जगात सर्वत्र आढळणारा पक्षी. मैना हा पॅसेरिफॉर्मिस गणाच्या स्टर्निडी कुलातील पक्षी आहे. भारतात सामान्यपणे आढळणाऱ्या मैनेचे शास्त्रीय नाव ॲक्रिडोथिरिस ट्रायस्टिस आहे. या प्रजातीतील ॲक्रिडोथिरिस या शब्दाचा अर्थ ‘टोळांचा शिकारी’ असा आहे. भारतात समुद्रसपाटीपासून ते हिमालयात सु. १,८०० मी. उंचीपर्यंत हे पक्षी आढळतात. ते मूळचे दक्षिण आशियाई देशांतील असून अन्य प्रदेशांत घुसखोरी करण्याबद्दल प्रसिद्ध आहेत. ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, फिजी, आफ्रिका, उत्तर अमेरिका व मादागास्कर या ठिकाणीही ते आढळतात. मैना हे नाव मूळच्या संस्कृत ‘मदन’ या शब्दापासून मिळालेले आहे. महाराष्ट्रात त्याला ‘साळुंकी’ असेही म्हणतात.
मैना मध्यम आकाराचा पक्षी असून त्याची लांबी सु. २३ सेंमी. असते. नर आणि मादी दिसायला सारखेच असतात. शरीराचा रंग तपकिरी असून डोक्यावर तो काळपट असतो. डोळ्यांच्या मागे पिवळ्या रंगाचे डाग असतात. दक्षिण भारतातील मैना पक्ष्यांचे रंग उत्तर भारतातील या पक्ष्यांच्या तुलनेत फिकट असतात. पंखांच्या बाहेरील कडांवर पुढच्या बाजूला पांढरी पिसे असतात. शेपटीच्या सुरुवातीचा भाग खालून पांढरा असतो. चोच पिवळी असते. पाय दणकट आणि पिवळ्या रंगाचे असतात. नराचे सरासरी वजन सु.११० ग्रॅ., तर मादीचे १२०–१३८ ग्रॅ. इतके असते. नराच्या शेपटीची लांबी ८१–९५ मिमी., तर मादीची ७९–९६ मिमी. असते. नराची चोच २५–३० मिमी. लांब, तर मादीची चोच २५–२८ मिमी. लांब असते. हा पक्षी उड्या मारण्याऐवजी चालतो.
मैना पक्षी मिश्राहारी असून तो मुख्यत: कीटकभक्षी आहे. वेगवेगळी तृणधान्ये, अंकुर, फळे व फेकून दिलेले अन्न यांबरोबरच वेगवेगळ्या प्रकारचे कीटक, अष्टपाद, लहान सस्तन प्राणी, सरडे इत्यादींचा समावेश त्याच्या आहारात असतो. गवतात चरणाऱ्या जनावरांच्या हालचालींनी उडणारे कीटक, तसेच गवत पेटविले असता इतस्तत: उडणाऱ्या कीटकांना खाण्यासाठी ते गर्दी करतात. अनेकदा परिसरातील आपल्या सोबत्यांना शत्रूपासून सावध करण्यासाठी तो मोठमोठ्याने ओरडतो.
मैना पक्षी नेहमी जोडीने वावरतात, तर काही वेळा गटागटाने दिसतात. तसेच ते अन्य पक्ष्यांसोबतही वावरताना दिसतात. इतरांना न बिचकता त्यांचा होणारा वावर त्यांच्या घुसखोर प्रवृत्तीला पोषक ठरतो. ते निरनिराळे आवाज काढू शकतात. त्यांच्या या क्षमतेमुळे इतरांच्या बोलण्याची नक्कल करायची त्यांना सवय लागली असावी. पिंजऱ्यात ठेवलेल्या काही मैना ‘बोलणाऱ्या मैना’ म्हणून प्रसिद्ध आहेत. विशेषकरून भारतात आढळणारी पहाडी मैना (ग्रॅक्यूला इंडिका) बोलण्यासाठी, तसेच गाण्यासाठी प्रसिद्ध आहे. हा पक्षी गाताना पिसारा फुलवतो, डोके वरखाली हलवतो.
मैना पक्ष्याची जोडी आयुष्यभर टिकते. त्यांचे प्रजनन वर्षातील कोणत्याही ऋतूत होऊ शकते. भिंतीच्या किंवा झाडाच्या खोबणीत ते आपले घरटे तयार करतात. दुसऱ्या पक्ष्यांनी वापरलेले घरटेदेखील ते कधीकधी वापरतात. मादी एकावेळी ४–६ अंडी घालते. अंडी निळसर रंगाची असून त्यांचा आकार २१–३० मिमी. असतो. अंडी १७-१८ दिवस उबविली जातात. घरटे बांधणे, अंडी उबविणे व पिलांचे संगोपन करणे ही कामे नर-मादी मिळून करतात. साधारणपणे २३-२४ दिवसांनंतर पिले घरट्याबाहेर पहिल्यांदा झेपावतात.