मानवशास्त्र हे एक शास्त्र आहे. त्याचे स्वरूप आणि व्याप्ती यांमुळे त्याची अभ्यासपद्धती ही जीवशास्त्र आणि सामाजिकशास्त्र यांच्याशी संबंधित आहे. जीवशास्त्रीय अभ्यासपद्धती ही आधुनिक प्रयोगशाळेतून जरी साकारत असली, तरी हा मानवाचा अभ्यास असल्याने या अभ्यासाची मुख्य पद्धत ही सामाजिकशास्त्राच्या परंपरेतील आहे. अभ्यास कोणत्याही पद्धतीचा असला, तरी एक नमुना म्हणून मानव किंवा मानवी समूहाशी संबंध येत असल्याने योग्य स्वरूपाचे परस्परसंबंध निर्माण होणे, हे अगत्याचे असते.
प्राचीन मानव आणि त्याच्या संस्कृतीविषयी अभ्यास करणे आणि खरीखुरी माहिती मिळविणे हे कठीण आहे. यासाठी उत्खननातून मिळणारे पुरावे हे सर्वांत महत्त्वाचे असतात. त्याला तर्क सुसंगत प्रतिपादन देणे गरजेचे असते; मात्र बरेचदा ती एकांगी होण्याची शक्यता असते. ज्या वेळी एखादा अभ्यासक एखाद्या जमातीमध्ये किंवा समाजात अभ्यासाच्या निमित्ताने जातो, त्या वेळी तो आपल्याकडे कशासाठी आला आहे किंवा तो प्रश्न का विचारतो आहे, यांविषयी लोकांच्या मनात शंका निर्माण होते. जर त्याच्या हेतूविषयीच शंका असतील, तर एकूण अभ्यासावरच त्याचा परिणाम होतो. संशोधक ज्या संस्कृतीत वाढला आहे किंवा त्याला ज्यांचा अभ्यास करायचा आहे, त्यांच्याशी त्याचे पूर्वीपासून चांगले संबंध असतील, तर संशोधनास अनुकूल परिस्थिती मिळते. तसेच त्याला ज्या समाजाचा अभ्यास करायचा आहे, त्या समाजाची भाषा त्यास चांगली अवगत असेल किंवा दोन्ही भाषांचा कोणी जाणकार मध्यस्थ असेल, तर अधिक योग्य स्वरूपाची माहिती मिळते. संशोधनाच्या या कामासाठी विविध अभ्यासपद्धती विचारात घेतल्या जातात.
ऐतिहासिक पद्धती : लोकजीवनशास्त्र अथवा सामाजिक आणि सांस्कृतिक जीवन कसे विकसित होत गेले, त्यामध्ये कधी व कसे बदल झाले या गोष्टी समाजाचा एक इतिहास म्हणून मानवशास्त्राला उपयुक्त असतात. कोणत्याही समाजाची लिखित माहिती मानवी जीवनाच्या वर्णनासाठी उपयुक्त असेल; मात्र या स्वरूपाची माहिती अधिक विश्वसनीय नसते. ऐतिहासिक पुरावे आणि त्यांचे वर्णन यांत तफावतही आढळते. लावलेले अर्थ बरेचदा चुकीचे व भावनिक स्वरूपाचेही असतात. त्यात कल्पनाविलास असू शकतो; मात्र ऐतिहासिक घटनांचा क्रम लावण्यासाठी त्याचा उपयोग होतो.
पुराणवस्तू संशोधन पद्धती : ऐतिहासिक पद्धती ही ऐतिहासिक घटनांवर प्रकाश पाडते; मात्र प्रागैतिहासिक काळातील संस्कृतीविषयी भाष्य करताना उत्खननातून मिळालेले पुरावे आणि अवशेष महत्त्वाचे ठरतात. उत्खननातून हत्यारे, नाणी, अलंकार, मूर्ती, चित्रे इत्यादी अवशेष मिळतात. त्यांच्या साह्याने संस्कृतीविषयी तर्क करता येतो. या अवशेषाना पुराणवस्तू असे म्हणतात.
