दप्तरी, केशव लक्ष्मण : (२२ नोव्हेंबर १८८०—१९ फेब्रुवारी १९५६). प्रसिद्ध भारतीय ज्योतिर्गणितज्ञ, संशोधक आणि बुद्धिप्रामाण्यवादी विचारवंत. ‘भाऊजी दप्तरी’ या नावाने ते ओळखले जात. जन्म नागपूर येथे. आईचे नाव गंगाबाई. वडील लक्ष्मणराव ऊर्फ बापूजी नागपूरला शासकीय माध्यमिक शाळेत शिक्षक होते. त्यांच्याकडून भाऊजींना लहानपणीच प्राचीन ग्रंथांचे परंपरागत ज्ञान मिळाले.

दप्तरी यांनी गुरूगृही जाऊन महामहोपाध्याय भट्टजीशास्त्री घाटे व म. म. कृष्णशास्त्री घुले यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रहलाघव, सिद्धांतकौमुदी इत्यादी ज्योतिषशास्त्र व व्याकरणविषयक ग्रंथांचे अध्ययन केले. त्यांचे माध्यमिक शिक्षण नागपूर येथील नीलसिटी हायस्कूल व महाविद्यालयीन शिक्षण मॉरिस महाविद्यालयात झाले. इ.स. १९०० मध्ये त्यांनी गणित विषय घेऊन बी.ए. ही पदवी प्राप्त केली. त्यानंतर त्यांनी काही काळ (१९०१‒१९०५) नागपूर येथे पटवर्धन हायस्कूलमध्ये गणित, संस्कृत विषयांचे अध्यापन केले.

शिवदास कृष्ण बारलिंगे यांच्याजवळ त्यांनी संस्कृत, गणित व तत्त्वज्ञानाचे अध्ययन केले. इ.स. १९०४ साली दप्तरी कलकत्ता विद्यापीठाची बी.एल. ही परीक्षा उत्तीर्ण झाले, व त्यांना सरकारी नोकरीचे निमंत्रण आले. परंतु देशसेवेसाठी त्यांनी सरकारी नोकरी नाकारली. “सरकारी नोकरी स्वीकारणे हा माझा सामाजिक मृत्यू आहे”, असे ते म्हणत. १९०५ ते १९०८ या काळात काटोल येथे व त्यानंतर चांदा (चंद्रपूर) तसेच नागपूर येथे त्यांनी वकिली केली. काटोलच्या वास्तव्यात त्यांनी प्रत्यक्ष भूमिती, राज्यशासनशास्त्र व नागपूरला ग्रहगणितकुतूहल (१९१२) हे ग्रंथ लिहून पूर्ण केले. १९१३ साली त्यांनी भारतीय युद्धकालनिर्णय हा संशोधनात्मक प्रबंध लिहिला. तो १९१८ साली विविधज्ञान-विस्तारात प्रसिद्ध झाला. लो. टिळकांच्या विनंतीनुसार १९२० साली त्यांनी करणकल्पलता (पूर्वार्ध) हा संस्कृत ग्रंथ लिहिला. तो १९२५ मध्ये प्रकाशित झाला. या ग्रंथामुळे त्यांना ज्योतिर्गणिताच्या क्षेत्रात कीर्ती मिळाली. १९२० सालच्या असहकाराच्या चळवळीत त्यांनी वकिली सोडली. १९२१ मध्ये ते राष्ट्रीय महाविद्यालयाचे (नॅशनल कॉलेज) प्राचार्य झाले. तत्त्वनिष्ठ परिवर्तनवादी पंडित, धर्मनिर्णयमंडळ या संस्थेचे अध्वर्यू, नागपूर टिळक पंचांगाचे प्रवर्तक, मध्य प्रदेश संशोधन मंडळाचे उपाध्यक्ष, नागपूर होमिओपॅथिक व बायोकेमिक महाविद्यालयाचे पहिले प्राचार्य इत्यादी अनेकविध नात्यांनी दप्तरींनी केलेली कामगिरी अत्यंत उज्ज्वल स्वरूपाची आहे. म्हणूनच नागपूरच्या ‘विदर्भ साहित्य संघा’तील संदर्भकक्षास दप्तरींचे नाव दिले गेले. भाऊजी दप्तरींचे शेवटले व अत्यंत महत्त्वाचे असे कार्य म्हणजे त्यांचे उपनिषदविषयक ग्रंथ होय. ‘उपनिषदांचा वस्तुनिष्ठ व बुद्धिप्रत्ययक अर्थ’ (औपनिषदिक जीवनसौख्य, १९५७) हा उपसंहारात्मक ग्रंथ लिहून विषयाची परिपूर्ती केली. आपली उपनिषदभाष्येही भाऊजींनी बुद्धिवादाच्याच अधिष्ठानावरून लिहिलेली आहेत. १९३२ साली दिल्ली काँग्रेसला मध्यप्रांताचे प्रतिनिधी म्हणून गेले असता त्यांना अटक झाली व काही काळ तुरुंगवास भोगावा लागला. नागपूर विद्यापीठाने १९४१ साली दप्तरींना सन्मान्य डी.लिट्. पदवी दिली. महाराष्ट्र साहित्य परिषदेने १९४८ साली ‘विद्वदरत्न’ ही उपाधी देऊन त्यांचा गौरव केला.

