हिमालय पर्वताच्या वेगवेगळ्या रांगांमध्ये असंख्य खिंडी आहेत. येथील खिंडी खाजगी व सार्वजनिक वाहतूक, व्यापार, संरक्षण तसेच राजकीय, लष्करी व भूराजनैतिक दृष्ट्या विशेष महत्त्वाच्या आहेत. या खिंडींमुळे त्या खिंडींच्या दोन्ही बाजुंकडील लोकांत माल, विद्या, कला, कल्पना यांची देवघेव होऊन त्यांच्यातील दुजाभाव कमी होतो. भारताच्या उत्तर सरहद्दीवर चीनच्या कुरापती दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामुळे भारताच्या उत्तर सरहद्दीकडे ज्या खिंडींमधून रस्ते गेले आहेत, त्या खिंडींना संरक्षण आणि भूराजनैतिक दृष्ट्या अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. हिमालयातील खिंडींमधून जाणाऱ्या रस्त्यांची विलक्षण नागमोडी वळणे, डोंगरकडे, बोगदे, पूल, दऱ्या, हिरवीगार दाट वनश्री आणि सभोवतालच्या परिसरातील हिमाच्छादित डोंगररांगा व शिखरे इत्यादी सर्वच गोष्टी प्रेक्षणीय असतात. तुफान हिमवृष्टीमुळे होणाऱ्या हिमाच्छादनामुळे हिवाळ्यात येथील बऱ्याच खिंडी वाहतुकीसाठी बंद ठेवाव्या लागतात.

हिमालय पर्वतरांगांमधील विशेषत: भारताच्या दृष्टीने अनेक खिंडी मत्त्वपूर्ण आहेत. त्यांमध्ये भारताच्या जम्मू व काश्मीर आणि लडाख हे केंद्रशासित प्रदेश, पाकव्याप्त काश्मीर, अक्साई चीन आणि चीनची सरहद्द या प्रदेशांत मिंटाका, किलिक, पर्पिक, सासेर, काराकोरम खिंड, खुंजेराब, अघिल, मर्पो, शक्सगम, बुर्झिल, कोने, केपसंग, डोमजोर, चांग ला, चर्डिंग ला (५,६९२ मी.) बनिहाल खिंड, खारडाँग ला, लानक ला, पीर पंजाल खिंड, कारा टॅग ला, इमिस ला, पेन्सी ला, झोजी ला खिंड या प्रमुख खिंडी आहेत. यांपैकी मिंटाका खिंड (४,७५५ मी.) काराकोरम पर्वतश्रेणीत, पाकव्याप्त काश्मीर व चीनची सरहद्द यांदरम्यान आहे. मिंटाकापासून पश्चिमेस ३० किमी.वर किलिक खिंड (४,७५५ मी.) आहे. प्राचीनकाळी काराकोरम पर्वत ओलांडून पामीर वा मध्य आशियाकडे जाण्यासाठी हुंझा घळईतील मिंटाका व किलिक या दोन खिंडी महत्त्वाच्या होत्या. पाकव्याप्त काश्मीर व चीन यांदरम्यान पर्पिक व खुंजेराब (४,९३४ मी.) या खिंडी आहेत. काश्मीर व लडाखमधून तिबेटकडे जाण्यासाठी सासेर (५,३३५ मी.) व काराकोरम (५,५८० मी.) खिंडी महत्त्वाच्या आहेत. भारताचा लडाख प्रदेश आणि चीनचा सिंक्यांग प्रांत यांच्या सीमेवर अघिल (४,८०५ मी.) खिंड आहे. ती के-टू शिखराच्या उत्तरेस आहे. पीर पंजाल पर्वतश्रेणीत, जम्मू-श्रीनगर रस्त्यावर बनिहाल खिंड (२,८३२ मी.) आहे. काश्मीरी भाषेत बनिहाल म्हणजे ‘बर्फाचे वादळ’. या खिंडीखालून १९५६ मध्ये जवाहर बोगदा काढला, तेव्हापासून या बोगद्यातूनच वाहतूक केली जाते. लडाख केंद्रशासित प्रदेशातील लडाख पर्वतश्रेणीत चांग ला (५,३६० मी.) व खारडाँग ला (५,६०२ मी.) या खिंडी आहेत. लेह आणि श्योक खोरे यांदरम्यान चांग ला खिंड आहे. चांग ला (चांग = उत्तर, ला = खिंड) म्हणजे उत्तरेकडील खिंड. या खिंडमार्गाने लेहपासून भारत-चीन सरहद्दीवरील पंगाँग सरोवरापर्यंत जाता येते. अनेक ठिकाणी हा खिंडमार्ग धोकादायक असल्याने वाहने अतिशय काळजीपूर्वक चालवावी लागतात. खारडाँग खिंड लेहच्या उत्तरेस असून श्योक आणि नुब्रा खोऱ्यांचे ते प्रवेशद्वार मानले जाते. जगातील सर्वाधिक उंचीवरील मोटारगाडी रस्त्यांपैकी या दोन खिंडीतून जाणारे रस्ते आहेत. हिवाळ्यात हिमाच्छादनामुळे या दोन्ही खिंडी वाहतुकीसाठी बंद असतात.