तौलनिक पद्धती : संपूर्ण मानवजात हे मानवशास्त्रज्ञांची प्रयोगशाळा असते. यामुळे इतर कोणत्याही शास्त्रापेक्षा मानवशास्त्राला व्यापक क्षेत्र अभ्यासावे लागते. मानवी जीवनाच्या विविध अंगांच्या परस्पर संबंधाचा अभ्यास करावा लागतो. यात समुहासमुहानुसार तसेच वय, लिंग, परिस्थिती यांनुसार बदल होत असतो. त्यामुळे वर्तन प्रकारात साम्य-भेद दिसतात आणि त्याची कारणे शोधण्याची जबाबदारी मानवशास्त्रज्ञांवर असते. त्यामुळे ही पद्धत अत्यंत कठीण व गुंतागुंतीची होते. कोणत्याही घटनेचे, रूढीचे किंवा वर्तनाचे संदर्भ समाजानुसार वेगवेगळे असतात.
प्रत्यक्ष निरीक्षण पद्धती : प्रत्यक्ष निरीक्षण पद्धती ही जरी सोपी पद्धत वाटत असली, तरी तिचे यश निरीक्षण कोण करते, कशा परिस्थितीत करते आणि ज्याचे निरीक्षण केले जाते त्याची प्रतिक्रिया कशी आहे, या सर्वांवर अवलंबून असते. निरीक्षण हे व्यवस्थित, संपूर्ण, निर्दोष स्वरूपाचे असावे लागते. निरीक्षकाचे मत निरीक्षणाच्या विवेचनात प्रतीबिंबीत होऊ न देण्याची काळजी निरीक्षकाने घ्यायला हवी. कोणत्याही आदिवासी समाजात किंवा दुसऱ्या कुठल्याही समाजात गेल्यावर कोणत्याही कार्यक्रमाचे, परंपरेचे किंवा वर्तनाचे घाईघाईने निरीक्षण करून निष्कर्ष काढणे चुकीचे असते. योग्य निरीक्षणासाठी त्या समाजाशी घनिष्ट संबंध असते. काही दिवस त्या लोकांत राहून, संबंध जोडून त्यांचे निरीक्षण करणे केव्हाही चांगले. संस्कृतीचा अभ्यास करण्यासाठी त्या समाजाची संस्कृती आत्मसात करणे आणि त्या समाजाचा एक भाग बनणे हे अगत्याचे असते. यासाठी इरावती दिनकर कर्वे, व्हेरिअर एल्विन यांसारख्या मानवशास्त्रज्ञाच्या अभ्यासाचे दाखले खूप महत्त्वपूर्ण आहेत.
निरीक्षण करतानाच आवश्यक अशी माहिती आणि प्रश्नांची उत्तरे मिळविणे, मिळालेल्या माहितीची वास्तवता तपासणे गरजेचे असते. यासाठी पुढील पद्धतींचा वापर केला जातो.
कौटुंबिक वंशावळ पद्धत (जीनिओलॉजिकल मेथड) : यामध्ये समाजाच्या विविध कुटुंबांचा वांशिक इतिहास, वंशावळ काढणे, कुटुंबांची बारिकसारिक माहिती, नातेसंबंध आणि कुटुंबाची व्यवस्थित माहिती मिळविणे शक्य होते. त्यातून अभ्यासक्रमाचे काही निष्कर्ष काढता येतात.
