(मायक्रोन्युट्रिएन्ट). सजीवांच्या शारीरिक क्रिया व्यवस्थित चालण्यासाठी अणि स्वास्थ्यासाठी जीवनभर सूक्ष्मपोषकद्रव्यांची गरज असते. या सूक्ष्मपोषकद्रव्यांमध्ये मुख्यत: मूलद्रव्ये आणि जीवनसत्त्वे यांचा समावेश होतो. वेगवेगळ्या सजीवांना वेगवेगळ्या सूक्ष्मपोषकद्रव्यांची गरज असते. जसे, मानवाला आणि प्राण्यांना जीवनसत्त्वे आणि आहारविषयक खनिजे लागतात, तर वनस्पतींना विशिष्ट खनिजे लागतात. मानवी शरीराला सूक्ष्मपोषकद्रव्ये प्रतिदिवशी १०० मिग्रॅ. इतकी कमी प्रमाणात लागतात, तर बृहत्‌पोषकद्रव्ये ग्रॅममध्ये, म्हणजे मोठ्या प्रमाणात लागतात. मानवाला आणि इतर प्राण्यांना लागणाऱ्या खनिजांमध्ये कॅल्शियम व लोह (आयर्न) या मूलद्रव्यांचा समावेश होतो. ही मूलद्रव्ये त्यांच्या शरीरात तयार होत नाहीत, परंतु ती जमिनीतून किंवा इतर अन्नपदार्थांपासून मिळतात. प्राण्यांनाही जीवनसत्त्वांची गरज असते आणि ती त्यांना अगदी कमी प्रमाणात म्हणजे मायक्रोग्रॅममध्ये लागतात.

मनुष्य आणि प्राणी यांच्या पोषकद्रव्यांचा प्राथमिक स्रोत वनस्पती आहेत. परंतु वनस्पतींमध्ये काही पोषकद्रव्ये कमी असू शकतात. आहारातून प्राण्यांना त्यांचा पुरेसा पुरवठा न झाल्यास कुपोषण उद्भवू शकते.

वनस्पतींना जातींनुसार विविध सूक्ष्मपोषकद्रव्यांची गरज असते. वनस्पतींच्या वाढीसाठी आणि आरोग्यासाठी त्यांना सूक्ष्मपोषकद्रव्यांच्या रूपात आठ मूलद्रव्ये लागतात : आयर्न (लोह), मँगॅनीज, बोरॉन, कॉपर (तांबे), क्लोरीन, कोबाल्ट, मॉलिब्डेनम आणि झिंक (जस्त). वनस्पतींना आवश्यक असणारी पोषकद्रव्ये मातीमध्ये नसतील तर वनस्पतींना त्या पोषकद्रव्यांच्या अभावी रोग होतात. हे दुष्परिणाम बऱ्याचदा दिसून येत नाहीत. परंतु जे प्राणी पूर्णपणे अशा वनस्पतींवर जगतात, त्या प्राण्यांनाही या सूक्ष्मपोषकद्रव्यांच्या अभावी रोग होतात. प्राण्यांना मँगॅनीज, आयोडीन आणि कोबाल्ट या मूलद्रव्यांची आवश्यकता असते. ही मूलद्रव्ये संयुगांच्या स्वरूपात प्राण्यांना वनस्पतींपासून मिळत असतात. बोरॉन हे मूलद्रव्य वनस्पतींमध्ये कर्बोदकांचे वहन करते, तसेच चयापचय क्रियेसाठी मदत करते. त्याच्या अभावी कळ्यांची वाढ नीट होत नाही. प्रकाशसंष्लेषण, परासरण आणि आयनिक समतोल यांसाठी क्लोरीन वायूची गरज असते. नायट्रोजन स्थिरीकरणात कोबाल्ट हे मूलद्रव्य उत्प्रेरकाचे कार्य करते. म्हणून द्विदल वनस्पतींची लागवड करताना जमिनीत कोबाल्टचे क्षार मिसळतात. हरितद्रव्याच्या निर्मितीसाठी लोहाची गरज असते; लोहाच्या अभावी वनस्पतींना हरित पांडुरोग होतो. हरितद्रव्याच्या निर्मितीसाठी आवश्यक असणाऱ्या विकराला मँगॅनीज सक्रिय करते. मँगॅनीजची उपलब्धता जमिनीच्या सामूवरून (पीएच) ठरते. वनस्पतींच्या स्वास्थ्यासाठी मॉलिब्डेनम आवश्यक असते. वनस्पतींमधील नायट्रोजन चक्राच्या वेगवेगळ्या टप्प्यांवरील प्रक्रियांसाठी मॉलिब्डेनम लागते. गरज पडल्यास वनस्पतींना आवश्यक असणारी पोषकद्रव्ये योग्य खतांच्या रूपात पुरवली जातात. तसेच पिकांतील पोषकद्रव्ये वाढण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातात.

