बोव्हार, सीमॉन द : ( ९ जानेवारी १९०८ – १४ एप्रिल १९८६ ). फ्रेंच लेखिका, तत्त्वज्ञ, राजकीय कार्यकर्ती, स्त्रीवादी चळवळीची अग्रणी. त्यांचा जन्म पॅरिस, फ्रांस येथे एका मध्यमवर्गीय कॅथलिक कर्मठ कुटुंबात झाला. त्यांच्या शालेय शिक्षणाच्या काळात त्यांच्यावर ख्रिश्चन धर्माचा खूप प्रभाव होता. हा प्रभाव हळूहळू कमी झाला आणि त्यांनी स्वतःला नास्तिक म्हणवून घ्यायला सुरुवात केली. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना साहित्य आणि तत्त्वज्ञान या विषयांची आवड त्यांच्या मनात निर्माण झाली आणि त्यातूनच अस्तित्ववादाचा अभ्यास त्यांनी चालू केला. तत्त्वज्ञान विषयाचा सखोल अभ्यास करत असताना त्यांची भेट झां-पॉल सार्त्र नावाच्या तरुण विद्यार्थ्याशी झाली. अस्तित्ववादाच्या तत्त्वज्ञानाचा अभ्यास करणाऱ्या सार्त्रचा त्यांच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनावर नितांत प्रभाव राहिला. सीमॉन आणि सार्त्र यांच्यामध्ये निर्माण झालेले भावबंध शेवटपर्यंत कायम होते.
१९३० च्या दशकात सीमॉन यांनी तत्त्वज्ञान आणि साहित्य यांच्या अध्यापनाचे काम केले; परंतु दुसऱ्या महायुद्धाला सुरुवात झाल्यानंतर त्यांना प्राध्यापक पदावरून दूर करण्यात आले. १९४० नंतर त्यांनी साहित्याच्या क्षेत्रात पाय रोवण्यास सुरुवात केली आणि लवकरच त्या प्रथितयश लेखिका म्हणून उदयाला आल्या. त्यांच्या साहित्यप्रकारात कादंबरी, नाटक आणि निबंधलेखन यांचा प्रामुख्याने समावेश होतो. नंतरच्या काळात त्यांनी प्रवासवर्णन आणि आत्मचरित्रपर लेखन करायलाही सुरुवात केली. शी केम टू स्टे (१९४३), द ब्लड ऑफ अदर्स (१९४५), ऑल मेन आर मोर्टल (१९४६) या कादंबऱ्या; अमेरिका डे बाय डे (१९४८) आणि द लॉंग मार्च (१९५७) ही प्रवासवर्णने; मेमरीज ऑफ अ ड्यूटिफुल डॉटर (१९५८), द प्राइम लाइफ (१९६०), फोर्स ऑफ सर्कमस्टन्स (१९६३) व ऑल सेड अँड डन (१९७२) ही आत्मचरित्रपर पुस्तके ही त्यांची प्रमुख ग्रंथसंपदा आहे. १९४० च्या दशकात त्यांनी नियतकालिकांमध्ये निबंधलेखन आणि संपादन देखील केले. त्यांच्या लेखनाच्या आणि विचारांच्या केंद्रस्थानी मानवी नातेसंबंध आणि अस्तित्ववादाची विचारप्रणाली असल्याचे दिसते.
अस्तित्व हा मूलतत्त्वाच्या आधीचा टप्पा आहे, हा विचार हा अस्तित्ववादाचा गाभा आहे. सामाजिक व्यवस्थेचे स्वरूप व्यक्तीच्या आकांक्षा, त्याची निवड आणि त्याची कृती यांवर निर्धारित असते. सोप्या शब्दात सांगायचे, तर माणसाचे अस्तित्व आधी निर्माण होते व त्यानंतर तो जीवनाची मूलतत्त्वे निर्माण करतो. सार्त्रच्या बीइंग अँड नथिंगनेस या १९४३ साली प्रकाशित झालेल्या पुस्तकाच्या शेवटी अस्तित्ववादाची नीतितत्त्वे यावर विवेचन करावे, असे सार्त्रच्या मनात होते; पण ते पूर्णत्वाला जाऊ शकले नाही. सार्त्रचा हा अर्धवट राहिलेला प्रकल्प म्हणजेच सीमॉन यांचे १९४७ मध्ये प्रकाशित झालेलेएथिक्स ऑफ ॲम्बिग्यूइटी हे पुस्तक. जीवनातील संदिग्धतेविषयीचे नीतिशास्त्र मांडणारे. त्यांच्या इतर लेखनापेक्षा वेगळे, विचारप्रवर्तक असे हे एक महत्त्वाचे पुस्तक.