ध्वनिमुद्रण पद्धती (रेकॉर्डिंग मेथड) : ज्या वेळी निरीक्षक अथवा अभ्यासक समाजातील व्यक्तीस माहिती विचारतो, त्या वेळी माहिती देणारा स्वतःच्या मातृभाषेत बोलत असल्यास आपली माहिती कोणत्याही अडचणीशिवाय मोकळेपणाने आणि योग्य शब्दांत सांगू शकतो. त्यामुळे त्याची विश्वसनीयता वाढते. ही माहिती जशीच्या तशी योग्य शब्दांत लिहिली गेली, तर त्याचा अर्थ लावणे सोपे जाते आणि ते संयुक्तिक होते. तंत्रज्ञानाच्या युगात माहिती लिहिण्याऐवजी ती ध्वनीमुद्रित करता येते किंवा त्याची चलचित्रफीत बनविणेही शक्य असते. या तांत्रिक पद्धतीमुळे विश्वसनीयता आणि अचूकता वाढते. शिवाय योग्य भाषांतर करणे, अर्थ लावणे यांसाठी त्याचा उपयोग होतो.
वेगवेगळ्या लोकांकडून माहिती मिळाली की, तिचा तौलनिक अभ्यास करून तिची सत्यता पटविणे आवश्यक असते. माहिती सांगणारा निवेदक काही विशिष्ट हेतूने, भावनाविवशतेने किंवा अभिमानात्मक माहिती सांगतो आहे का, तसेच त्याचा टीकात्मक सूर आहे की निर्विकार आहे इत्यादी बाबी समजून घेणे अगत्याचे असते. यांशिवाय ज्या जमातीचा अभ्यास करायचा आहे, त्या जमातीविषयी पूर्वी अन्य संशोधकांनी माहिती मिळवून प्रसिद्ध केलेली माहिती, तिचे स्वरूप, वास्तवता यांविषयी नोंद घेणे गरजेचे असते. शेवटी कोणतेही अनुमान काढण्यापूर्वी त्याचे परीक्षण करणे व वास्तवता तपासणे गरजेचे असते.
कार्यशोधक पद्धती : प्रत्येक संस्कृतीचे काही घटक असतात. त्याच्या कार्यावर भर देऊन संस्कृतीचा अभ्यास करता येतो. कोणतीही संस्कृती विचारात घेतली, तरी त्यात काही साधर्म्य आणि समान सूत्रे असतात. उदा., कोणत्याही समाजाच्या प्राथमिक गरजा या प्रजोत्पादन, बालसंगोपन, अन्ननिर्मिती, संरक्षण या आहेत. काही गरजा या साधनभूत स्वरूपाच्या असतात. ज्यामध्ये समाजातील कायदा व शिक्षण यांचा समावेश असतो, तर काही गरजा या संघटित स्वरूपाच्या असतात. उदा., समाजाचा धर्म, कला इत्यादी. या कार्यात्मक पद्धतीवरून मानवशास्त्रीय अभ्यास पूर्ण होत असतो.
या सर्व अभ्यासपद्धती मानवी जीवनाशी निगडीत आहेत. मानवी जीवन हे पूर्णतः संस्कृतीवर आधारित असते. संस्कृती म्हणजे काय हे समजल्यानंतर या अभ्यासपद्धतीचा अवलंब मानवशास्त्रज्ञ अधिक योग्य प्रकारे करू शकतो.
प्रयोगात्मक पद्धती : प्रयोगाच्या साह्याने प्रयोजक निरीक्षण करतो, यालाच प्रयोगात्मक किंवा प्रायोगिक निरीक्षण पद्धत असे म्हणतात. प्रायोगिक निरीक्षण हे घटना नियंत्रित निरीक्षण असते. येथे प्रयोजक विषयामध्ये योजनापूर्वक प्रत्यक्ष फेरबदल करून नंतर त्या फेरबदलाचे पद्धतशीर निरीक्षण करतो. हेच प्रायोगिक निरीक्षणाचे वैशिष्ट आहे. साध्या निरीक्षणापेक्षा प्रायोगिक निरीक्षण जास्त फलदायी असते. तसे पाहिल्यास प्रयोग हा निरीक्षणाचा एक प्रकार आहे. एका निरीक्षण प्रक्रियेचे साधे नैसर्गिक निरीक्षण व प्रायोगिक निरीक्षण असे दोन प्रकार पडतात. प्रायोगिक निरीक्षणात निष्कर्षाची निश्चितता अधिक असल्याने आज मानसशास्त्रासह सर्व सामाजिकशास्त्रांत शक्य असेल तेथे प्रयोगावर भर दिला जातो.
