ह्यूम, डेव्हिड : (७ मे १७११‒२५ ऑगस्ट १७७६). ब्रिटिश अनुभववादी परंपरेतील सर्वश्रेष्ठ विचारवंत; तसेच इतिहासकार, अर्थशास्त्रज्ञ आणि निबंधकार. एडिंबरो (स्कॉटलंड) येथे जन्मला. त्याची आरंभीची वर्षे एडिंबरो आणि ब्रिस्टल येथे गेली. वयाच्या बाराव्या वर्षी त्याने एडिंबरो विद्यापीठात प्रवेश घेतला आणि चौदाव्या वा पंधराव्या वर्षी तो त्या विद्यापीठातून बाहेर पडला. त्याच्या कुटुंबात आणि आजोळी कायद्याच्या अभ्यासाची परंपरा होती. कायद्याचा अभ्यास करण्याचा आग्रह त्यालाही झाला; तथापि त्याची ती आवड नव्हती. १७३४ मध्ये तो फ्रान्सला गेला. तेथे त्याने ए ट्रीटिझ ऑफ ह्यूमन नेचर (३ भाग, १७३९-४०) या ग्रंथाची रचना केली. ए ट्रीटिझ … मध्ये एक परिपूर्ण तत्त्वज्ञान मांडण्याचा त्याचा प्रयत्न होता. पुढे इंग्लंडला परतल्यावर त्याने एसेज; मॉरल अँड पोलिटिकल (१७४१-४२) हा ग्रंथ लिहिला. १७४४ मध्ये एडिंबरो विद्यापीठात नैतिक तत्त्वज्ञान ह्या विषयाच्या अध्यासनावर आपली नियुक्ती व्हावी, ह्यासाठी त्याने केलेले प्रयत्न अयशस्वी ठरले. त्यानंतर त्याने भ्रमंती सुरू केली. ॲन इंक्वायरी कन्सर्निंग ह्यूमन अंडरस्टँडिंग (१७४८; सुधारित आवृ. १७५८) आणि ॲन इंक्वायरी कन्सर्निंग द प्रिन्सिपल्स ऑफ मॉरल्स (१७५१) ह्या त्याच्या ग्रंथांचे लेखन ह्याच काळातले. १७५१ ते १७६३ ह्या काळात त्याचे वास्तव्य बव्हंशी एडिंबरोमध्येच झाले. ह्या काळात त्याने द हिस्टरी ऑफ इंग्लंड (१७५४‒६२) हा इतिहासग्रंथ लिहिला. १७६३ मध्ये तो पॅरिसमध्ये ब्रिटिश राजदूतावासात सचिव म्हणून काम करू लागला; पण नंतर सार्वजनिक जीवनाला कंटाळून तो एडिंबरोत परतला (१७६९). ए लाइफ ऑफ डेव्हिड ह्यूम  रिटन् बाय हिमसेल्फ हे आत्मचरित्रही त्याने तेथेच लिहिले. ते त्याच्या मृत्यूनंतर प्रसिद्ध झाले. तो अविवाहित होता. एडिंबरो येथेच तो निधन पावला.

ए ट्रीटिझ… ह्या ग्रंथाचे एकूण तीन भाग आहेत. आकलन हा पहिल्या भागाचा विषय. माणसाच्या ज्ञानप्रक्रियेचे स्पष्टीकरण देणे हा ह्या भागाचा हेतू. कल्पनांचा उगम, काल आणि अवकाश ह्यांसंबंधीच्या कल्पना, कार्यकारणभाव ह्यांचे विवेचन ह्या भागात आहे. दुसऱ्या भागात माणसाच्या वासनांचा (Passions) परामर्श घेतलेला असून माणसामधील भावनिकतेचे स्पष्टीकरण देण्यासाठी मानसशास्त्रीय यंत्रणेचे तपशीलवार प्रतिपादन केलेले आहे आणि मानवी विवेकाला ह्या यंत्रणेत दुय्यम स्थान दिलेले आहे. तिसऱ्या भागात ह्यूमचे नैतिकतेसंबंधीचे विचार आहेत.

