(ॲनॉरेक्स‍िया). एक भावनात्मक विकार. या विकारामध्ये रुग्ण अन्न किंवा आहार यांना नकार देतो किंवा अन्नग्रहण करण्याचे टाळतो. प्रामुख्याने पौगडांवस्थेतील किंवा किशोरावस्थेतील मुली, तसेच तरुण स्त्रिया यांच्यात हा विकार आढळून येतो. बहुतेक वेळा रुग्णाला प्रचंड भूक लागलेली असू शकते, तथापि तो मानसशास्त्रीय कारणांमुळे अन्नग्रहणास नकार देत असतो. भयगंड, नैराश्य (विषण्णता), आशंका ही याची अन्य लक्षणे असू शकतात. वजनात २५ टक्क्यांपर्यंत गंभीर घट होणे, रक्तदाब कमी होणे, हृदयाचे ठोके मंद पडणे, शरीरावर लव (सूक्ष्म केस) वाढणे इ. या विकाराची मुख्य शारीरिक लक्षणे असू शकतात. त्यामुळे पौगंडावस्थेतील यौवनस्थिती लांबू शकते, तरुणींमध्ये ऋतुस्राव सुरू होऊ शकत नाही अथवा मासिक पाळी थांबू शकते. रुग्णाच्या व्यक्तिमत्त्वावर परिणाम होऊ शकतो. पुष्कळ रुग्ण स्वत:चे कुटुंब, मित्रपरिवार यांच्यापासून दूर राहतात. ते निराश दिसतात. पुष्कळांना या विकाराच्या परिणामांची जाणीवच नसते. ते स्वत:ला निरोगी व आपले वजन वाढलेले आहे, असे समजत राहतात.

क्षुधानाश विकार व्यक्तीच्या शरीर-वस्तुमान निर्देशांकावरून (बॉडी-मास इंडेक्स – बीएमआय) ओळखता येतो. शरीर-वस्तुमान निर्देशांक = या सूत्राने काढतात. क्षुधानाश विकाराचे अतितीव्र, तीव्र, मध्यम, सामान्य असे चार वेगवेगळे प्रकार केले गेले आहेत; बीएमआय १५ पेक्षा कमी असल्यास क्षुधानाश अतितीव्र; बीएमआय १५-१६ यांच्या दरम्यान असल्यास क्षुधानाश तीव्र; बीएमआय १७ पेक्षा अधिक असल्यास क्षुधानाश मध्यम तर बीएमआय २०–२५ यांच्या दरम्यान असल्यास क्षुधानाश सामान्य मानतात.

शरीर वस्तुमान निर्देशांक क्षुधानाश तीव्रता
२०–२५ सामान्य
१७< (१७ पेक्षा अधिक) मध्यम
१५-१६ तीव्र
<१५ (१५ पेक्षा कमी) अतितीव्र

क्षुधानाशाचे रुग्ण अन्न टाळण्यासाठी किंवा नाकारण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतींचा अवलंब करतात. काही रुग्ण सरळ अन्न नाकारणारे असतात. काहींना अन्नाची प्रचंड गरज असते, तेव्हा ते भरपूर अन्न खातात; परंतु आपण अन्न जास्त खाल्ले या भावनेने नंतर हे अन्न ओकारी करून काढून टाकतात. काहीजण खाल्लेले अन्न शरीराबाहेर टाकण्यासाठी विरेचक व मूत्रवर्धक पदार्थांचा वापर करतात. इतर काही रुग्ण शरीरातील जादा ऊष्मांक जाळण्यासाठी जास्त वेळ व्यायाम करतात. काही उपवास करतात किंवा आहारावर नियंत्रण ठेवतात. क्षुधानाशाची नक्की कारणे कोणती आहेत, यांबाबत तज्ज्ञांमध्ये एकमत नाही. क्षुधानाश आनुवंशिक असू शकतो. तसेच जन्मपूर्व आणि जन्मकालीन गुंतागुंत, जठरांत्र मार्गाच्या विकृती, ॲडिसन रोग इत्यादींमुळेही क्षुधानाश उद्भवू शकतो. अनेकदा या रोगाचे कारण मानसिक असू शकते. यौवनावस्थेतील वजनात होणारी वाढ टाळण्यासाठी काहीजण स्वत:ची उपासमार होऊ देतात. काही रुग्ण लोकांचे लक्ष आपल्याकडे वेधण्यासाठी किंवा आपण कोणीतरी खास व्यक्ती आहोत, असा आभास निर्माण करण्याच्या इच्छेपोटी असे वागतात, असे काही तज्ज्ञ सुचवितात. कसरतीचे खेळ, मॉडेलिंग आणि नृत्य यांसारख्या शारीरिक कृतींसाठी जेथे सडपातळ असणे महत्त्वाचे मानतात, असे व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींमध्ये हा विकार अधिक आढळून येतो.

क्षुधानाशावर मानसचिकित्सा आणि औषधोपचार असे दोन्ही प्रकारचे उपचार करतात. या विकाराची लक्षणे लक्षात आल्यानंतर तातडीने उपचार झाल्यास बहुतेक रुग्ण बरे होतात. कुपोषणासारखी स्थिती उद्भवल्यास रुग्णाला रुग्णालयात दाखल करणे गरजेचे असते. अन्यथा काही बाबतींत क्षुधानाश मारक ठरू शकतो. काही मानसशास्त्रज्ञ या संदर्भात सर्व कुटुंबावर उपचार करायला हवेत, असे सुचवितात. जगातील अनेक देशांमध्ये सर्व सामाजिक तसेच आर्थिक स्तरांतील लोकांमध्ये हा विकार सामान्यपणे आढळून येतो आणि सामान्यपणे महिलांमध्ये अधिक प्रमाणावर दिसून येतो.