते. तिच्या बियांनाही सामान्यपणे मेथी म्हणतात.
मेथी या लहान वनस्पतीचे खोड ३०–६० सेंमी. उंच वाढते. पाने संयुक्त, त्रिपर्णी व एकाआड एक असून त्यांचा आकार भाल्यासारखा किंवा अर्धअंडाकार असतो. पर्णिका २-२·५ सेंमी. लांबट असून कडा थोड्याशा दातेरी असतात. फुले लहान, पांढरी, एक किंवा दोन आणि बिनदेठाची असून ती पानांच्या बगलेत येतात. फळ शिंबावंत असून शेंगा चपट्या, टोकदार आणि लांब असतात. बिया पिवळ्या व अनेक असून त्यांच्या टोकांना दोन्ही बाजूंना तिरकस खाचा असतात.
मेथीच्या १०० ग्रॅ. पानांच्या सेवनातून ६% कर्बोदके, ४% प्रथिने, १·५% क्षार, ३९५ मिग्रॅ. कॅल्शियम, ५१ मिग्रॅ. फॉस्फरस आणि १·९ मिग्रॅ. लोह हे घटक शरीराला उपलब्ध होतात. मेथीमध्ये असलेल्या सोटोलॉन या संयुगामुळे मेथीला विशिष्ट गोड गंध असतो. मेथीची पाने पालेभाजीसाठी वापरतात, तसेच ती अंतर्गत व बाह्य सूजेवर आणि भाजल्यावर उपयोगी आहेत. भारतीय मसाल्यांमध्ये मेथीच्या बियांचा वापर एक महत्त्वाचा घटक म्हणून केला जातो. बिया उष्ण, पौष्टिक, ज्वरनाशक, कृमिनाशक, भूकवर्धक, आतड्यासाठी सौम्य व स्तंभक आहेत. कुष्ठ, वात, कफ, श्वासनलिका दाह आणि मूळव्याध यांवर त्या गुणकारी आहेत. मोड आलेल्या बिया औषधी आहेत. बियांची पूड सौंदर्यवर्धक आहे. त्वचा आणि केस सतेज राहण्यासाठी तिचा वापर करतात.