वैद्यकशास्त्रातही मूलगामी प्रतिपादन करणारे ग्रंथ दप्तरींनी लिहिले आहेत. त्यांनी आयुर्वेद, ॲलोपॅथी वगैरे चिकित्सापद्धतीवरील ग्रंथ मिळवून त्यांचा सूक्ष्म व सप्रयोग अभ्यास सुरू केला. या अभ्यासातून त्यांनी “समचिकित्सा (होमिओपॅथी) हीच रोगपरिहाराची खरी चिकित्सा आहे” आणि “बाराक्षारपद्धती ही समचिकित्सेचीच एक सुगम व संक्षिप्त रीती होय”, असे निष्कर्ष काढले. आपल्या प्रतिपादनाकरिता त्यांनी चिकित्सा परीक्षण (१९७४), रहस्यवर्णन (१९४९), सच्चिकित्साप्रकाशिका (१९३६, १९५८, १९७६) हे ग्रंथ लिहिले. शिवाय त्यांचे युद्ध कालनिर्णय (१९१८), करणकल्पकता (पूर्वार्ध-१९२५, उत्तरार्ध-१९७५), धर्मरहस्य (१९२६), भारतीय ज्योतिःशास्त्रनिरीक्षण (१९२९), तत्त्वमीमांसापद्धति (१९३७), धर्मविवादस्वरूप (१९४०), जैमिन्यर्थदीपिका (१९४०), विद्वदरत्न डॉ. दप्तरी लेखसंग्रह (तीन खंड : १९६९, ७१, ७३) इ. ग्रंथ संशोधनाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत.

दप्तरी हे संस्कृत भाषेचे गाढे अभ्यासक होते. त्यांनी वेद, उपनिषदे, धर्मसूत्रे व धर्मशास्त्रे या मूळ संस्कृत ग्रंथांचे अर्थ अभिनव विचारांनी व पद्धतींनी लावले. त्यांनी केलेली प्राचीन ग्रंथांची विवरणे दुराग्रही परंपरावाद्यांना धक्कादायक वाटली, तरी दप्तरींचे सर्वांत मूलगामी योगदान धर्माच्या तत्त्वज्ञानात आहे. धर्म हा प्रामुख्याने समाज व त्याचे नियम यांच्याशी निगडित आहे, हे सिद्ध करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. धर्माचे बदलते नियम हेच सामाजिक स्थैर्याचे कारण असतात, हे त्यांनी आवर्जून सांगितले. भारतीय तत्त्वज्ञानाच्या परंपरेत त्यांनी सामाजिक पुनरुज्जीवनाला बळकटी आणली.

दप्तरी यांनी पारंपरिक मीमांसापद्धती नाकारली. पारंपरिक मीमांसापद्धतीवरील त्यांची टीका लक्षात घेतली पाहिजे. मीमांसाशास्त्रातील तत्त्वांचा व नियमांचा धर्मशास्त्रातील ग्रंथावर फार मोठा परिणाम झाला. आपस्तंबधर्मसूत्रे, स्मृतितत्त्व, निर्णयसिंधू हे ग्रंथ मीमांसेला धरून लिहिलेले आहेत. यात श्रीकण्ठ, श्री आद्यशंकराचार्य, श्रीमध्वाचार्य यांची बादरायणसूत्रावरील भाष्येही समाविष्ट आहेत. वेदांत्यांनी पूर्वमीमांसकांच्या काही तार्किक चुका दाखवून दिल्या असल्या, तरी वेद हे अपौरुषेय आणि स्वतः प्रमाण आहेत, ही भोळी समजूत ते नष्ट करू शकले नाहीत. शंकराचार्यांनीही ब्रह्म बुद्धिगम्य नाही असे ठरविले व ब्रह्मज्ञान बुद्धीच्या अधिकारापलीकडे नेऊन टाकले. शंकराचार्यांचीच री याबाबत पुढे रामानुजाचार्य व मध्वाचार्य यांनी ओढली. ते टिळक आणि गांधी युगाच्या संधीकाळातील महत्त्वाचे तत्त्वज्ञ होते.

