धार्मिक विधीच्या देखाव्याचे भित्तिचित्र, पाँपेई, इटली

भित्तिलेपचित्रणाच्या प्रमुख पद्धतीतील एक पद्धती. या पद्धतीला खरे (True) भित्तिलेपचित्रण अथवा सार्द्र भित्तिलेपचित्रण असेही संबोधितात. प्रागैतिहासिक काळातील गुहांमधील चित्रांपासून चालत आलेल्या भित्तिलेपचित्रण-तंत्राची साधारण मध्ययुगात इटलीमधे बॉन फ्रेस्को या पद्धतीमध्ये परिपूर्णता झालेली दिसते. या पद्धतीत गिलावा ओला असतानाच वा ओला असेपर्यंतच चित्र रंगविले जाते. गिलावा ओला असतानाच जलमाध्यमांतून लावलेले, चुनाविरोधी रंग खोलवर शोषून घेतले जातात आणि कायम टिकतात. ही तंत्र-पद्धती अधिक टिकाऊ असून त्यात प्रथम तयार केलेला गिलावा व वाळूचे थर दिले जातात (यात कधी कधी संगमरवरची बारीक भुकटीही वापरली जाते). पहिला जाडाभरडा थर (rough coat), दुसरा करडा थर (brown coat) असे थोडेसे खडबडीत व नंतरचा चित्राचा गुळगुळीत थर (intonaco) असे सलग तीन थर थापले जातात. पहिले दोन थर लावल्यावर ते कोरडे व टणक होऊ दिले जातात, ह्या दरम्यान चित्रकार भिंतीवर चित्राचे प्राथमिक स्वरूपातील कच्चे रेखाटन करून घेतो. त्यास ‘कार्टून’ अशी संज्ञा आहे. ते मूळ चित्राच्याच तंतोतंत आकारात असते व ते भिंतीवर ठेवून त्यानुसार बाह्य रेषांकन केले जाते. यानंतर तिसरा व शेवटचा मलमासारखा (intonaco) गिलाव्याचा समतल थर थापला जातो. हा गिलाव्याचा थर एका वेळेत जेवढे चित्रण पूर्ण करता येईल तेवढ्याच भागात दिला जातो. ह्या मलमासारख्या गिलाव्याच्या थरामध्ये काही तास तरी आर्द्रता राहते. हा गिलाव्याचा थर सुकण्याआधी त्यावर पाणी किंवा चुन्याच्या निवळीत मिसळलेले रंग, वासराचे केस अथवा डुकराच्या राठ केसांपासून बनवलेल्या कुंचल्याच्या साहाय्याने जलदीने लावले जातात. एकावर एक रंगाचा थर असे थर देऊन ह्या रंगांच्या थरांची जाडी वाढवली जाते. यात चुन्याच्या वाळण्याच्या रासायनिक क्रियेबरोबरच रंग गिलाव्याशी एकजीव होतात. या प्रक्रियेत चुन्याचा हवेतील कार्बोनेट आम्लांशी संपर्क होऊन तयार झालेले कार्बोनेट रंगद्रव्यांना कायमस्वरूपी बांधण्याचे अथवा संयोजकाचे कार्य करते, त्यामुळे गिलाव्याच्या पृष्ठभागावरील रंगद्रव्य कण वितळून त्याचे स्फटिकमय चकाकी असलेल्या पृष्ठात रूपांतर होते. ही चकाकी सार्द्र भित्तिलेपचित्रणाचे वैशिष्ट्य मानली जाते. गिलाव्यावरील रंग सुकल्यानंतर त्याचे रूपांतर खर पृष्ठात व फिकट छटेत होते. चुना-प्रतिरोधक असलेले रंग पूर्णतः मातीतील रंगद्रव्यांच्या श्रेणीपुरते मर्यादित असतात. अन्यथा गिलाव्याशी एकजीव होत नाहीत. जे खनिज रंग चुन्यावर प्रभावित होतात, असे रंग गिलावा कोरडा झाल्यावर मातीच्या रंगद्रव्यांवर दिले जातात. उदा., निळा खनिज रंग. हे चित्रण करणाऱ्या कलाकाराच्या तंत्र शैलीची मोठी कसोटीच असते; कारण गिलावा ओला असेपर्यंतच घाईने चित्र रंगवून पूर्ण करायचे असते, तसेच गिलावा सुकल्यानंतर केलेल्या चित्रणातील चुका दुरुस्त करण्यास अवधीही नसतो.

द ट्रिब्यूट ऑफ मनी, मॅसासिओ-ब्रँकाची चॅपेल, फ्लॉरेन्स, इटली.

ग्रीकमधील प्राचीन सार्द्र भित्तिलेपचित्रण पद्धतीची चित्रे आता नष्ट झाली आहेत. त्यामुळे ती प्रत्यक्ष पाहण्याकरिता उपलब्ध नाहीत. मात्र पाँपेई येथे आणि चीनमधील लियाँग व मांचुरिया आणि भारतातील अजिंठा येथील गुंफामधील चित्रणांमधून प्राचीन सार्द्र भित्तिचित्रणाची माहिती मिळते. इटलीतील अनेक चर्चमधील उदा., व्हॅटिकन सिटी येथील सिस्टाईन चॅपेल, स्पेनमधील सान क्लेमेंत चर्च येथील भित्तिचित्रणे अद्यापिही सुस्थितीत आहेत.

ओली दमट हवा या चित्रणाकरिता धोकादायक असते, तसेच प्रदूषित हवेमुळेही या चित्रांवर परिणाम होतो. मेक्सिकन भित्तिचित्रणकार दिएगो रिव्हेरा, होसे ओरोझ्को व रूफीनो तामायो यांनी या कलेचे यशस्वी रीतीने जतन केले आहे. भारतामधील राजस्थानी चित्रकारांनीही ही कला काही प्रमाणात जपलेली आहे.