ह्यूमच्या व्यक्तित्वाची घडण अठराव्या शतकातल्या आदर्श जीवनपद्धतीला अनुकूल होती. माणसाने आपली प्रकृती आणि आपल्या प्रवृत्ती समजून घेऊन आपली कुवत आणि परिस्थिती यांच्या मर्यादा ओळखाव्यात. आपल्या कृत्यांचे परिणाम काय होऊ शकतात, हे लक्षात घ्यावे आणि आपले सुख खरोखरी ज्यात असेल, ते साधण्याचा प्रयत्न करावा, ही ती आदर्श जीवनपद्धती. कोणताही अतिरेक, भावविवशता, उतावीळपणा, एकांगीपणा सुखाला अनुकूल नसतो. हा विचारही ह्या जीवनपद्धतीतलाच एक भाग होता.

नीतीच्या स्वरूपाविषयी ह्यूमचे प्रतिपादन असे होते की, नैतिक निर्णय हा बौद्धिक निर्णय नसतो. बौद्धिक निर्णय वस्तुस्थिती काय आहे हे सांगतो, तर नैतिक निर्णयाचे कार्य अमुक एक कृत्य चांगले आहे, असा निर्णय देण्याचे असते. नैतिक निर्णय माणसांच्या कृतीचे मार्गदर्शन करतात. तसेच माणसांना कृती करायला उद्युक्त करतात. वस्तुस्थिती काय आहे एवढे समजल्याने माणसाच्या हातून कृती घडत नाही. उदा., घराला आग लागली, ही वस्तुस्थिती कळल्याने माणसे घराबाहेर धावत नाहीत, तर जीव वाचवण्यासाठी धावतात. जीव वाचवण्याची इच्छा ही ह्यूमच्या भाषेत एक वासना आहे. असे घडल्यास आपल्याला सुख प्राप्त होईल आणि असे न घडल्यास दुःख प्राप्त होईल, ह्या जाणिवेतून वासना जागृत होतात आणि कृती करण्याची प्रेरणा मिळते.

ए ट्रीटिझ … हा ग्रंथ लिहिला गेला, तेव्हा त्या वेळच्या विचारविश्वात देकार्त, स्पिनोझा, लायप्निट्स ह्या विवेकवाद्यांचा एक प्रभावस्रोत होता. बुद्धीने प्राप्त झालेल्या स्वयंसिद्ध विधानांपासून निगमनाने निष्पन्न होण्यात विधानाचे प्रामाण्य सामावलेले असते, विज्ञानाची हीच खरी रीत आहे, अशी विवेकवाद्यांची भूमिका होती. दुसरा प्रभाव विख्यात भौतिकीविज्ञ सर आयझॅक न्यूटन ह्यांचा. त्यांच्या प्रायोगिक पद्धतीचा आदर्श ह्यूमपुढे होता. ह्यातून मानवी मनाचे खरेखुरे प्रायोगिक शास्त्र निर्माण होईल, ही त्याची अपेक्षा होती. तिसरा प्रभाव ब्रिटिश अनुभववादी तत्त्वज्ञांचा. इंद्रियानुभव हाच मानवी ज्ञानाचा एकमेव उगम असून ज्ञानाचे प्रामाण्य इंद्रियानुभवावर आधारलेले असते, असे अनुभववाद्यांचे प्रतिपादन होते. ह्यूमने ही अनुभववादी भूमिका शक्य तेवढ्या तर्कशुद्ध स्वरूपात, काटेकोरपणे मांडण्याचा प्रयत्न केला.

ह्यूमच्या मते विधाने दोन प्रकारची असतात : (१) कल्पनांमधील संबंधांविषयीची विधाने, (२) वस्तुस्थितीबद्दलची विधाने. कल्पनांमधील संबंधांविषयीची विधाने केवळ ह्या कल्पनांचे परीक्षण करून सिद्ध करता येतात. त्यांना अनुभवाचा आधार लागत नाही. उदा., गणितातील विधाने. विश्वात अमुक अमुक प्रकारच्या वस्तू असून त्यांचे स्वरूप असे असे आहे, असे मांडणारी विधाने वस्तुस्थितिविषयक विधाने होत. अशा विधानांना मात्र अनुभवाचा आधार आवश्यक असतो. आपला अनुभव आपल्याला वेदनांच्या (Sensations) स्वरूपात प्राप्त होतो. ही वेदने–ह्यूमचा शब्द इंप्रेशन्स–आपल्याला कशी प्राप्त होतात, ह्याबाबत काही सांगता येणार नाही; कारण ते सांगणारे विधान वस्तुस्थितीबद्दलचे विधान असेल; पण ते अनुभवाच्या पलीकडे असणाऱ्या वस्तूविषयी असणार. तेव्हा ते पूर्णपणे निराधार म्हणावे लागेल. म्हणून ह्यूम ह्या वेदनांना मूळ अस्तित्व म्हणतो.