निरनिराळ्या स्मृतींची एकवाक्यता करून त्यांचा अभिप्राय एकच आहे, हे ठरविण्याच्या कामी या सिद्धांताचा उपयोग होऊ लागला. दोन स्मृतीमंध्ये किंवा वेदातील दोन वचनांमध्ये किंवा श्रृतीस्मृतींमध्ये विरोधच असू शकत नाही म्हणून विरोध दिसत असला, तरी या वाक्यांची विषयव्यवस्था करून म्हणजेच त्या वाक्यांमध्ये पदरचे शब्द घालून तो मिटवावा, असे मत निबंधकारांनी प्रचलित केले. हीच परंपरागत समन्वयपद्धती होय. परस्परविरोध मिटविण्याच्या निबंधकारांच्या तीन युक्त्या आहेत. १) विषयभेद, २) कालभेद, ३) सामान्यविशेष व्यवस्था. समन्वयवाद्यांच्या या तीनही युक्त्यांचे दप्तरी खंडन करतात.

समन्वय व व्यवस्थित विकल्प यांत दप्तरी फरक करतात. ‘बळेच समन्वय न करता शिष्ट करतील व ठरवतील त्याप्रमाणे वागावे’, हे जैमिनीचे मत समंजस व ग्राह्य आहे, हे दप्तरींनी सिद्ध केले आहे. पूर्वपरंपरागत मीमांसापद्धतीला ते शाब्दिक मीमांसापद्धती म्हणतात.

धर्मातील वाद मिटवायचे असतील, तर आज ग्रंथप्रधान असलेले धर्मशास्त्र बुद्धीप्रधान बनविले पाहिजे, असे दप्तरी सांगतात. बुद्धीला मुख्य प्रमाण मानून धर्माधर्मविचार करण्याच्या पद्धतीला त्यांनी ‘तात्त्विक मीमांसापद्धती’ असे नाव दिले आहे. याची नऊ तत्त्वे आहेत, ती खालीलप्रमाणे :

१)    धर्म हा इहलोकांतील लोकयात्रेकरीताच आहे.

२)    धर्म बुद्धिगम्य आहे.

३)    बुद्धिगम्य धर्माप्रमाणे मनुष्य जे करेल त्याप्रमाणे सुख मिळेल.

४)    धर्माधर्मनिर्णयाच्या वेळी कोणाच्याही वचनात जे सांगितले असेल त्यापेक्षा बुद्धीने जे ठरेल, ते श्रेष्ठ आहे.

५)    धर्म बुद्धिगम्य आहे, असे मानणाऱ्यांच्या एकमताने तो धर्मग्राह्य आहे.

६)    या तज्ज्ञांच्या एकमताने अहिंसा, सत्य, अक्रोध व दान ही तत्त्वे सनातन आहेत.

७)    धर्माचे इतर नियम काल व परिस्थितीप्रमाणे बदलले पाहिजेत.

८)    संतांचे ज्या विषयी एकमत नसेल, त्या विषयी बहुजनांना ज्या संतांचे मत मान्य होईल, त्या प्रमाणे सर्वांनी वागावे.

९) ग्रंथ मार्गदर्शक आहेत.

मीमांसकांची धर्मकल्पना जैमिनीसूत्रात स्पष्ट केली आहे, मात्र शाबरभाष्यात शबराने अनेक ठिकाणी जैमिनीच्या अर्थाचा विपर्यास करून टाकला आहे, असे दप्तरी खेदपूर्वक सांगतात. शाबरभाष्यामुळे भारतीयांच्या धर्मविषयक कल्पना फार विकृत झाल्या, तसेच श्रीकुमारिल भट्ट व त्यानंतरच्या धर्मनिबंधकारांनी त्या भाष्यातीलच विचारांची वाढ करून धर्मकल्पना अधिकाधिक हानिकारक अवस्थेला पोहोचविल्या, असे त्यांचे म्हणणे आहे. म्हणून जैमिनीसूत्रांच्या खऱ्या अर्थाचे प्रतिपादन करणे त्यांनी आवश्यक मानले. त्यांनी स्वतःची धर्मकल्पना जैमिनीसूत्रांच्या अर्थाचे प्रतिपादन करताना मांडली आहे.

दप्तरींच्या मते धर्म हाच जैमिनीसूत्राचा विषय असून कर्मप्रवर्तक अर्थावरून म्हणजे मनातील भावावरून जो ओळखला जातो, तो पुरुषार्थ धर्म होय, असे जैमिनीला म्हणायचे आहे. पुरुषार्थ म्हणजेच पुरुष ज्याकरता झटतात ती गोष्ट, असे दप्तरी सांगतात. चोदना (प्रेरणा) म्हणजे वैदिक चोदना नाही. शब्द वस्तुस्थितीचे खरे ज्ञान करून देतो, म्हणून तो धर्माचे प्रमाण आहे असे मानणे चूक आहे, असे ते सांगतात. सर्वत्र शब्द किंवा ग्रंथ हे धर्माचे प्रमाण होत, असे जैमिनीला म्हणायचे नाही, असे ते सांगतात. व्यवहारात संतांच्या म्हणजे ऋषींच्या किंवा सत्यवक्त्या शहाण्यांच्या नियमामुळे, म्हणजे अमके शब्द प्रमाणभूत समजावे, अशी मर्यादा संतांनी ठरविल्यामुळे प्रमाणभूत चोदना वाक्यांचा संग्रह व्हावा, असे जैमिनीने मानले आहे, असे दप्तरी सांगतात. दप्तरींच्या मते चोदना एवढे एकच धर्माचे लक्षण नाही. पुरुषार्थ म्हणजे आत्यंतिक उच्चतम सुख हेदेखील त्याचे लक्षण आहे. चोदना अशाप्रकारच्या असण्याकरिता चोदना सांगणारा १) सत्यवक्ता, यथार्थवक्ता, २) यथार्थज्ञाता हवा. शबरस्वामींनी चोदना म्हणजे अपूर्व असा अर्थ घेतला व अपूर्वापासून वेदामध्ये सांगितलेले फळ उत्पन्न होते, असे मानले. दप्तरींच्या मते ही चूक तर झालीच, पण ह्याला शबरस्वामींच्या शब्दाशिवाय दुसरा कोणताच आधार नाही. चोदना ही क्रियाच आहे, एवढाच मूळसूत्राचा अर्थ आहे, असे दप्तरी सांगतात.

देवता व यज्ञ हे मनुष्यकल्पित आहेत, असे दप्तरी सांगतात. त्यांच्या मते जे कर्म किंवा अकर्म निःश्रेयस्कर असेल, ते धर्म होय. निःश्रेयस म्हणजे हित, कल्याण, कुशल होय. एकंदरीत धर्माच्या तीन व्याख्या त्यांनी सांगितल्या आहेत. १) जे कर्म किंवा अकर्म निःश्रेयस्कर असते ते धर्म, २) जे कर्म किंवा अकर्म निःश्रेयस्कर आहे असे कोणत्यातरी शब्दसमूहावरून समजते तो धर्म, अशी चोदना लक्षणधर्माची व्याख्या होय. त्यांच्या मते निःश्रेयस लक्षणधर्माचे ज्ञान असल्याशिवाय चोदनास्वरूप धर्म निर्माण करता येत नाही, ३) जे कर्म किंवा अकर्म निःश्रेयस्कर आहे असे वेदांवरून समजते, तो धर्म ही वैदिकधर्माची व्याख्या होय. चोदना म्हणजे प्रेरणा किंवा उपदेश होय. निःश्रेयस लक्षण व चोदना लक्षणधर्मांचा परस्पर संबंध स्पष्ट करताना दप्तरी सांगतात की, निःश्रेयस लक्षणधर्माचे ज्ञान असल्याशिवाय चोदनास्वरूप धर्म निर्माण करता येत नाही. अशा तऱ्हेने दप्तरी अहिंसा हा धर्म आहे, हे वेगळ्याच रीतीने पटवून देतात.

दप्तरी कर्मांना प्रवृत्ती व ज्ञानाला व तज्जनित वासनात्यागाला निवृत्ती म्हणतात. प्रवृत्तिनिवृत्तीसंयोग हे निःश्रेयस लक्षणधर्माचे खरे रहस्य आहे. हा सिद्धांत नवीन नसून वैदिक धर्मात फार स्पष्ट सांगितला आहे. परंतु वैदिक धर्माच्या विकृत अवस्थेत निवृत्तीलाच फार महत्त्व दिले गेल्याने भारतीयांचे फार नुकसान झाले आहे, असे ते सांगतात.

एकंदरीत धर्माचे परस्परभावना, अहिंसा व परोपकार हे सिद्धांत सिद्ध होतात. परस्परभावना व परोपकार यांत दप्तरी फरक करतात. परस्परभावनेत मोबदल्याचा स्पष्ट किंवा अस्पष्ट करार असतो; परंतु परोपकारात असा नसतो. परोपकारात कोणतातरी मोबदला मिळतोच. तो नैसर्गिक नियमांप्रमाणे मिळाल्याशिवाय राहात नाही; पण त्याबद्दल करार नसतो. म्हणून परोपकार व परस्परभावना भिन्न आहेत. ज्या कर्मापासून स्वतःचे व इतरांचे हित होते, ते कर्म धर्म्य होय. हा स्वपरहितैक्यसिद्धांत भारतीयांना फार प्राचीन काळीच कळून चुकला होता, असे दप्तरी सांगतात. आत्मौपम्य वर्तनाची धार्मिकता अधर्माचरणाला प्रतिबंध करण्यातदेखील सामावलेली आहे. हा प्रतिबंध साम किंवा दंड यांपैकी कशाने करावा, या प्रश्नाचे उत्तर देताना ते सांगतात की, सामाने केलेल्या प्रतिबंधामुळे दंडाने केलेल्या प्रतिबंधापेक्षा इतरांना आपल्याविषयी जास्त प्रीती उत्पन्न होईल म्हणून हेच इष्ट आहे. हिंसा म्हणजे दुःख ही कल्पना चुकीची आहे, असे ते म्हणतात. हिंसा म्हणजे दुःख असे मानल्यास दुसऱ्याला अधर्माचरणाविरुद्ध करावयाचा जो दंड, तो हिंसाच होईल. तसेच परस्परभावना सिद्धांताप्रमाणे जे वागायचे त्यात मोबदला घेणे हीपण हिंसाच होईल. मोबदल्याने दुःखाचा परिहार होतो व ते दुःख अप्रीती किंवा क्रोध उत्पन्न करू शकत नाही. हिंसा म्हणजे अहित, असा अर्थ दप्तरी सांगतात. दंडाच्या मोबदल्यात धर्माचरण व धर्मज्ञान मिळते म्हणून दंड हीपण हिंसा नव्हे. अपरिहार्य हिंसा हे धर्मतत्त्वच आहे व इंद्रियनिग्रह हा दीर्घदर्शित्वाचा प्रकार असल्याने धर्म आहे. त्यालाच दप्तरी आत्मत्याग असे म्हणतात. आत्मत्याग हे दूरदर्शित्वच असून वासनाभाव हाच आनंद आहे, हे समजल्याशिवाय बाह्यसुखाचा त्याग शक्य नाही. म्हणून हे ज्ञान धर्माचेच अंग होय.

एकंदरीत वैदिक धर्म निःश्रेयस लक्षणधर्माच्या विरोधी तर नाहीच, उलट प्राचीन भारतीयांच्या सामाजिक संस्थांचे पुनरुज्जीवन न केल्याने भारतीयांचा नाश झाला आहे, असा निष्कर्ष दप्तरींनी काढला आहे.

दप्तरींचे जीवनविषयक तत्त्वज्ञान त्यांच्या धर्मकल्पनेवरून निष्पन्न होते; कारण निःश्रेयसप्राप्ती हे मनुष्याचे जीवनध्येय आहे, असे ते मानतात. हे ध्येय प्राप्त करून घेण्यासाठी काय केले पाहिजे हे उपनिषदांमध्ये सांगितले आहे, असे ते मानतात. त्यांनी आपल्या उपनिषदभाष्यात उपनिषदांचा अर्थ करण्याची सर्वस्वी नवीन रीती अवलंबिली आहे.

