तय्यम : (तेय्याम, थेअम, थिय्यात्तम). भारतातील केरळ आणि कर्नाटक राज्यातील एक लोकप्रिय धार्मिक विधी. तय्यममध्ये अनेक प्राचीन परंपरा, विधी आणि प्रथा यांचे दर्शन होते. केरळ मधील पारंपरिक लोकनृत्य शैलीमध्ये तय्यम ही एक वैशिष्ट्यपूर्ण लोक नृत्यशैली आहे. संस्कृत शब्द ‘देवम’ याचा मल्याळम शब्द ‘तय्यम’ मानला जातो. तय्यम हे परमेश्वराचे नृत्य मानले जाते. या लोकनृत्यामध्ये प्रेत आत्म्यालाही  देवतांच्या रूपात प्रदर्शित केले जाते. दक्षिण भारतात प्राचीन काळामध्ये पूर्वज, वीर लोकांच्या आत्मा यांची पूजा करण्याची प्रथा प्रचलित होती. तय्यम हे विविध जातीच्या लोकांद्वारे आपल्या पूर्वजांची पूजा करण्यासाठी केले जाते. तय्यम मधील लोक स्वत: ला देवाचे वाहिनी (वाहक) मानतात आणि त्यामुळे तय्यमच्या माध्यमातून आशीर्वाद घेतले जातात. या नृत्यातील देवकुथु तय्यम हे नृत्य वगळता मुख्यत: ते पुरुषांद्वारे सादर केले जाते. देवकुथू हा तय्यम विधी फक्त स्त्रिया सादर करतात. तय्यम हे केवळ थेकुंबड कुलोम मंदिरात केला जातो.

केरळमध्ये तय्यम मुख्यत: कोलाथुनाडू भागात (सध्याचे कासारगोड, कन्नूर जिल्हे, वायनाडचा मन्नतवाडी तालुका आणि कोझिकोडचा कोयलैंडी तालुका) आणि दक्षिण केनारा तर कर्नाटकात कोडागुमध्ये सादर केला जातो. कर्नाटकातील भुता कोला म्हणून ओळखल्या जाणार्‍या मंगलोर भागातही तय्यम हे सादर केले जाते. तय्यम या लोकनृत्य शैलीचे अंदाजे ४५६ प्रकार आहेत, यामध्ये ११२ प्रसिद्ध आहेत. यामध्ये काही प्रसिद्ध तय्यम आहेत – वेट्टाक्कोरुमाकन, विष्णुमूर्ती तय्यम, गुलिकान, पदमादकी भगवती, काठीवनूर वीरां, मुचिलोत भगवती तय्यम, श्री मुथप्पन तय्यम, पडिकुट्टी अम्मा यांचा समावेश आहे. केकेएन कुरुप यांच्या मतानुसार आदिम, आदिवासी, धार्मिक उपासना या सर्व प्रमुख वैशिष्ट्यांमुळे तय्यमचा प्रवाह वाढला आणि तेथे इस्लामचे अनुयायीसुद्धा त्याच्या कार्यक्षेत्रातील पंथांशी संबंधित आहेत. लाखो लोक-धर्म उदाहरणार्थ, भगवती, देव देवींना तय्यममध्ये अजूनही महत्वाचे स्थान आहे. याशिवाय आत्मा-उपासना, पित्र -उपासना, वीर-उपासना, मसाथी-उपासना, वृक्षपूजा, पशुपूजा, सर्प-उपासना, रोगांच्या देवींची उपासना आणि ग्रामदेवतेची उपासना (ग्राम-देवता) या तय्यमच्या मुख्य कथा प्रवाहात समाविष्ट आहेत. यापैकी बहुतेक देवी भगवती (ब्रह्मणी, सरस्वती), वैष्णवी (लक्ष्मी) आणि शिवानी (पार्वती) या तीन मुख्य देवी आणि संयुक्त रूप असलेल्या भगवती म्हणून ओळखल्या जातात.

