भारताचा राष्ट्रीय पक्षी. मोराचा समावेश पक्षिवर्गाच्या गॅलिफॉर्मिस गणाच्या फॅजिॲनिडी कुलात होतो. तो मूळचा दक्षिण आशियातील असून जगात अनेक ठिकाणी त्याचा प्रसार झालेला आहे. आशियात त्याच्या पॅव्हो क्रिस्टेटस आणि पॅव्हो म्युटिकस या दोन जाती आढळतात, तर आफ्रिकेत आफ्रोपॅव्हो काँजेन्सिस ही एक जाती आढळून येते. या पक्षाच्या नराला मोर तर मादीला लांडोर म्हणतात.
भारतात आढळणाऱ्या मोराचे शास्त्रीय नाव पॅव्हो क्रिस्टेटस आहे. नर आकाराने मोठा असून चोचीपासून शेपटीपर्यंतची लांबी १००–११५ सेंमी. आणि वजन ४–६ किग्रॅ. असते. लांडोरीची लांबी सु. ९५ सेंमी. आणि वजन २·७५–४ किग्रॅ. असते. नराचे डोके निळे असून त्यावर पंख्याच्या आकाराचा तुरा असतो. मानेवर गडद निळ्या रंगाची पिसे आणि पाठीवर खवल्याच्या आकाराची ती बिरंजी (तांब्याच्या रंगाप्रमाणे)-हिरव्या रंगाची पिसे असतात. पाठीवरच्या पिसांवर फिकट करडे ठिपके असतात. नराला शेपटीभोवती पिसारा असतो. त्याच्या शेपटीला झाकणारी पिसे लांब असून त्यांपासून तयार झालेला पिसारा ९०–१२० सेंमी. लांबीचा असतो. त्यात सु. २०० पिसे असून त्यांचा रंग बिरंजी-हिरवा असतो. पिसाऱ्यातील पिसांच्या रचनेमुळे मोर अधिक आकर्षक दिसतो. बहुतेक पिसांच्या टोकावर डोळा असून त्याच्या मध्यभागी जांभळट काळ्या रंगाचा हृदयाकृती मोठा ठिपका असतो व त्याभोवती निळ्या रंगाने वेढलेले बिरंजी रंगाचे वलय असते. लांडोरीला पिसारा नसतो. शेपटी दाट तपकिरी असून तिचा खालचा भाग तकतकीत हिरवा असतो. पाय बळकट असून त्याच्या मागच्या बाजूला असलेल्या बोटावर तीक्ष्ण शुंडिका (स्पर) असते. दोन मोरांमध्ये भांडण झाले की या शुंडिकेच्या साहाय्याने ते एकमेकांवर हल्ला करतात. लांडोरीचे डोके बिरंजी रंगाचे असून तिच्याही डोक्यावर नराप्रमाणे तुरा असतो.
मोरांचे वास्तव्य सामान्यपणे दाट झुडपांमध्ये आणि विशेषेकरून नदी व ओढा यांच्या किनाऱ्याला असते. ते गटाने राहतात आणि वावरतात. मनुष्य वस्तीत किंवा खेड्यांच्या आसपास ते राहतात. दिवसभर खाद्य शोधत फिरून रात्री ते एखाद्या मोठ्या झाडावर विसावतात. जमिनीवर पडलेली फळे, धान्ये, साप, उंदीर, सरडे, कीटक इ. ते खातात.
मोर एकापेक्षा अधिक जोडीदारांसोबत राहतात. एका मोराबरोबर बहुधा दोन-तीन लांडोरी असतात. प्रणयाराधनाच्या वेळी मोर पिसारा ताठ करून, एखाद्या पंख्याप्रमाणे तो पसरून, पुढे-मागे हालवीत किंवा पिसारा थरथरवीत लांडोरीसमोर नाचतो किंवा ठुमकत चालतो आणि मादीला आकर्षित करतो. मीलनकाळानंतर मोराच्या शेपटीवरची पिसे गळून पडतात आणि मीलनकाळाच्या आधी पुन्हा उगवतात. मोराचा नाचण्याचा कालावधी व पिसांची संख्या यांनुसार लांडोर मोराची निवड करते. मादीचा अंडी घालण्याचा हंगाम दक्षिण भारतात एप्रिल-मे महिन्यांत तर उत्तर भारतात जानेवारी-मार्च महिन्यांत असतो. लांडोर एका वेळी ३–५ अंडी जमिनीवर घालते. फक्त मादी अंडी उबविते. अठ्ठावीस दिवसांनी अंड्यातून पिलू बाहेर येते. पिले लांडोरीकडून अन्न गोळा करायला शिकतात.
प्राणिसंग्रहालयात मोर २३ वर्षांपर्यंत जगू शकतात, असे आढळले आहे. मोराच्या आंतरजननातून विविधरंगी मोर निपजण्यात आले आहेत. मोराची पांढऱ्या रंगाची जाती विविध प्राणिसंग्रहालयांतून आंतरजननाने निर्माण झालेली आहे. पांढरा मोर हा विवर्णतेचा (अल्बिनिझम) प्रकार आहे.
वाघ, कोल्हा व रानमांजर हे मोराचे नैसर्गिक शत्रू आहेत. वाघ व बिबट्या यांसारखे प्राणी शिकारीसाठी बाहेर पडल्याचे दिसताच मोर ओरडून इतरांना सावध करतो. आपल्यावर हल्ला होणार असे दिसताच मोर वेगात पळतात. कीटकनाशके चोळलेल्या बिया खाल्ल्याने तसेच उन्हाळ्यात पाण्याच्या दुर्भिक्षामुळे मोरांचे मृत्यू होतात. भारतात मोराची शिकार करणे हा दखलपात्र गुन्हा आहे.