सायपेरेसी कुलातील या एकदलिकीत वनस्पतीचे शास्त्रीय नाव सायपेरस रोटुंडस आहे. तिचे मूलस्थान आफ्रिका, दक्षिण आशिया, दक्षिण यूरोप आणि मध्य यूरोप या ठिकाणी आहे. भारतात ती सर्वत्र आढळते. ती बहुधा पाणथळ जागी, शेतात किंवा माळरानात तण म्हणून वाढते. जगभरात सायपेरस प्रजातीच्या सु. ६०० जाती असून त्यांपैकी भारतात सु. १०० जाती आढळतात.
मोथा या बहुवर्षायू वनस्पतीचे ग्रंथीक्षोड जमिनीलगत ५–२० सेंमी. पसरते. त्याला जमिनीवर उभ्या वाढणाऱ्या त्रिकोनी फांद्या येतात. फांद्या सु. १४० सेंमी.पर्यंत उंच वाढतात. ग्रंथीक्षोडाला आगंतुक मुळे असतात. ते उभट असून शल्कपर्णांनी आच्छादलेले असते. पाने लांब व अरुंद असतात. फुलोरे लहान व उभ्या दांड्यावर उच्छत्रात येतात. फुलोरा कणिश प्रकारचा असून पानांच्या बगलेत येतो. फुलांत तीन फिकट हिरवी परिदले व तीन पुंकेसर असतात. जायांगात एक ऊर्ध्वस्थ अंडपी असते. परागण वाऱ्यामार्फत होते. कृत्स्नफळ लहान व एकबीजी असते. मोथ्याच्या ग्रंथीक्षोडामध्ये सायपरीन हे बाष्पनशील व सुगंधी तेल असते. त्याचे प्रमाण नागरमोथ्यापेक्षा कमी असते. ते सौंदर्यप्रसाधनांमध्ये वापरतात. मळमळ, ताप आणि दाह यांवर ही वनस्पती गुणकारी आहे.
भारतात मोथा या वनस्पतीसारखी दिसणारी अजून एक जाती आढळते. तिचे शास्त्रीय नाव सायपेरस स्कॅरिओसस आहे. नागरमोथा या नावाने ती ओळखली जाते. तिला लव्हाळा असेही म्हणतात.