काराकोरम खिंड

भारताच्या अक्साई चीन सरहद्दीवर लानक ला खिंड आहे. लडाख व ल्हासा यांना जोडणारा रस्ता या खिंडीतून जातो. पीर पंजाल पर्वतश्रेणीत पीर पंजाल (३,४९४ मी.) खिंड (पीर की गली) आहे. या खिंडीतून जाणाऱ्या ‘मुघल रोड’ने काश्मीर खोरे राजौरी व पूंछ जिल्ह्यांशी जोडले गेले आहे. ही खिंड पर्यटनासाठीही प्रसिद्ध आहे. भारत-चीन यांच्या सरहद्दीवर, काराकोरम पर्वतश्रेणीत कारा टॅग ला ही खिंड आहे. इमिस ला ही लडाख प्रदेश तिबेटशी जोडणारी खिंड आहे. तुफान हिमवृष्टीमुळे नोव्हेंबर ते मध्य मेपर्यंत ही खिंड वाहतुकीस बंद असते. पेन्सी ला ही काश्मीर खोरे कारगिलशी जोडणारी खिंड आहे. भारताच्या लडाख या केंद्रशासित प्रदेशाच्या कारगिल जिल्ह्यात जोझी ला (३,५२८ मी.) खिंड अहे. जम्मू व काश्मीर आणि लडाख या दोन केंद्रशासित प्रदेशांना जोडणारा हा एक महत्त्वपूर्ण दुवा आहे. श्रीनगर आणि लेह (लडाखची राजधानी) या दोन नगरांना जोडणारा सुमारे ४३४ किमी. लांबीचा राष्ट्रीय महामार्ग जोझी ला या खिंडीतून जात असून हाच रस्ता लडाखमधून पुढे तिबेटपर्यंत जातो.

हिमाचल प्रदेशातील हिमालय पर्वतश्रेण्यांमध्ये बारा लाचा ला, देबसा, रोहतांग खिंड, शिपकी खिंड, कुंजम या प्रमुख खिंडी आहेत. त्यांपैकी बारा लाचा ला (४,४५० मी.) ही खिंड झास्कर पर्वतश्रेणीत आहे. हिमाचल प्रदेशातील मनाली आणि लडाख या केंद्रशासित प्रदेशातील लेह यांना जोडणाऱ्या महामार्गावर बारा लाचा ला खिंड आहे. या खिंडीतून जाणारा रस्ता पुढे चीन सरहद्दीपर्यंत जातो. हिवाळ्यात वाहतूक बंद ठेवावी लागते. कुलू आणि स्पिती खोरी देबसा (५,२७० मी.) खिंडीने एकमेकींना जोडली आहेत. कुलू-स्पिती यांदरम्यानच्या परंपरागत पिन पर्बती खिंडमार्गापेक्षा हा खिंडमार्ग जवळचा व सोपा आहे. पीर पंजाल पर्वतश्रेणीच्या पूर्व टोकाशी मनालीपासून ५१ किमी.वर रोहतांग (३,९७८ मी.) ही प्रसिद्ध खिंड आहे. कुलू, लाहूल व स्पिती खोरे यांना जोडणारा महामार्ग या खिंडीतून जातो. हा रस्ता मोठ्या प्रमाणावर लष्करी, सार्वजनिक व खाजगी वाहनांच्या वाहतुकीसाठी वापरला जात असल्यामुळे या मार्गावर नेहमी वाहतूक कोंडी होते. या खिंडीखालून काढलेला ९.०२ किमी. लांबीचा ‘अटल बोगदा’ ऑक्टोबर २०२० पासून वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. रोहतांग हे प्रमुख पर्यटन केंद्रही आहे. हिमाचल प्रदेश तिबेट यांच्या सरहद्दीवर शिपकी ला (४,७२० मी.) खिंड आहे. येथे भारताचे सरहद्द ठाणे असून काही इमारतीही येथे आहेत. या खिंडीजवळूनच सतलज नदी भारतात प्रवेश करते. हिवाळ्यात येथील वाहतूक बंद असते. हिमाचल प्रदेशातील कुंजम पर्वतरांगेत कुंजम खिंड (४,५५१ मी.) असून या खिंडमार्गाने लाहूल खोरे स्पिती खोऱ्याशी जोडले आहे. ही खिंड मनालीपासून सुमारे १२२ किमी.वर आहे.

