संधिपाद संघाच्या कीटक वर्गातील एक सर्वपरिचित व उपद्रवी कीटक. घरमाशीचा समावेश डिप्टेरा गणाच्या मस्किडी कुलात होतो. तिचे शास्त्रीय नाव मस्का डोमेस्टिका आहे. त्या जगात सर्वत्र आढळतात. भारतात घरमाशीच्या तीन जाती आढळतात. त्या अन्नपदार्थांपासून विष्ठेपर्यंत सर्व ओलसर पदार्थांवर वावरताना आढळतात.
घरमाशी

घरमाशीची लांबी सु. ६ मिमी. असून रंग गडद करडा असतो. पोटाकडील बाजू फिकट पिवळ्या रंगाची असते. शरीराचे डोके, वक्ष आणि उदर असे तीन भाग असतात. डोके छोटे व अर्धवर्तुळाकार असून त्यावर शृंगिका, संयुक्त डोळे, साधे डोळे आणि मुखांगे असतात. वक्ष तीन अस्पष्ट खंडांनी बनलेले असून त्यावर पंख आणि पाय असतात. पंखांची एकच जोडी असून पंखांच्या दुसऱ्या जोडीऐवजी तोल सांभाळण्यासाठी संतोलकांची जोडी असते. पायाचे पाच भाग असून शेवटच्या भागास दोन आकडे असतात. या आकडयांच्या खालच्या बाजूस मांसल गादया असून त्या चिकट द्राव स्रवतात. त्यांदवारे घरमाशी छताला चिकटून उलटी बसू शकते. नरांमध्ये उदर आठ खंडांचे तर मादयांमध्ये नऊ खंडांचे असते. उदरात प्रजनन संस्था असते. मादी नराहून आकाराने मोठी असते. घरमाशीच्या जीवनचक्रात अंडे, अळी, कोश आणि प्रौढावस्था असे चार टप्पे असतात. पावसाळ्यात ओलसरपणा भरपूर असल्यामुळे त्यांची वीण मोठया प्रमाणावर होते. मादी घरमाशी तिच्या आयुष्यात ५०० – १,०००  अंडी घालते. या अंडयातून १० – १२ दिवसांत प्रौढ माशी तयार होते. आयु:काल १५ – २० दिवसांचा असून त्यात ५ – ६ वेळा अंडी घातली जातात. मादीपेक्षा नर जास्त काळ जगतो.

घरमाशी दिवसा सूर्यप्रकाशात जास्त चपळपणे वावरते. माशीला द्रवरूप अन्न शोषून घेण्यासाठी सोंडेसारखे मुखांग असते. मुखांगाचे दोन भाग असून टोकाला तबकडीसारखा पसरट भाग असतो. तबकडीच्या मध्यभागी मुख असून दोन्ही बाजूंना वाहक नलिकांचे जाळे असते. त्याद्वारे द्रवरूप अन्न शोषले जाते. अन्न घनरूपात असेल, तर त्यावर लाळ सोडली जाते. घरमाशी माणसाचे अन्न, विष्ठा, थुंकी, जखमांतील द्रव, खते व कोणतेही अपशिष्ट हे अन्न म्हणून वापरते. अन्न शोधत असताना, घरमाश्या एकमेकांच्या मागावर असतात. त्या सतत एकमेकांचे निरीक्षण करीत असतात;जेव्हा एखादया माशीला अन्न सापडते तेव्हा इतर माश्या अन्न खाण्यासाठी जमा होतात. जेव्हा माशी खाद्यपदार्थांवर बसते तेव्हा तिच्या केसात अडकलेले घाणीतील सूक्ष्मजीव अन्न दूषित करतात. घरमाशी दर १०-१५ मिनिटांनी अन्न घेते, तसेच विष्ठाही टाकते. विष्ठा सामान्यपणे काचसामानावर काळसर ठिपक्यांच्या रूपात दिसते. विष्ठेमध्ये रोगकारक जीवाणू आणि आदिजीव असतात. घरमाशी ही या सूक्ष्मजीवांची वाहक असते. तिच्या शरीरावर सु. ६० लाख जीवाणू असू शकतात. त्यामुळे विषमज्वर, आमांश, पटकी, क्षय, खुपरी, परमा, काळपुळी असे रोग माणसाला होतात.

काही वेळा घरमाशी माणसाच्या व जनावरांच्या उघडया जखमांवर अंडी घालते. काही वेळा नाकपुडयांत, तोंडात, गुदद्वारात, व डोळ्यांतही त्या अंडी घालतात. अशा ठिकाणी अंड्यांतून अळ्या बाहेर येतात. या रोगाला मायसिस म्हणतात. कोंबड्यांमध्ये पट्टकृमीच्या आणि घोडयांमध्ये जंतांच्या जीवनचक्रांत त्या पोशिंदयाचे काम करतात. घरमाश्या बसू नयेत यासाठी अन्नपदार्थ झाकून ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. घाण व कचरा साठू न देता त्यांची योग्य विल्हेवाट लावणेही गरजेचे असते. माश्यांच्या नियंत्रणासाठी रासायनिक कीटकनाशके, जैविक नियंत्रण उपाय अथवा भौतिक उपाय करतात. कोळी, पाली, सरडे व पक्षी हे घरमाशीचे शत्रू आहेत. कीटकनाशकांच्या अतिवापरामुळे अनेक घरमाश्यांमध्ये रसायनांविरुद्ध प्रतिकारशक्ती निर्माण झाली आहे.