मानसशास्त्रीय पद्धतीचा अवलंब करण्यासाठी दोन व्यक्तिंची गरज असते. त्यातील एक म्हणजे प्रयोगकर्ता आणि दुसरी प्रयोगव्यक्ती. प्रयोग करण्यासाठी कृत्रिम रित्या विशिष्ट परिस्थिती निर्माण करावी लागते. जी परिस्थिती केव्हाही निर्माण करता येते व तिच्यात केव्हाही आपल्या कल्पनेनुसार बदल करता येतो, अशा परिस्थितीला स्वतंत्र परिवर्ती (इंडिपेंडंट वेरिएबल) म्हणतात. याचा परिणाम म्हणून जे वर्तन अनुभवता येते, त्याला अवलंबित्व परिवर्ती (डिपेंडंट वेरिएबल) म्हणतात.
मानसशास्त्रात अध्ययन, स्मरण-विस्मरण, तर्क, प्राण्यांच्या ठिकाणी असलेली विचारशीलता, अंध आणि अडथळ्याची जाणीव, बुद्धीमत्ता व बुद्धीमत्ता मापन इत्यादी मनोव्यापाऱ्यांचा व वर्तनाचा अभ्यास करण्यासाठी प्रयोग पद्धतीचा अवलंब केला जातो. प्रयोग पद्धतीच्या काही मर्यादा असल्या, तरी त्याची काही खास गुणवैशिष्ट्ये व फायदे आहेत. प्रयोग पद्धतीत घटनेची निर्मिती वारंवार करून आपल्या कल्पनेनुसार त्यात बदल करता येत असल्याने निरीक्षण काळजीपूर्वक करता येते व त्यातून मिळणारे निष्कर्ष जास्त वास्तव स्वरूपाचे असतात. प्रयोग पद्धतीत गुणाला परिणामाची जोड मिळत असल्याने संख्यात्मक स्वरूप देणे शक्य होते. यामुळे निष्कर्षाला अचूकता व निश्चितता येते. प्राण्यांच्या वर्तनाचा अभ्यास करण्यासाठी प्रायोगिक पद्धती खूपच उपयुक्त ठरते. मानवी वर्तन गुंतागुंतीचे असते. माणसाच्या वर्तनावर सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक इत्यादी घटकांचा प्रभाव पडत असल्याने या घटकांवर नियंत्रण ठेवून त्यात बदल करून विश्लेषण करणे कठीण असते. बालवर्तनाचा अभ्यास करण्यासाठी प्रायोगिक पद्धती उपयुक्त ठरेलच असे नाही.
प्रयोगाचा विषय कंटाळवाणा असेल, तर प्रयोग करणाऱ्या व्यक्तीचा उत्साह संपून जातो. तसेच प्रयोगातील प्रयोजन प्रयोग करणाऱ्या व्यक्तीला समजले, तर प्रयोग करणारी व्यक्ती एकांगी वृत्ती धारण करते. परिणामी निष्कर्षाच्या सत्यतेवर व निश्चीततेवर त्याचा परिणाम होतो. अशा प्रकारच्या काही मर्यादा असल्या, तरी प्रयोग पद्धती मानसशास्त्रात निश्चितच उपयुक्त आहेत. पशुमानशास्त्र, शारीरिक मानसशास्त्र, सामान्य मानसशास्त्र, असामान्य मानसशास्त्र या शाखांमध्ये प्रायोगिक पद्धतीमुळे आश्चर्यकारक निष्कर्ष प्राप्त झालेले आहेत.
समीक्षक : के. एम. भांडारकर