भारताच्या उत्तराखंड राज्याच्या हिमालयीन भागात लिपुलेख, मान, मंगशा धुरा, नीती, मलिंग ला, मोहन, कुंग्रीबिंग्री या प्रमुख खिंडी आहेत. त्यांपैकी लिपुलेख (५,२०० मी.) ही खिंड

रोहतांग खिंड

भारत (उत्तराखंड), चीन (तिबेट) व नेपाळ यांच्या सरहद्दीवर आहे. उत्तराखंड तिबेटशी जोडणाऱ्या मान (५,६३२ मी.), मंगशा धुरा (५,६७४ मी.), नीती (५,८०० मी.) व मलिंग (५,६६९ मी.) या प्रमुख खिंडी आहेत. भारताने आपल्या लष्कराच्या दृष्टीने २००५ – २०१० या कालावधीत मान खिंडीतून रस्ता तयार केला आहे. ही खिंड बद्रीनाथ या तीर्थक्षेत्राच्या उत्तरेस ५२ किमी.वर आहे. कैलास-मानसरोवराला जाणारे यात्रेकरू लिपुलेख, मंगशा धुरा या खिंडींचा वापर करतात. मलिंग ला खिंड गंगोत्रीच्या उत्तरेस आहे. शिवालिकच्या सर्वांत दक्षिणेकडील आणि भूशात्रीय दृष्ट्या सर्वांत तरुण पर्वतरांगेत मोहन खिंड आहे. या खिंडीतून जाणाऱ्या रस्त्याने उत्तर प्रदेशातील सहारनपूर शहर उत्तराखंडमधील डेहराडून शहराशी आणि मसूरी या गिरिस्थानाशी जोडले आहे.

नेपाळमध्ये थॉराँग ला, कांग ला, मेसोकांटो ला, चो ला, रेंजो ला, काँग्मा ला, लार्क्य ला, लॉरीबिनायक ला, सेले ला, साल्पा ला, कोरा ला या खिंडी आहेत. नेपाळ-तिबेट यांच्या सीमेवर कोरा ला (४,५९४ मी.) ही खिंड आहे. गंडकी नदीने तयार केलेल्या काली गंडकी घळईमध्ये ही खिंड आहे. डोचू ला (३,१०० मी.), थ्रमसिंग ला, चोमोलारी, कूला कांग्री या भूतानमधील खिंडी आहेत.

नथु ला खिंड

भारताच्या सिक्कीम राज्यात नथू ला (४,३०० मी.) व जेलेप ला (४,३८६ मी.) या प्रमुख खिंडी आहेत. नथू ला ही सिक्कीम-तिबेट सीमेवरील हिमालयातील एक महत्त्वाची खिंड आहे. ती गंगटोकच्या ईशान्येस २४ किमी. असून तिच्यातून मोठ्या प्रमाणावर वाहतूक चालते. सिक्कीमहून चुंबी खोऱ्यात जाणारा रस्ता या खिंडीतूनच जातो. तिबेटच्या सरहद्दीवर असल्यामुळे लष्करी दृष्ट्या ही खिंड महत्त्वाची आहे. प्राचीन रेशीम मार्गाचा एक फाटा या खिंडीतून जात असे. नथू ला खिंडीच्या आग्नेयीस १० किमी.वर सिक्कीम-तिबेट सरहद्दीवर जेलेप ला खिंड आहे. या खिंडमार्गाने सिक्कीम राज्य तिबेटमधील ल्हासाशी तसेच पश्चिम बंगाल राज्यातील दार्जिलिंग व सिलिगुडीशी जोडले आहे.

भारताच्या अरुणाचल प्रदेशात बोम दी ला (४,३३१ मी.), बुम ला (४,६३३ मी.), दिहांग (४,००० मी.), याँगप, डीफर, कुमजाँग, हपुंगन, चाकण, तुंग, त्सेला, कांग्री कार्पो, दिफू या खिंडी आहेत. यांपैकी काही खिंडी अरुणाचल प्रदेशाच्या उत्तरेकडील तिबेटच्या सरहद्दीजवळ, काही खिंडी पूर्वेस म्यानमारच्या सरहद्दीवर, तर काही भूतान सीमेजवळ आहेत. डीफर खिंड भारत, चीन व म्यानमार या तीन देशांच्या सरहद्दींदरम्यान आहे. या खिंडीतून अरुणाचल प्रदेशापासून म्यानमारमधील मंडालेपर्यंत रस्ता जातो.

समीक्षक : नामदेव गाडे