राजस्थानातील एक प्रसिद्ध चित्रशैली. शेखावती ह्या स्थानावरून ह्या चित्रशैलीला हे नाव मिळाले. शेखावती हे स्थान सांप्रतच्या राजस्थानातील सीकर आणि झुनझुनू या जिल्ह्यांनी मिळून बनलेले आहे. शेखावतीचा शब्दश: अर्थ शेख लोकांची भूमी किंवा शेखांची बाग असे असून हे नाव पंधराव्या शतकांतील राव शेख यांच्या नावावरून रूढ झाले आहे. शेखावतीची ख्याती रेशीम, नीळ, तंबाखू, लोकर, मसाले अशा वस्तूंचे व्यापारी केंद्र म्हणून सुरुवातीस होती. त्या निमित्ताने भारतात प्रसिद्ध असलेल्या अनेक उद्योगपती आणि व्यावसायिक यांची कुटुंबे या शेखावती प्रांतात वास्तव्यास होती. त्यांच्या मोठमोठ्या हवेल्या इत्यादींतून या कलाकारीला आश्रय मिळाला आणि तिचा प्रसारही झाला. त्यांनी येथील चित्रशैलीस प्रोत्साहन दिले. अव्वल इंग्रजी अमदानीत इंग्रजी जीवनशैलीचा तिच्यावर प्रभाव पडला. नवलगड, बिसाउ, बंगर, राजगड, चुरू इत्यादी गावांतून या चित्रशैलीची संग्रहालये दृष्टोत्पत्तीस येतात.

हवेलीच्या आतल्या भिंतीवरील चित्रकलाकाम

भारतीय लोककलेचा उत्तम नमुना म्हणून शेखावती चित्रकलेकडे पाहिले जाते. ही चित्रे प्रामुख्याने राजस्थानमधील जुन्या जयपूर संस्थानातील तसेच झुनझुनू आणि सीकर जिल्ह्यातील अनेक गावांमधील हवेल्या, किल्ले, छत्र्या (वास्तू), मंदिरे, बावड्या यांच्या भिंतींवर रंगवलेली आहेत. ह्या चित्रशैलीवर मोगल, राजपूत चित्रशैलींचा प्रभाव असून अद्यापही तिची निर्मिती होताना दिसते. कंपनी चित्र-प्रणाली (स्कूल) आणि राजस्थानातील लोककला ह्यांच्या संगमातून ही चित्रशैली बहरली असे मानले जाते. भित्तिशोभनातील एक प्रकार पिछवाई यांवरही शेखावती चित्रशैलीचा प्रभाव दिसतो. उदयपूरजवळील नाथद्वार येथे श्रीनाथजीच्या वैष्णव मंदिरात मूर्तीच्या मागे लावण्याचा पडदा म्हणून या पटचित्रास पिछवाई म्हणण्याचा प्रघात आहे. लघुचित्रकारांनी आपली कृष्णभक्ती व्यक्त करण्यासाठी मोठमोठ्या पिछवाया रंगविल्या आणि मंदिरांना त्या अर्पण केल्या. त्यांत श्रीनाथजींच्या आयुष्यातील प्रसंग उदा., रासक्रीडा, गो-पालन, भोग, शरद पौर्णिमा इत्यादी विषयांचा अंतर्भाव केला आहे.

शेखावती चित्रावर संबंधित चित्रकारांची नावे चितेरा, चित्रकार, पेंटर अशी लिहिलेली आढळतात. अशा एकूण १५८ पेक्षा जास्त चित्रकारांची नावे चित्रकार रवींद्र शर्मा आणि त्यांची सहकाऱ्यांनी संग्रहित केली असून दोन गटांत त्यांचे विभाजन करता येईल, असा निष्कर्ष मांडला आहे. जयपूर परिसरातील चित्रकारांनी उत्तम दर्जांची चित्रे मंदिरे, छत्र्या, हवेल्या यांच्या भिंतीवर रेखाटलेली आहेत. इस्लाम धर्मातील मसोन जमातीतील चित्रकार आणि हिंदू कुंभार जातीतील चित्रकारांनी काही चित्रे रेखाटली आहेत. चित्राखाली चित्रकारांचा उल्लेख चितेरासी असाही आढळतो आणि काही चित्रकार आजही अशी चित्रे मजुरीवर काढतात. या चित्रांची एकच एक अशी विशिष्ट शैली नसून ती विविध शैलींची मिश्रशैली आहे; मात्र भौगोलिक वर्गीकरणाच्या आधारे तिचा ‘शेखावती चित्रे’ असा स्वतंत्र चित्रमय भाग आहे. त्यांत अनेकदा पार्श्वचित्र  (एका बाजूचाच चेहरा) आढळते. शेखावती चित्रे भडक रंगसंगती असलेली भित्तिचित्रे या स्वरूपामध्ये प्रसिद्ध आहेत.