मानवाच्या वाढीसाठी आणि आरोग्यासाठी त्यांना पुढील मूलद्रव्ये सूक्ष्मपोषकद्रव्यांच्या रूपाने लागतात : कॅल्शियम, क्लोरीन, क्रोमियम, कॉपर (तांबे), फ्ल्युओरिन, आयोडीन, आयर्न (लोह), मॅग्नेशियम, मँगॅनीज, मॉलिब्डेनम, फॉस्फरस, पोटॅशियम, सेलेनियम, सोडियम, सल्फर आणि झिंक (जस्त). मानवाच्या बाबतीत जगभर तीन व्यक्तींमागे एका व्यक्तीमध्ये सूक्ष्मपोषकद्रव्यांची कमतरता दिसून येते. त्यामुळे मानवाचे स्वास्थ्य बिघडते, तसेच अनेक विकार होतात. उदा., विकसनशील देशांमध्ये जीवनसत्त्वाच्या अभावी ३० लाख बालकांना अंधत्व आल्याचे दिसून आले आहे. लोहाच्या अभावी होणाऱ्या पांडुरोगामुळे विकसनशील देशांमध्ये चारपैकी एक बालक गर्भावस्थेतच मृत्युमुखी पडल्याचे दिसून आले आहे. आयोडिनच्या अभावी जगात अनेक बालकांच्या मानसिक आणि बौद्धिक वाढीत अडथळा निर्माण होत आहे, ज्यामुळे सु. २० लाख मुलांचा बुद्ध्यंक कमी झालेला आहे. विकसित देशांमध्ये अन्नातील पोषणमूल्ये टिकवून ठेवल्यामुळे, पूरक आहारामुळे आणि आहारातील विविधतेमुळे तेथे कुपोषणासारखी स्थिती उद्भवत नाही.

१९९० साली अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहरात ‘वर्ल्ड समीत फॉर चिल्ड्रेन’ मध्ये जमलेल्या देशांनी विकसनशील देशांतील बालकांमध्ये आयर्न, आयोडीन आणि जीवनसत्त्व कमी असल्याचे सांगून सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीकोनातून ही समस्या संवेदनशील असल्याचे म्हटले आहे. तसेच सूक्ष्मपोषकद्रव्यांचा पुरवठा होण्यासाठी त्यांनी काही धोरणे आखली आहेत. या धोरणांनुसार ६–५९ महिन्यांच्या वयातील बालकांना जीवनसत्त्व पूरक आहार देणे, बाळांना जन्म देऊ शकणाऱ्या मातांना आयर्नयुक्त पदार्थ आणि -समूह जीवनसत्त्वे, आयोडीनयुक्त मीठ, पोषक आहार, विविध पोषकद्रव्यांच्या भुकट्या यांचा पुरवठा करणे आणि पोषक आहारासंबंधी प्रशिक्षण देणे इ. बाबींची अंमलबजावणी चालू केली आहे.