माणसाच्या वैयक्तिक जीवनात संदिग्धता का निर्माण होते, हे समजून घेणे तसे सोपे आहे. सद्यस्थितीतील माणसाची घडण व त्याचे निर्णय हे भूतकाळातील त्याच्या कृती आणि भविष्यकाळातील ‘तो’ याविषयीच्या त्याच्या कल्पना यांवर अवलंबून असते. मात्र भूतकाळातील ज्या गोष्टी किंवा घटनांचा सद्यस्थितीवर प्रभाव पडतो, त्या बदलणे शक्य नसते आणि सद्यस्थितीत घेतलेल्या निर्णयांचे भविष्यकालीन परिणाम निश्चितपणे सांगता येत नाहीत. या दोन्ही गोष्टींचे नैतिक दडपण कोणताही निर्णय घेताना येते. यामुळे व्यक्तीच्या वैयक्तिक जीवनात संदिग्धता निर्माण होते.
माणूस आणि त्याच्या भोवतालची सामाजिक व्यवस्था यांच्या परस्परसंबंधामध्ये अनेक वेळा संदिग्धता निर्माण होते. ही संदिग्धता का निर्माण होते, हे समजून घेणे अधिक महत्त्वाचे आहे; कारण माणसाच्या सामाजिक जीवनाची नीतितत्त्वे त्यावर अवलंबून आहेत. मानवाच्या जाणिवा त्याच्या अस्तित्वशी निगडित भौतिक गोष्टींवर (जसे‒संपत्ती, सामाजिक स्थान इ.) अवलंबून असतात. या भौतिक गोष्टींमुळे अनेक शारीरिक मर्यादा निर्माण होतात. मात्र व्यक्ती बौद्धिक क्षमतेमुळे या शारीरिक किंवा भौतिक मर्यादांवर मात करू शकतो. वैचारिक आणि बौद्धिक ताकदीने शारीरिक मर्यादांवर मात करण्याच्या कुवतीतून स्वातंत्र्य आणि नैतिक कर्तव्ये या दोन्हींचा उदय होतो. माणसाच्या मनात आपण स्वतः की इतर, व्यक्ती महत्त्वाची की समाज, आत्मिक सुख महत्त्वाचे की भौतिक सुख अशा स्वरूपाचे द्वंद्व कायम सुरू असते. त्याचप्रमाणे सामाजिक व्यवस्थेमध्येदेखील स्वतःचे स्वातंत्र्य महत्त्वाचे की समाजाप्रती असलेली नैतिक कर्तव्ये महत्त्वाची यातील द्वंद्वातून सामाजिक आणि वैयक्तिक स्तरावरदेखील संघर्ष निर्माण होतो. अशा संघर्षाच्या वेळी योग्य पर्याय कोणता, हे निवडणे अवघड असल्यामुळे आणि त्यासाठी कोणीही मार्गदर्शक नसल्यामुळे स्वातंत्र्य आणि नैतिक कर्तव्ये परस्परविरोधी आहेत, असे चित्र दिसते. अशा वेळी कोणता मार्ग निवडावा याविषयी सीमॉन यांनी काहीच मार्गदर्शन केलेले नाही. किंबहुना, कोणता मार्ग निवडायचा हे व्यक्तिसापेक्ष असते, असे सीमॉन यांचे म्हणणे आहे. आत्मनिष्ठता हे अस्तित्ववादाचे मुख्य तत्त्व आहे.
मात्र नैतिक कर्तव्य किंवा नैतिकता आणि स्वातंत्र्य या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. स्वातंत्र्य हा नैतिक कर्तव्याचा मूलभूत स्त्रोत आहे. स्वतःचे स्वातंत्र्य जपण्यासाठी इतरांचे स्वातंत्र्य जपण्याची गरज आहे. किंबहुना, स्वतःचे स्वातंत्र्य जपताना इतरांचे स्वातंत्र्य जपणे हे आपले नैतिक कर्तव्य आहे, ही जाणीव स्पष्ट असेल, तर स्वातंत्र्य आणि नैतिक कर्तव्ये यांमध्ये संघर्ष होणार नाही, असे सीमॉन यांचे म्हणणे आहे. स्वतःचे स्वातंत्र्य आणि इतरांचे स्वातंत्र्य या फरकातून स्वतःचे स्वातंत्र्य जपण्यासाठी दुसऱ्याचे स्वातंत्र्य हिरावून घेण्याची, त्याचे शोषण करण्याची वृत्ती निर्माण होते. हे टाळण्यासाठी स्वातंत्र्याकडे ‘नैतिक बंधन’ म्हणून बघितले गेले पाहिजे अन्यथा स्वातंत्र्य असणे निरुपयोगी ठरेल. या सार्त्रच्या विचारांचा सीमॉन यांच्यावर खूप प्रभाव असलेला दिसतो. स्वातंत्र्य हा व्यक्तीच्या आयुष्याचा अत्यंत मौलिक भाग असला, तरी खरे स्वातंत्र्य कशात आहे हे कळले नाही, तर माणूस खऱ्या अर्थाने स्वतंत्र होऊ शकणार नाही. स्वतःबरोबरच इतरांचे स्वातंत्र्य जपण्यातच खरे स्वातंत्र्य आहे. यामुळे सामाजिक जीवनातील संदिग्धता दूर होईल, असे सीमॉन यांनी त्यांच्या एथिक्स ऑफ ॲम्बिग्यूइटी या पुस्तकात म्हटले आहे.
सीमॉन यांच्या म्हणण्यानुसार नैतिकता व्यक्तिसापेक्ष असते. त्यामुळे नैतिकतेसंबंधीची संदिग्धता देखील व्यक्तिनिहाय असते आणि त्या समस्येतून मार्ग काढण्यासाठी प्रत्येक व्यक्ती तिच्या भौतिक आणि बौद्धिक क्षमतेनुसार उपाय शोधते. मात्र इतरांचे स्वातंत्र्य जपण्यातून आपल्या स्वातंत्र्याचे संवर्धन होते, अशा वस्तुनिष्ठ मुल्यांचा सीमॉन पुरस्कार करते. हे परस्परविरोधी आहे. तसेच नैतिकता व्यक्तिसापेक्ष असेल, तर योग्य-अयोग्य, नैतिक-अनैतिक, चूक-बरोबर यांचे निकष व्यक्तिगणिक वेगळे असणार. मात्र सीमॉन यांनी सर्वकाल आणि सर्व परिस्थितीत लागू होणारे कृतींची योग्यता आणि अयोग्यता ठरविणारे निकष मांडलेले आहेत. यामुळे नैतिकता व्यक्तिसापेक्ष असते, हा सीमॉन यांचा दावा मान्य करता येत नाही.
वरील सर्व पुस्तकांपेक्षा वेगळे असे १९४९ साली प्रसिद्ध झालेले द सेकंड सेक्स हे सीमॉन यांचे सर्वोत्तम आणि ज्ञात असेलेले पुस्तक आहे. वास्तविक स्त्रियांवर ग्रंथ लिहावा, असे त्यांचे उद्दिष्ट नव्हते. त्यांच्या इतर साहित्यातही त्यांनी उघडपणे स्त्रीवादी भूमिका घेतलेली दिसत नाही. या पुस्तकात मात्र त्यांनी स्त्रियांच्या संदर्भात अस्तित्ववादाचा सिद्धांत मांडला आहे. व्यक्तीचे अस्तित्व हे त्याच्या शरीराबरोबरच मानसिक जाणिवेवर अवलंबून असते, हे अस्तित्ववादाचे मूलभूत गृहीतक आहे. या सिद्धांताच्या आधारे त्यांनी स्त्री-पुरुष यांच्यातील सामाजिक भेद स्पष्ट केला आहे. स्त्रीला मिळणारे दुय्यम स्थान हे नैसर्गिक नसून ज्या प्रकारे तिला वाढवले जाते, तिच्यावर संस्कार केले जातात त्यातून ते निर्माण होते. स्वातंत्र्य, निर्णयक्षमता, तर्कनिष्ठता, आत्मविश्वास हे पुरुषांचे गुण मानले गेले असल्यामुळे ते गुण स्त्रीमध्ये रुजविले जात नाहीत. पुरुष स्वतःला आद्यतत्त्व व स्त्रीला दुय्यम तत्त्व समजतो. त्यामुळे पुरुष स्त्रीचे शोषण करतो. स्त्री-पुरुषांमधील भेदभाव, आपण स्त्री असल्याची सतत जाणीव आणि भोवतालच्या समाजाने पुरुषप्रधानता जोपासणे, संपूर्ण समाजव्यवस्थाच पुरुषकेंद्रित असणे या सगळ्यांत स्त्री समस्यांचे मूळ आहे. स्त्रीला सशक्त व सबला बनवायचे असेल, तर तिच्या मानसिकतेत बदल झाला पाहिजे. स्त्रीत्वाचा तिला अभिमान वाटला पाहिजे. ज्यामुळे ती ताठ मानेने आयुष्याला सामोरी जाऊ शकेल. सीमॉन यांच्या मते वैयक्तिक सुखापेक्षा वैयक्तिक स्वातंत्र्याला, त्यानुसार स्त्रियांच्या सुखापेक्षा स्त्रियांच्या स्वातंत्र्याला महत्त्व आहे. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे स्त्री ही जन्मत: नाही, तर ती घडवली जाते. अनेक स्त्रीसुलभ समजल्या जाणाऱ्या कृती निसर्गतः स्त्रीसुलभ नसून सामाजिक संस्कारांनी स्त्रीमध्ये रुजविल्या जातात. स्त्री व पुरुष यांच्यातील नैसर्गिक फरकांना अवास्तव महत्त्व दिल्यामुळेच त्यांच्या सामाजिक स्तरांमध्ये दरी निर्माण झाली आहे.