तय्यम नृत्याच्या साथीसाठी ढोल, मंजीरा, कुजल, पेरंबरा, शंख, चेरुतुती, उडूक्कु, चेर मंगलम, या वाद्यांचा उपयोग केला जातो. यामध्ये अधिक महत्त्वपूर्ण वाद्य  म्हणून तुडी या वाद्याला ओळखले जाते जे एका ढोलासमान असते. हे वाद्य वाजवणाऱ्यास ‘तुडीक्कारण’ किंवा ‘कोट्टूमुत्तरण’ म्हटले जाते. तालवादक हा तय्यम नृत्यनाट्य शैलीमध्ये निर्देशक या भूमिकेसोबतच लय, गती व नृत्यातील वेळ याकडे लक्ष ठेवत असतो. तुडीक्कारण याचे कला कौशल्य या लोककलांमध्ये नवीन उत्कर्ष निर्माण करतात. नृत्य किंवा आवाहन साधारणपणे गावच्या दर्शकांसमोर केले जाते. हे घरातील पितृपूजन म्हणून विस्तृत संस्कार आणि विधीसह देखील केले जाते. तय्यमच्या सादरीकरणासाठी कोणताही रंगमंच,पडदा किंवा इतर व्यवस्था केली जात नाही. दर्शक उभे राहून किंवा जमिनीवर बसून तय्यम पाहतात. थोडक्यात, तय्यमसाठी एक मुक्त व खुले रंगमंच असते. एखाद्या विशिष्ट दैवताचे महत्त्व आणि मंदिरातील श्रेणीनुसार त्या कामगिरीचे अंतर १२ ते २४ तासाचे असते. मुख्य नर्तक जो मंदिराच्या मध्यवर्ती देवतेचा प्रस्ताव ठेवतो त्याला विधींमध्येच रहावे लागते. पुढे, सूर्य मावळल्यानंतर, हा नर्तक त्या दिवसाच्या उर्वरित भागासाठी उपाशीपोटी कला सादर करतो. त्याची रंगभूषा ही विशेषज्ञ आणि इतर नर्तक करतात. तय्यमचा पहिला भाग सामान्यत: वेल्लाट्टम किंवा थॉट्टम म्हणून ओळखला जातो. हे योग्य रंगभूषा किंवा कोणत्याही सजावटीच्या पोशाखशिवाय केले जाते. या निमित्ताने केवळ एक लहान, लाल पोशाख घातला जातो. तय्यम या शैलीमध्ये वेशभूषेला ही विशेष महत्त्व आहे. कमरेभोवती बांधल्या जाणाऱ्या वस्त्राला ‘अरयोट्टा किंवा अटुक्कुम चिरकु’ असे म्हणतात. बांबूच्या काड्या एकत्र करून त्यांना लाल कपड्यांमध्ये बांधून हे कमरेभोवती बांधले जातात आणि त्याद्वारे नृत्यातील वेशभूशेमध्ये रंग व रुची याद्वारे त्यामध्ये आकर्षकता व भव्यता निर्माण केली जाते. तय्यम या नृत्य शैलीतील सर्व पात्र कटकम या नावाच्या बांगड्या घालतात. स्त्री व पुरुष हे दोन्ही कलावंत पायजमा घालतात. तय्यम या नृत्यातील कलाकार हे नारळाच्या झाडापासून बनवलेले तसेच स्थानिक परिसरातील मुरिक या लवचिक लाकडापासून बनवलेले दागिने वापरतात.

तय्यम या नृत्य  शैलीतील नायकाचा मुकूट याला मूवी असे म्हणतात, साधारणपणे ५ ते ६ फूट उंच असतो. भगवती आणि क्षेत्र पालन यामधील चरित्र या प्रकारचे मुकुट धारण करतात. हळद, खळ आणि ताडी यांना एकत्र करून विविध रंग दिले जातात. मुखत्तेजुत्तू म्हणजेच चेहरा रंगवणे हे तय्यम लोकनाट्य शैलीतील अनिवार्य अंग आहे. या शृंगारामध्ये चेहऱ्यावर विविध प्राण्यांचे व फुलांचे चित्र तयार केले जातात, ज्याद्वारे दर्शकामध्ये मध्ये भीती, भक्तिभाव, श्रद्धा हे भाव निर्माण केले जातात. या रंगामुळे कलाकार सादर करत असलेल्या पात्राचा पूर्ण परिचय दर्शकांना मिळतो. तय्यम या शैलीमध्ये उपलब्ध वस्तूंचा ही प्रयोग केला जातो ज्यामध्ये नारळाच्या झाडाचे विविध भाग, बारीक केलेला तांदूळ, कोळसा, हळद यांचा वापर केला जातो. प्रत्येक देवतांच्या चरित्रांसाठी वेगवेगळे रंग वापरले जातात. ब्रह्मदेवासाठी पिवळा रंग, विष्णूदेवासाठी हिरवा आणि निळा रंग, तर शिवशंकरासाठी निळा रंग वापरला जातो.

तय्यम या शैलीमध्ये मुखवटे यांचाही प्रयोग केला जातो. कलाकाराची भूमिका बदलण्यासाठी तसेच त्याची वास्तविकता लपवण्यासाठी पोत्तन आणि ओलिक्कन यांचा प्रयोग केला जातो. दर्शकांना देव-देवतांच्या अपार शक्तीचा परिचय देण्यासाठी ही प्रथा आजपर्यंत जिवंत आहे. २०१९ मध्ये कन्नूर जिल्ह्यातील कल्यासेरी येथील चांथापुरा येथे तय्यम संग्रहालय बांधण्यात आले.

संदर्भ :

  • Kerala Sangeetha Nataka Akademi , THEYYAM (a symposium), Lumiere Printing Works, Trichur, 1978.
  • Kurup, K. K. N., Theyyam – A Vanishing Ritual Dance of Kerala, Mittal Publications 1980.

Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.