प्रस्तावना : साथरोग हा शब्द ग्रीक भाषेतील Epidemic या शब्दावरून आलेला आहे. निर्दिष्ट केलेल्या लोकसंख्येची आरोग्यासंबंधी स्थिती किंवा घटनेचे विभाजन व परिणामकारक घटकांचा अभ्यास आणि आरोग्य समस्येवरील नियंत्रण म्हणजे साथरोगशास्त्र होय.

ध्येय :

  • लोकसंख्येतील आरोग्य आणि आरोग्य समस्यांचे प्रमाण व परिणाम यांचे विश्लेषण करणे.
  • रोग स्थितीचे कारण व कारणीभूत घटक शोधणे.
  • आरोग्यसेवा नियोजन कार्यवाही व मूल्यमापन करण्यासाठी आवश्यक माहितीचा पुरवठा करणे.

उपयोग : थ्रसफिल्ड एम. १९९५ (Thrusfield M 1995) अनुसार नमूद केले गेलेले साथरोगशास्त्राचे प्रमुख पाच उपयोग खालील प्रमाणे आहेत. परिचारिका आरोग्यसेवा पथकांसमवेत खालील प्रकारे नियोजन करतात.

  • ज्या रोगांचे कारण माहीत आहे अशा रोगांचा इतिहास शोधणे.
  • सामाजिक रोगनिदान व नियमन करणे.
  • रोगचा इतिहास व त्याविषयी माहिती संकलित करणे.
  • साथरोग नियंत्रण कार्यक्रमाचे नियोजन व अंमलबजावणी करणे.
  • आरोग्यविषयी धोरणांच्या आर्थिक निकषानुसार परिणामकारक व योग्य कार्यक्रम राबविणे.

साथरोगशास्त्र त्रयी (Epidemiological Triad) : साथरोगशास्त्राच्या अनुसार मानवामध्ये कोणताही रोग होण्यासाठी तीन घटकांमध्ये आंतरक्रिया असणे आवश्यक आहे ते म्हणजे कारक, यजमान व पर्यावरण या तीन घटकांना एकत्रितपणे साथरोगशास्त्र त्रयी असे म्हणतात. हे तीन घटक संसर्गजन्य रोगांच्या प्रसारास कारणीभूत ठरतात. यांपैकी एकाही घटकांची अनुपस्थिती असेल तर रोग होत नाही.

  • कारक (Agent) – रोग निर्मिती करणाऱ्या सजीव व निर्जीव घटकांना कारक असे म्हणतात. यामध्ये जीवाणू, विषाणू यांसारखे जैविक घटक; अति उष्णता, अति थंडी किंवा वातावरणातील आर्द्रता यांसारखे भौतिक घटक; शरीरातील विशिष्ट रसायने; प्रथिने, कर्बोदके, स्निग्ध पदार्थ, जीवनसत्त्व, क्षार, पाणी इत्यादी आहारातील घटक; तसेच गरिबी, व्यसनाधीनता, आरोग्यास अपायकारक सामाजिक रूढी व परंपरा अशा सामाजिक घटकांचा समावेश होतो.
  • यजमान (Host) – वय, लिंग, अनुवंशिकता, व्यवसाय, जीवनशैली, मानवी वर्तन इ. घटक यजमानाशी संबंधित असतात.
  • पर्यावरणव्यक्तीच्या सभोवतालच्या वातावरणास पर्यावरण म्हटले जाते. पर्यावरणीय असंतुलनाचा आरोग्य सुस्थितीवर विघातक परिणाम होतो व आरोग्याच्या समस्या उद्भवतात.

साथरोग अधिनियमन कायदा १८९७ : बुबोनिक प्लेग या रोगाचा प्रसार नियंत्रित करण्यासाठी १८९७ मध्ये सर्वप्रथम साथरोग अधिनियम कायदा करण्यात आला. हा कायदा रोगाचा प्रसार नियंत्रित करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यक असणारी विशेष शक्ती शासनाला प्रदान करतो व साथीच्या आजारांवर नियंत्रण ठेवण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडतो. या कायद्याचा स्वाइन फ्लू, कॉलरा, मलेरिया आणि डेंगू यासारख्या विविध रोगांची साथ नियंत्रणात आणण्यासाठी नियमित वापर केला गेला आहे. २००९ मध्ये  पुण्यात ‘स्वाइन फ्ल्यू’चा सामना करण्यासाठी याचा वापर करण्यात आला होता.