आपल्या कल्पना आपल्याला तीव्र, तजेलदार, टवटवीत अशा मूळ वेदनांपासून प्राप्त झालेल्या असतात. अशा कोणत्याही वेदनांची क्षीण, फिकट प्रतिकृती म्हणजे त्या वेदनांची कल्पना. कोणत्याही कल्पना एकत्र करून संमिश्र कल्पना बनविणे शक्य आहे. पण ज्या साध्या घटक कल्पना एकत्रित केल्याने ती बनलेली असते, अशी प्रत्येक साधी कल्पना आपल्याला लाभलेल्या वेदनांची क्षीण प्रतिकृती असतेच. आपल्याला लाभलेल्या एखाद्या मूळ वेदनाची प्रतिकृती नाही, अशी साधी कल्पनाच असू शकत नाही. त्यामुळे आपण करीत असलेल्या विधानांचा अर्थ आपल्याला लाभणाऱ्या वेदनांपुरताच मर्यादित असतो.

ह्यूमचे असेही प्रतिपादन आहे की, आपण व्यवहारात वापरत असलेल्या द्रव्य आणि कार्यकारणभाव ह्या संकल्पना आपल्याला कोणत्याही मुळातील वेदनांपासून प्राप्त झालेल्या नसतात. म्हणजे त्या कोणत्याही मूळच्या वेदनांच्या प्रतिकृती नसतात. उदा., कोणाला ‘तांबडे’ हे वेदन प्राप्त झाले, तर एरव्ही तांबडेपणाचा गुण असलेली वस्तू येथे आहे, असे जे मानले जाते, त्या मानण्याला आधार नाही. तसेच अमुक एक घटना ही अमुक एका घटनेचे कारण आहे, अशा स्वरूपाची विधाने करायलाही काही आधार नसतो. तसेच विशिष्ट वेदने, कल्पना, भावना, इच्छा इ. एका आत्म्याच्या किंवा विषयीच्या (Subject) विशिष्ट अवस्था आहेत, असे आपण व्यवहारात मानत असलो, तरी ह्या आत्म्याचे वा विषयीचे वेदन आपल्याला लाभत नसल्यामुळे आत्म्याविषयीचे कोणतेही विधान आपल्याला करता येत नाही. विशिष्ट वेदने, कल्पना, भावना, इच्छा इत्यादींची एक मालिका, एवढेच आपल्या अनुभवाचे वर्णन आपल्याला करता येईल. थोडक्यात, बाह्य जगाचे वा अंतरात्म्याचे ज्ञान आपल्याला होऊ शकत नाही. ही अर्थात संशयवादी भूमिका आहे.

ह्यूमच्या भूमिकेला दुसरी एक बाजू आहे आणि तिचा संबंध मानवी प्रकृतीशी आहे. बाह्य वस्तूंचे अस्तित्व, त्यांचे स्वरूप त्याचप्रमाणे घटनांमधील कार्यकारणसंबंध ह्यांच्यासंबंधी आपण करीत असलेल्या विधानांना तार्किक आधार नसला, तरी मानवी प्रकृतीमध्ये त्यांना आधार असतो. उदा., ‘अ’ नंतर ‘ब’ ही घटना निरपवादपणे घडते, असा आपला अनुभव असेल, तर ‘अ’ आणि ‘ब’ ह्या घटनांमध्ये कार्यकारणसंबंध आहे, असे आपण मानतो. तसेच एखादे कृत्य सर्वांसाठी सुखदायक असल्याचा अनुभव आला, तर त्या प्रकारची कृत्ये चांगली असतात, असे नैतिक विधान आपण करतो. अशा विधानांना काहीही तार्किक आधार नसतो; पण मानवी प्रकृतीची घडणच अशी असते की, स्वभावजात मानवी प्रकृतीतून ती केली जातात.

अमुक एक कृत्य चांगले आहे, असा निर्णय घेणाऱ्या त्या व्यक्तीच्या मनात त्या कृत्याविषयी पसंतीची भावना निर्माण झालेली असते, असे ह्यूम म्हणतो. आता, ज्या कृत्यांबाबत आपल्या मनात पसंतीची भावना निर्माण होते, ती दोन प्रकारची असतात : (१) उपयुक्त ठरणारी कृत्ये, (२) परहितार्थ केलेली कृत्ये.

