प्रस्तावना : मूलभूत परिचर्या व परिचर्या प्रक्रिया तत्त्वावर आधारित औद्योगिक किंवा व्यावसायिक कर्मचाऱ्यांना त्यांच्या आरोग्य समस्यांचे निवारण, प्रतिबंध करणे आणि आरोग्याचे संवर्धन करणे इ. सेवा शुश्रूषा त्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या नोकरीच्या ठिकाणी गरजेनुसार पुरविणे म्हणजे औद्योगिक किंवा व्यावसायिक आरोग्य परिचर्या होय.

उद्दिष्टे :

 • औद्योगिक कर्मचाऱ्यांना कारखान्यात काम करताना उत्पादन प्रक्रियेच्या दरम्यान किंवा कामाच्या ठिकाणी असलेल्या असुरक्षित वातावरणामुळे होणारे आजार, अपाय यांपासून त्यांचे संरक्षण करणे.
 • कर्मचाऱ्यास नेमुन दिलेले काम (job) हे त्याच्या शारीरिक, मानसिक व भावनिक पात्रतेप्रमाणे आहे किंवा नाही हे पाहणे.
 • औद्योगिक कर्मचाऱ्यांना व्यवसायामुळे होणारे आजार किंवा इजा झाल्यास त्याकरिता योग्य त्या आरोग्य सेवा पुरविणे.
 • आवश्यकतेनुसार पुनर्वसन सेवा पुरविणे.
 • कर्मचाऱ्यांना त्यांच्या व्यवसायामुळे होणाऱ्या आजाराखेरीज काही आजार असल्यास किंवा झाल्यास कंपनी व्यवस्थापनेच्या धोरणाप्रमाणे आरोग्य सेवा पुरविणे.
 • प्रत्येक कर्मचाऱ्यास कार्यक्षमतेनुसार काम करण्यासाठी आरोग्य संवर्धन करण्यास मदत करणे.
 • कर्मचाऱ्याच्या कुटुंबातील सदस्यांना गरजेनुसार कंपनी व्यवस्थापनेच्या धोरणाप्रमाणे आरोग्य सेवा पुरविणे.

कामगारांमध्ये आढळणाऱ्या आरोग्य समस्या

१ ) कामगार करीत असलेले काम किंवा तेथील वातावरण यांचा आरोग्यावर होणारा परिणाम :               

काही उत्पादन प्रक्रिया –

 • विषारी किंवा रासायनिक पदार्थ हाताळणे.
 • अति उष्ण किंवा थंड वातावरण, प्रखर उजेड किंवा प्रचंड आवाज.
 • स्वसंरक्षणासाठी वापरण्यात येणारी उपकरणे अथवा गणवेश इ.
 • सततची निरीक्षणे, गुणवत्तापूर्ण वस्तू निर्मिती (Quality Products) यामुळे येणारा ताणतणाव .
 • अपघात प्रवण जागा : कोळसा खाणी , जड यंत्रांवर काम करताना – कापणे, भाजणे, हात-पायाची बोटे तुटणे, हात किंवा पायाचा तुकडा पडणे, डोक्याला मार लागणे इ.
 • ताणतणाव : एकाच प्रकारचे किंवा एकाच मशीनवर काम केल्यामुळे (Monotonous work) येणारा ताण, एकमेकांतील व परस्पर संबध यातील समस्या .
 • ठराविक वयोगट : स्त्रिया व पुरुष कामगारांना होणारे विविध आजार.
 • कारखान्यातील संरचना (Organization) : कंपनीच्या चालीरिती, धोरण, सामाजिक वातावरण व वागणुकीचा कर्मचाऱ्यांवर होणारा सकारात्मक किंवा नकारात्मक परिणाम.
 • कारखान्यातील भौगोलिक संरचना व वापरात येणारा कच्चा माल : ज्या मुळे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष रीत्या कर्मचाऱ्याच्या शारीरिक अथवा मानसिक स्वास्थ्यावर परिणाम होतो.

 २) कर्मचाऱ्याचे वयोमान किंवा वागणूक  यामुळे उद्भवणाऱ्या आरोग्य समस्या :

 • श्वसनाचे आजार : ज्याचा कार्यक्षमतेवर परिणाम होऊ शकतो.
 • भाव -भावनांचा उद्रेक : कामगारांमध्ये वाद विवाद, मारामाऱ्या होऊ शकतात.
 • दारू पिणे, सिगारेट ओढणे, चरस, गांजा, गुटका घेणे इ. वाईट सवयी /व्यसने.
 • लैंगिक आजार – एच. आय व्ही –एड्स किंवा इतर लेंगिक समस्या.
 • खालील पातळीचे रहाणीमान (Low/poor standard of living).
 • शारीरिक व मानसिक विश्रांतीच्या अभावामुळे येणारी अस्वस्थता .
 • अति वजनाचा किंवा अति कमी वजनाचा आरोग्यावर होणारा दुष्परिणाम.
 • आजार होण्याच्या शक्यतेत वाढ होणे.

वरील सर्व कारणांमुळे खालील समस्या येऊ शकतात ज्याचा कामगार, त्याचे कुटुंब, कंपनी किंवा कारखान्याच्या उत्पादनावर परिणाम होतो.