हवेलीच्या बाहेरील भिंतीवरील आगगाडीचे चित्र

शेखावती शैलीचे चित्रविषय वैविध्यपूर्ण असून त्यांत आधुनिकता आणि परंपरा यांचा मिलाप दिसून येतो. या चित्रांतून महाभारत, रामायण यांतील कथाविषय तसेच राजे-राण्या व विविध प्राणी-पक्षी अशी रूपके चितारलेली असून शयनगृहात प्रणयचित्रे चितारलेली आहेत. वास्तूच्या कमानी, सज्जे, छते, भिंती (आतून-बाहेरून) अशा नाना जागी ही चित्रे काढलेली दिसतात. इंग्रजी अंमलामधील चित्रांत सायकल चालवणारी मुले, हत्तीवरून फेरफटका मारणारे परदेशी पाहुणे, रथ आणि नानाविध प्राणी, आगगाडी, विमाने, जहाजे अशी आधुनिक वाहने इत्यादीही दिसतात. भित्तिचित्रांप्रमाणेच शेखावती प्रांतात काही कोलाज-चित्रे आढळतात. त्यांत स्वातंत्र्यदेवता, पुढारी, आधुनिक वास्तूच्या समोर राधा-कृष्ण, गोपी अशीही गमतीशीर दृश्ये आहेत. संघाचे गोळवलकर, गुरुजी आणि हेडगेवार ह्या नेत्यांचे फोटो नाथद्वार चित्रावर चिकटवलेले आहेत. लाल किल्ल्यावर घोड्यावरून रपेट करणारे नेहरू, गांधीजींना आशीर्वाद देणारे श्रीराम, पाश्चात्त्य स्त्री आणि छत्री घेतलेला साहेब, सुदाम्याचे पोहे या विषयावरील प्रसंग चित्र असे नानाविध आणि हरतऱ्हेचे विषय कोलाज माध्यमातून हाताळले आहेत.

या चित्रांतील रंगसंगती आल्हाददायक आहे. जयपूर भित्तिलेपचित्रणपद्धती म्हणून ओळखले जाणारे तंत्र अनेक भित्तीचित्रांत दिसते. काही ठिकाणी पोशिंद्या किंवा दात्याच्या मृत्यूनंतर अपूर्ण चित्रकाम राहिले असल्याने रेखाटण्याच्या पद्धतीचा अभ्यासकांना उलगडा होतो. चित्रणासाठी चित्रकारांनी विविध रंगांचा वापर केलेला दिसून येतो. लाल रंगाकरिता रेड लीड, हिरव्या रंगासाठी ग्रीन कॉपर कार्बोनेट, निळ्या रंगाकरिता देशी नीळ इत्यादींचा वापर केलेला आहे. १८५० नंतर इमारती बाहेरची चित्रे चुना, काव अशा रंगांत केली आहेत. ह्या काळानंतर परदेशातील उद्योगधंद्यासाठी केलेले तयार रंगही वापरात येऊ लागले. आधुनिक काळात पांढरा किंवा इतर रंग भिंतीवर देण्याच्या पद्धतीमुळे, तसेच जुनी इमारत पाडून सदनिका बांधण्याच्या प्रक्रियेमुळे शेखावती चित्रे नष्ट होत आहेत. या कलावशेषांचे जतन होणे गरजेचे आहे. ऐतिहासिक वास्तूंचे जतन करण्यासाठी कार्यरत असणाऱ्या इंट्याक या संस्थेने १९८५-८७ दरम्यान त्यांची नोंदणी करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे.

संदर्भ :

  • Lamba, Abha Narain, Shekhawati: Havelis of the Merchant Princes, Mumbai, 2013.

https://www.youtube.com/watch?v=6C_82qDinco

समीक्षण : सु. र. देशपांडे