साथरोगशास्त्र परिचारिका : साथरोग शास्त्र या विभागामध्ये कार्यरत परिचारिकेला साथरोग परिचारिका असे संबोधले जाते. त्यासाठी परिचारिकेने सार्वजनिक आरोग्य पब्लिक किंवा समुदाय आरोग्य परिचर्येमध्ये पदव्युत्तर पदवी घेणे आवश्यक आहे. पीएच.डी. ला प्राधान्य दिले जाते. सामाजिक आरोग्य परिचारकेस प्रभावीपणे आपल्या कार्यक्षेत्रात दर्जात्मक आरोग्यसेवा पुरविण्यासाठी व समस्या जाणून घेण्यासाठी या शास्त्राचे सखोल ज्ञान असणे आवश्यक आहे.

साथरोग परिचारिकेमध्ये आवश्यक असलेली कौशल्ये :

  • गणिती व विश्लेषणात्मक क्षमता असणे आवश्यक असते.
  • संसर्गजन्य आणि असंसर्गजन्य रोगांचे ज्ञान व सखोल अभ्यास असणे गरजेचे आहे.
  • लोकसंख्येचे आरोग्य आणि आरोग्याशी निगडीत कल्याणकारी कामे करण्याची प्रबळ इच्छाशक्ती असावी.
  • धोकादायक लोकसंख्या (High-risk population) ओळखण्याची क्षमता असावी.
  • शासनाच्या आरोग्य विषयक धोरणांची अद्ययावत माहिती असणे आवश्यक आहे.
  • आरोग्यविषयक कार्यक्रमांची अंमलबजावणी तसेच आरोग्यसेवांची योजना तयार करण्याची क्षमता असावी.

साथरोग नियंत्रण उपचारांमध्ये साथरोग्यशास्त्र परिचारिकेची भूमिका : सामाजिक आरोग्य परिचारिका समाजामध्ये दररोज अनेक प्रकारच्या उच्चतम सेवा प्रदान करत असतात. सामुदायिक आरोग्य परिचारिकेस केवळ वैयक्तिक स्तरावर नाही तर कुटुंब आणि कुटुंबातील सदस्यांना आरोग्य सेवा प्रदान करण्याची जबाबदारी घ्यावी लागते. समाजामध्ये आरोग्यविषयक सेवा प्रदान करताना सामाजिक आरोग्य परिचारिकेमार्फत विविध प्रकारच्या महत्त्वाच्या भूमिका पार पाडल्या जातात, त्यांपैकी काही महत्त्वाच्या भूमिका खालील प्रमाणे.

  • समाजातील धोकादायक लोकसंख्या ओळखण्याचे महत्त्वपूर्ण काम सामाजिक सर्वेक्षणाद्वारे पार पाडते. उदा., समाजामध्ये गृह भेटीद्वारे covid-19 आजाराची लक्षणे असलेले रुग्ण शोधणे.
  • साथ रोगांच्या वाढीवर (Disease Progress) लक्ष ठेवण्याचे महत्त्वाचे कार्य साथरोगशास्त्र परिचारिकेमार्फत केले जाते.
  • आरोग्य सेवेशी निगडित आवश्यक क्षेत्रे निर्दिष्ट करणे.
  • साथरोग परिचारिकेद्वारे आरोग्य कार्यक्रमांची व्याप्ती आणि आरोग्याच्या प्राथमिक गरजा, आकार निश्चित करणे व आरोग्यविषयक कार्यक्रमांचे मूल्यांकन करण्याचे कार्य व जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली जाते.
  • समाजामध्ये साथरोग नियंत्रण आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी करणे.
  • साथरोग नियंत्रणाविषयी आरोग्य कार्यक्रमात सहभाग नोंदविणे व साथरोग नियंत्रणाबद्दल समाजामध्ये विविध गटांना आरोग्य शिक्षण देण्याचे महत्त्वाचे कार्य हे सामाजिक आरोग्य परिचारिकेद्वारे केले जाते.

 साथरोग नियंत्रणाबद्दल सामाजिक आरोग्य परिचारिकेच्या इतर महत्त्वाच्या भूमिका :

  • रुग्ण / काळजी प्रदाता (Care Provider) : साथरोगादरम्यान वैयक्तिक व कौटुंबिक आरोग्यसेवा समाजातील विविध घटकांना थेट प्रदान करण्यासाठी सामाजिक परिचर्या प्रक्रियेचा उपयोग सामाजिक आरोग्य परिचारिकेमार्फत केला जातो.
  • आरोग्य शिक्षक (Health Educator) : सामाजिक आरोग्य परिचारिका ही साथरोग कालावधीत समाजामध्ये सकारात्मक आरोग्य वर्तन बदलण्यासाठी आरोग्य शिक्षण देण्याचे निरंतर कार्य करत असते.
  • आरोग्य सेवा सल्लागार (Advocate) : साथरोगामुळे संक्रमित झालेल्या रुग्णाला किंवा समाजातील लोकांना साथरोगादरम्यान आचरण किंवा कृती बदल करण्यासंदर्भात आरोग्य सल्ला देण्याचे मोलाचे कार्य सामाजिक आरोग्य परिचारिके मार्फत केले जाते.
  • आरोग्य सेवा व्यवस्थापकीय भूमिका (Manager) : सामाजिक आरोग्य परिचारिका जेव्हा व्यवस्थापकीय भूमिका निभावते त्यावेळेस ती रुग्णाच्या आरोग्य सेवांचे व्यवस्थापन करणे व साथरोगाने प्रभावित रुग्णांची देखरेख व निरीक्षण करणे तसेच साहाय्यक आरोग्य कर्मचाऱ्यांची मदत घेऊन सामाजिक आरोग्य परिचारिकेच्या देखरेखीखाली प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र इ. ठिकाणी आरोग्य विषयक सोयी-सुविधांचे व्यवस्थापन करते. आरोग्यविषयक प्रदान केलेल्या आरोग्य सेवांचे मूल्यांकन प्रकल्प आयोजित करते.
  • आरोग्य सेवा सहयोगी (Collaborator) : साथरोगादरम्यान सामाजिक आरोग्य परिचारिका समाजातील आरोग्य कर्मचारी यांच्या सहयोगाने आरोग्य सेवा प्रदान करते तसेच समाजामध्ये साथरोगाबद्दल जनजागृती घडवून आणते. पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप या तत्त्वावर सामाजिक आरोग्य परिचारिका समाजामध्ये निरंतर आरोग्य सेवा देत असते.
  • आरोग्य सेवा गटनेता (Group Leader) : साथरोग कालावधीमध्ये सामाजिक आरोग्य परिचारिका आरोग्य कर्मचाऱ्यांचे गट नेतृत्व करते व अंगणवाडी सेविका, आशा समुदाय आरोग्य अधिकारी यांसारख्या आरोग्य कर्मचाऱ्यांना साथरोगादरम्यान आरोग्य सेवा देण्यासाठी प्रोत्साहन देते. गट नेतृत्व व प्रोत्साहन देण्याच्या कार्यामुळे सामाजिक आरोग्य परिचारिकेला बदल साधक (Change Agent) म्हणून संबोधले जाते.
  • आरोग्य सेवा संशोधक (Researcher) : सामाजिक आरोग्य परिचारिका साथरोग शास्त्रांमध्ये संशोधक म्हणून भूमिका बजावते. संशोधकाची भूमिका पार पाडताना सामाजिक आरोग्य परिचारिका समाजातील लोकांच्या समस्यांचे निराकरण करणे, आरोग्याशी संबंधित महत्त्वाची माहिती संग्रहित करणे आणि माहितीचे विश्लेषण करणे व सामाजिक आरोग्य परिचारिकांच्या सेवा निरंतर चालू ठेवण्याचे महत्त्वाचे कार्य पार पडते.

संदर्भ :

  • Sanjay Rahane, A Textbook of community Health Nursing-I .
  • www.arogya.maharashtra.gov.in

 समीक्षक : डॉ. रेश्मा देसाई