 • व्यक्ती किंवा तिचे कुटुंबाची हेळसांड होते.
 • कामगार किंवा कर्मचाऱ्याचे कामावरील गैरहजेरीचे प्रमाण वाढते.
 • कार्यक्षमतेत घट झाल्यास कामातील समाधान कारकता कमी होते.
 • अकार्यक्षमतेमुळे कामगाराच्या कामाचे स्वरूप बदलणे भाग पडते.
 • स्‍त्री कामगारांचे गरोदरपण, बाळंतपण व मुलांचा सांभाळ सोबत असणाऱ्या आरोग्य समस्या इ.
 • वरिष्ठ अधिकारी, पर्यवेक्षक यांचे त्रासदायक व तणावपूर्ण दृष्टिकोनातून निर्माण होणाऱ्या मानसिक आरोग्य समस्या.
व्यावसायिक आरोग्य परिचारिकेसाठी आवश्यक कौशल्ये

व्यावसायिक आरोग्य परिचर्या – परिचारिकेची भूमिका

 • कामगारांच्या आरोग्य समस्या शोधणे (Assessment of industrial /occupation health hazards).
 • आपत्कालीन परिचर्या / सेवा शुश्रूषा ही त्या त्या औद्योगिक व्यवसायातील अपेक्षित आरोग्य समस्या /अपघाताचे स्वरूप यावरती अवलंबून सेवा पुरविणे. उदा. कामावर असताना होणारे मोठे किंवा छोटे अपघात.
 • आपत्कालीन नसलेल्या आरोग्य समस्यांसाठी परिचर्या पुरविणे. उदा., वैद्यकीय तपासणी करून हृदय रोग, श्वसनाचे आजार यावर उपाय योजना करणे.
 • आरोग्य शिक्षण देऊन आरोग्य समस्याचे निवारण, प्रतिबंध करणे, आणि आरोग्याचे संवर्धन करणे या बाबत जागरूकता निर्माण करणे. उदा., पोषक आहार घेणे, वजनाचे नियमन करणे, व्यसनांपासून दूर राहणे इ.
 • रोग प्रतिबंधात्मक सेवा : उदा., कामगाराच्या नियुक्तीच्या वेळी व सहा महिन्यात किंवा वर्षातून एकदा आरोग्य तपासणी करण्यात मदत करणे, कुटुंबातील सदस्य व मुलांना लसीकरणाच्या सेवा देणे. टी. बी., मधुमेह इ. साठी आरोग्य तपासणी करणे स्त्रियांची कॅन्सर साठी तपासणी इ. सेवा देणे.
 • विविध रोग प्रवण कामगार व इतर स्टाफ यांना विशिष्ट आरोग्य सेवा पुरविणे .
 • परिचर्या प्रक्रिया – १. कंपनीचे धोरण व नियम त्या त्या कंपनीच्या व्यवस्थापनाकडून समजवून घेणे. २. सुरक्षिततेचे नियम समजवून घेणे. ३. प्रथमोपचार सेवा देणे. ४. गृह भेटी देणे. ५. आरोग्य सेवा, रोग निवारण इ.विषयी परिषद भरविणे.
 • आरोग्य सेवा देताना विविध विभागाशी समन्वय राखणे. उदा. वैद्यकीय अधिकारी, मानसिक आरोग्य अधिकारी, कारखाना सुरक्षा अधिकारी, समुपदेशक, पुनर्वसन विभाग, सामाजिक व कल्याणकारी योजना अधिकारी, ई.एस.आय.एस (ESIS) अधिकारी इत्यादींमुळे वेळोवेळी कामगार/ कर्मचारी आणि पर्यवेक्षक यांना आवश्यकतेनुसार सेवा देणे, संदर्भ सेवा देणे इ. जबाबदारी परिचारिका पार पाडू शकतात.
 • आरोग्य सेवेचे परिचारिका रेकॉर्ड ठेवते. ज्यामुळे खालील बाबी स्पष्ट होतात. जसे, कर्मचाऱ्याचे आरोग्य विषयीचे अधिकार जपता येतात.
 • झालेले अपघात, त्यामुळे होणाऱ्या जखमांची कारणे इ. बाबत कायदेशीर पुरावे म्हणून उपयोग होतो.
 • परिचारिकेने रुग्णाची नोंद केलेली निरीक्षणे ही महत्‍त्वाची आणि प्राथमिक (first hand) निरीक्षण म्हणून गृहीत धरले जाते.

व्यावसायिक आरोग्य परिचर्येसाठी आवश्यक गुणवैशिष्टे :

 • परिचारिका मूलभूत परिचर्या ज्ञान, कौशल्य यावर आधारित परिचर्या व्यावसायिक कर्मचाऱ्यांना सेवा देण्याचे कौशल्य .
 • परिचारिका ही कारखान्यातील वातावरणाचा कर्मचाऱ्यावर होणारा शारीरिक परिणाम या विषयी अभ्यास करते. उदा. उष्णता, थंडी, आवाज-गोंधळ, तणाव इ.
 • तत्काळ ( Emergency) परिचर्या देण्यात निपुण असावे.
 • परिचारिकेला कारखान्यातील उत्पादन प्रक्रिया पद्धती विषयी माहिती असावी.
 • परिचारिकेला कारखान्यात वापरात येणारी  काही रसायने व त्याचा शारीरावर होणारा (विषारी) परिणाम (Biochemistry) या बाबत सखोल ज्ञान असावे .
 • परिचारिकेला आपत्कालीन परिस्थितीत त्वरित निर्णय घेऊन रुग्णाचा जीव वाचविण्यासाठी प्रथमोपचार देता यावा.
 • परिचारिका प्रशासकीय जबाबदारी घेते. आरोग्य सेवा कार्यक्रम नियोजन करून त्याकरिता व प्रथमोपचारासाठी लागणारा खर्च आयोजन व्यवस्थापनास कळविते.

संदर्भ :

 • Freeman, Community Health Nursing Practice.
 • K. Park, Preventive and Social Medicine.