सीमॉन यांनी ज्या काळात स्त्रीविषयक लिखाण केले, त्या काळातील स्त्री चळवळ ही प्रामुख्याने स्त्रियांचे अर्थार्जनाचे हक्क, स्त्रियांचे राजकीय हक्क यांसाठी काम करत होती. मात्र या समस्यांचे मूळ स्त्रीचे सामाजिक स्थान दुय्यम असण्यात आहे याविषयी फारसा विचार केला गेला नव्हता व या स्वरूपाचे काही लेखन किंवा शोध-साहित्यही निर्माण झाले नव्हते. त्यामुळे सीमॉन यांचे विचार हे स्त्रीवादी चळवळीला एक वेगळी दिशा देणारे ठरले. या अर्थाने त्यांना स्त्रीवादी चळवळीची अग्रणी मानले जाते व त्यांच्या विचारांनी स्त्रीवादी अभ्यासात मोलाची भर घातली गेली, असे म्हटले जाते.
मात्र स्त्रियांच्या समस्यांविषयी विवेचन करताना पुरुषांच्या भूमिकेत कशाप्रकारे बदल व्हायला हवा याविषयी सीमॉन कोणतेही मुद्दे मांडत नाही. टीकाकारांच्या मते समाजामध्ये सन्मानाचे जीवन जगण्यासाठी स्त्रीसारखे जगणे, कुटुंब, मातृत्व यांना लांब ठेवणे याची गरज नाही.
सीमॉन यांच्या अनेक मुद्द्यांवर टीका होत असली, तरी स्त्रियांची मानसिकता बदलण्यात, त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण होण्यात, तसेच स्त्रियांचे स्त्रीत्व, त्यांचे कुटुंबातील स्थान, त्यांची पुनरुत्पादन क्षमता आणि त्याविषयी निर्णय घेण्याचा त्यांचा हक्क, कामाच्या ठिकाणी स्त्रियांचे होणारे शोषण अशा प्रश्नांविषयी जागरूकता निर्माण होण्यात सीमॉन यांच्या द सेकंड सेक्स या पुस्तकाचे मोठे योगदान आहे; कारण स्त्रियांच्या सामाजिक दर्जाची इतकी सखोल कारणमीमांसा पूर्वी कोणीही केली नव्हती.
त्यांचा पॅरिस येथे मृत्यू झाला.
संदर्भ :
- Bair, Deirdre, Simone de Beauvoir : A Biography, New York, 1990.
- Bauer, Nancy, Simone de Beauvoir : Philosophy and Feminism, New York, 2001.
- Fallaize, Elizabeth, The Novels of Simone de Beauvoir, London, 1988.
- Fullbrook, Kate; Fullbrook, Edward, Simone de Beauvoir and Jean-Paul Sartre : The Remaking of a Twentieth-Century Legend, New York, 1994.
- Le Doeuff, Michele, ‘Simone de Beauvoir and existentialism’, Feminist Studies, 6.2, 1980.
- Moi, Toril, Feminist Theory and Simone de Beauvoir, Oxford, 1990.
- Scholz, Sally J. On de Beauvoir, Belmont, 2000.
- Simons, Margaret, Beauvoir and the Second Sex : Feminism, Race and the Origins of Existentialism, Lanham, 1999.
- Internet Encyclopedia of Philosophy
- https://plato.stanford.edu/entries/beauvoir/
- https://philosophynow.org/issues/69/The_Ethics_of_Ambiguity
समीक्षक : लता छत्रे