एखादे कृत्य समाजहितकारक म्हणून उपयुक्त असे असेल, तर त्या कृत्याबाबत आपल्या मनात पसंतीची भावना निर्माण होते आणि ते कृत्य चांगले आहे, असे आपण म्हणतो. पण ह्या संदर्भात एक बाब अतिशय महत्त्वाची आहे. समजा, ‘अ’ ह्या व्यक्तीने ‘ब’ ह्या व्यक्तीला काही मदत केली, तर ‘ब’ च्या मनात ‘अ’ च्या कृत्याबद्दल पसंतीची भावना निर्माण होईल; परंतु ‘ब’ ह्या व्यक्तीच्या मनातील ही पसंतीची भावना नैतिक निर्णय ज्या पसंतीच्या भावनेवर आधारलेला असतो, ती नव्हे. कारण नैतिक निर्णय घेताना जी पसंतीची भावना आपल्या मनात असते, तिचा त्या व्यक्तीच्या सुखदुःखांशी वा इच्छा-आकांक्षांशी काहीच संबंध नसतो. अमुक एक कृत्य समाजहिताचे आहे, असे दिसून आल्यास त्या कृत्याविषयी व्यक्तीच्या मनात पसंतीची भावना निर्माण होते. मग त्या कृत्यामुळे माझा प्रत्यक्ष काही फायदा झाला असो वा नसो.

ह्यूमच्या समोर असा प्रश्न होता की, जे नैतिक नियम आपण स्वीकारलेले असतात, नेमके तेच नियम आपण का स्वीकारलेले असतात? अशा अनेक कृत्यांविषयी आपल्या मनात पसंतीची भावना निर्माण होत असते आणि ह्या कृत्यांना आपण चांगली कृत्ये असेही म्हणतो; पण अशा ज्या वेगवेगळ्या कृत्यांविषयी आपल्या मनात पसंतीची भावना निर्माण होते, त्यांच्यात काही समान सूत्र आढळते काय? ह्यूमच्या मते हे सूत्र असे की, जे नियम पाळले गेले नाहीत, तर समाजस्वास्थ्यच नष्ट होऊन कोणालाच आपले हित साधता येणार नाही, अशा नियमांनुसार केलेली कृत्ये आपल्याला पसंत पडतात. हे नियम नसतील तर कोणतीही समाजव्यवस्थाच उरणार नाही. अगदी स्वतःच्या हिताचाच दूरवरचा विचार केला, तरीही स्वतःचे हित बाजूला ठेवून हे नियम पाळले पाहिजेत. ते पाळल्याने आपले तात्कालिक नुकसान होईलही; पण ते पत्करूनही हे नियम पाळावेत, हीच गोष्ट इष्ट ठरते. ह्यूमच्या मते आणखीही एक समान सूत्र आहे आणि ते म्हणजे ज्या गुणांनी समाजात स्वास्थ्य, शांतता, समाधान वाढीला लागेल, अशा गुणांविषयी वा कृतींविषयी आपल्या मनात पसंतीची भावना निर्माण होते. उदा., दयाळूपणा, क्षमाशीलता. ह्यांतील पहिल्या प्रकारातली कृत्ये ही सामान्य नियमांना अनुसरून केलेली कृत्ये होत. उदा., खरे बोलावे, चोरी करू नये. दुसऱ्या प्रकारातील कृत्ये ही विवक्षित असतात; पण त्यांची प्रकृती सामाजिक हित वाढविण्याकडे असते. उदा., दयाळूपणा.