दप्तरींनी बुद्धिवादी पद्धतीने उपनिषदविचारातून विधायक व कर्तव्यप्रेरक तत्त्वज्ञान सिद्ध केले आहे. जीवावस्थेत आनंदाचा अनुभव घेता येतो, म्हणून जीवित कायम ठेवण्याकरिता नेहमी कर्म करावे आणि सर्व जीवांशी अद्वैत बुद्धीने वागल्यानेच अत्यानंदाची प्राप्ती होते, हे दोन सिद्धांत उपनिषदात सांगितले आहेत, असे दप्तरी सिद्ध करतात. जीवाला निद्रा, स्वप्न व जागृती या तीन अवस्था असतात. त्या अवस्थांचे निरीक्षण करणे हीच उपनिषदांची रीती आहे, असे ते स्पष्ट करतात. उपनिषदे ही आनंदमीमांसा आहे, हे दप्तरी दाखवून देतात. आनंद म्हणजे वासनाभाव होय. त्यांनी ‘जागृतौवासनापायादत्यानन्द फलति।’, हे स्वरचित सूत्र उपनिषदांचे सार म्हणून सांगितले आहे. खऱ्या आनंदाचा अनुभव येण्यासाठी निरोगी शरीर आवश्यक आहे व त्यासाठी रोगचिकित्सा व रोगहरणाचा विचार समाजात संस्थारूपाने असणे व विकसित होणे दप्तरींनी आवश्यक मानले आहे. म्हणून दप्तरींचे वैद्यकशास्त्र हा दप्तरींच्या जीवनाविषयक तत्त्वज्ञानाचा आवश्यक भाग बनतो. लोकांचे आरोग्य खऱ्या औषधीशास्त्राने सुधारेल म्हणून सत्चिकित्सेचे स्वरूप उलगडणे, हे दप्तरींनी कर्तव्य मानले. त्यांनी आयुर्वेद, होमिओपॅथी व ॲलोपॅथी या तीनही उपचार पद्धतींचा सूक्ष्म व सप्रयोग अभ्यास करून व्याधिविपरीतार्थकारी चिकित्सा हीच खरी रोगहारक चिकित्सा होय, हे दाखवून दिले.

उपनिषदात न सांगितलेल्या गोष्टी हिंदूंमध्ये शिरल्याने आपली अवनती झाली, हे स्पष्ट दिसून येते, असे दप्तरी सांगतात. उपनिषदात अवतार, भक्ती, अपौरुषेयवाद, कर्मसंन्यास, समाधी व योग या गोष्टी सांगितलेल्या नाहीत. या हिंदू धर्मात शिरल्यामुळे हिंदूंची अवनती झाली, हे ते दाखवून देतात.

निःश्रेयस किंवा आत्यंतिक उच्चतर सुख हे धर्माचे साध्य ज्या समाजात साकार होईल, असा समाज साकारणे हे त्यामुळे माणसाचे ध्येय बनते. अशा समाजाची कल्पना व तो साकारण्याचे मार्ग दप्तरींनी सांगितले आहेत. दप्तरी असा समाज निर्माण करण्यासाठी क्रांतीची आवश्यकता मानत नाहीत. ते पुनरुज्जीवनवादी आहेत. प्राचीन भारतात अस्तित्वात असलेल्या सामाजिक संस्थांचे पुनरुज्जीवन करत राहिल्याने माणसाचे सुखाचे ध्येय साकार करणारा समाज निर्माण होईल व तो टिकून राहील, असा त्यांना विश्वास वाटतो. हे प्राचीन समाजाचे चित्रण त्यांच्या सोशल इन्स्टीट्यूशन ऑफ अँशिएंट इंडिया  (१९४७) या ग्रंथात सविस्तरपणे केले आहे.

दप्तरींनी प्राचीन ग्रंथांचे अर्थ लावण्यासाठी वापरलेल्या पद्धती व साधने त्यांच्या अर्थविवरणशास्त्राची उपांगे म्हणून दप्तरींच्या पद्धतीत समाविष्ट होतात. त्यांची खगोलशास्त्रीय पद्धती त्यांनी कालगणनेला लावून ऐतिहासिक माहिती मिळविली.

नागपूर येथे त्यांचे निधन झाले.

संदर्भ :

  • Daptari, K. L. Bodily Reactions and Examinations of Systems of Therapeutics, Bombay, 1949.
  • Daptari, K. L. The Astronomical Method and its Application to the Chronology of Ancient India, Nagpur, 1942.
  • Daptari, K. L. The Rationalistic and Realistic Interpretation of the Upanishads, Nagpur, 1958.
  • डोळके, ग. म.; दप्तरी, या. के. संपा. विद्वदरत्न डॉ. दप्तरी लेखसंग्रह, खंड पहिला, नागपूर, १९६९.
  • दप्तरी, के. ल. उपनिषदर्थव्याख्या, नागपूर, १९५९.

                                                                                                                                                                   समीक्षक : श्रीनिवास हेमाडे