ह्यूमच्या विचारांमागे अठराव्या शतकातील सामाजिक आणि नीतिनियम ह्यांच्यामागचे एक गृहीतकृत्य होते. ते असे की, मनुष्यस्वभाव ही एक ‘दिलेली’, स्थिर अशी गोष्ट आहे. ज्याप्रमाणे भौतिकी हे जडवस्तूचे एक शास्त्र आहे, त्याप्रमाणे मानवी मनाचेही शास्त्र निर्माण करता येईल. मनाच्या ह्या शास्त्रात सामाजिक शास्त्रे आणि नीतिशास्त्र हीही अंतर्भूत होतील. भौतिकीत जडवस्तूचे तिच्या अंतिम घटकांत विश्लेषण केले जाते आणि ह्या घटकांच्या वर्तनाचे नियम शोधून काढले जातात. त्याचप्रमाणे मानवी मनाचे अंतिम घटक शोधून काढले आणि त्यांच्या क्रिया-प्रतिक्रियांचे नियम निश्चित केले की, मानवी मनाच्या शास्त्राची बैठक तयार होईल. मानवी मनाचे हे अंतिम घटक म्हणजे वेगवेगळ्या संवेदना, वासना इ. होत. वासना हे मुळात असलेले अस्तित्व आहे, असे ह्यूमने म्हटले आहे. ह्यूमनंतर पुढे आलेल्या फ्रेंच विचारवंतांनी ही विचारसरणी स्वीकारून तिच्या आधारावर प्रचलित नीतिकल्पना आणि सामाजिक संस्था ह्यांच्या परिवर्तनाचा एक व्यापक कार्यक्रम उभारला. दनी दीद्रो हा ह्या विचारसरणीचा एक प्रतिनिधी होय.

ह्यूमने ईश्वराच्या अस्तित्वाचाही विचार केला आणि ईश्वराचे अस्तित्व सिद्ध करण्यासाठी योजण्यात येणाऱ्या अनुमानांत तर्कदोष कसे आहेत, हे दाखवून दिले. विश्वाच्या स्वरूपाचा उलगडा करण्यासाठी ईश्वराचा आधार अनावश्यक आहे, हेही स्पष्ट केले.

ह्यूमने इंग्लंडचा इतिहास लिहिला (हिस्टरी ऑफ इंग्लंड फ्रॉम द इन्व्हेजन ऑफ ज्यूलिअस सीझर टू द रेव्हलूशन ऑफ १६८८). हा इतिहास लिहिताना त्याचा मुख्य हेतू राजकीय होता. त्याला हे दाखवून द्यावयाचे होते की, त्याच्या काळात अस्तित्वात असलेला एकही राजकीय पक्ष इंग्लंडच्या ऐतिहासिक परंपरांचा एकमेव प्रतिनिधी असल्याचा दावा करू शकत नाही. ह्यूमची इतिहासाची कल्पना व्यापक होती. उदा., आपल्या इतिहासग्रंथात त्याने इंग्रजी साहित्याचा इतिहासही अंतर्भूत केला होता. तसेच इंग्रजांचा संगतवार इतिहास लिहिण्याचे श्रेयही त्याला प्राप्त झाले.

आपल्या राजकीय निबंधांतून ह्यूमने राजकीय पक्ष हे सिद्धान्तांच्या धर्तीवर उभे करण्याबद्दल मतभेद व्यक्त करून तसे करण्याऐवजी एखाद्या देशाच्या प्रत्यक्ष परंपरांच्या आधारावर राजकीय कार्यक्रम तयार करावेत, असे आग्रही प्रतिपादन केले आहे. राजेशाहीतल्या जुलमाला अधिक भ्यावे की झुंडशाहीच्या सत्तेला, हा जो प्रश्न ज्ञानोदयाच्या (Enlightenment) काळातल्या अनेकांना पडला होता, तसाच तो ह्यूमलाही पडलेला होता.

ह्यूमने अर्थशास्त्रीय विचारही त्याच्या काही निबंधांतून मांडले आहेत. कोणत्याही देशाच्या विकासासाठी त्या देशातल्या माणसांची ऊर्जा आणि उद्योगशीलता महत्त्वाची असते. तीतूनच सुखाची वृद्धी आणि नागर संस्कृती देशात नांदते, असे त्याचे मत होते.

संदर्भ :

  • Green, T. H.; Gross, T. H. Ed. The Philosophical Works of David Hume, 4 Vols., London, 1875.
  • Greig, J. Y. T. David Hume, London, 1931.
  • Hendel, Charles, W. Studies in the Philosophy of David Hume, rev. ed. Idianapolis, 1963.
  • Laird, John, Hume’s Philosophy of Human Nature, New York, 1932.
  • Mossner, E. C. The Life of David Hume, Austin, Texas, 1954.
  • Smith, Norman Kemp, The Philosophy of David Hume, New York, 1941.
  • Zabeeh, Farhang, Hume, Precursor of Modern Empiricism, The Hague, 1961.
  • रेगे, मेघश्याम पुंडलीक, पाश्चात्त्य नीतिशास्त्राचा इतिहास, पुणे, १९७४.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा