भारताच्या लडाख या केंद्रशासित प्रदेशाच्या कारगील जिल्ह्यातील खिंड. समुद्रसपाटीपासून ३,५२८ मी. उंचीवर ही खिंड स्थित आहे. झोजी ला म्हणजे जोरदार हिमवादळ (ब्लिझर्ड) मुक्त पर्वतीय प्रदेशातील खिंड. लडाखी, तिबेटी आणि हिमालयीन बोलीभाषांमध्ये ‘ला’ म्हणजे ‘खिंड’. त्यामुळे हिमालयातील बहुतेक खिंडींच्या नावापुढे ‘ला’ असे वापरले जाते. खिंडीच्या नावापुढे ‘ला’ लावल्यानंतरही समजण्यासाठी अनावश्यक खिंड हा शब्द वापरला जातो.
पश्चिमेकडील जम्मू व काश्मीर आणि पूर्वेकडील लडाख या दोन केंद्रशासित प्रदेशांना जोडणारा हा एक महत्त्वपूर्ण दुवा आहे. पश्चिमेकडील श्रीनगर आणि पूर्वेकडील लेह (लडाखची राजधानी) या दोन नगरांना जोडणारा सुमारे ४३४ किमी. लांबीचा राष्ट्रीय महामार्ग या खिंडीतून जातो. हाच रस्ता लडाखमधून पुढे तिबेटपर्यंत जातो. या राष्ट्रीय महामार्गाने ही खिंड श्रीनगरपासून सुमारे १०० किमी. वर, तर सोनमर्गपासून केवळ १५ किमी. अंतरावर आहे. बालटाल, द्रास व कारगील ही या महामार्गावरील प्रमुख नगरे आहेत. श्रीनगरपासून द्रास १४० किमी. वर, तर कारगील २०० किमी. अंतरावर आहे. या खिंडीची दक्षिणेकडील चढण अत्यंत कठीण आहे.
झोजी ला खिंडीतून जाणारा श्रीनगर-लेह हा राष्ट्रीय महामार्ग पाकव्याप्त काश्मीरच्या ताबा रेषेजवळून (एलओसी) जात असल्याने लष्करी दृष्ट्या त्याला विशेष महत्त्व आहे; कारण लडाखमधील भारतीय लष्कराला रसद पुरविण्यासाठीचा हा एकमेव महत्त्वपूर्ण मार्ग आहे; परंतु दरवर्षी हिवाळ्यात होणाऱ्या तुफान हिमवृष्टीमुळे नोव्हेंबर ते एप्रिल-मे असे पाच-सहा महिने या खिंडमार्गे जाणारा रस्ता वाहतुकीस बंद ठेवावा लागतो. भारताच्या सरहद्द प्रदेशातील रस्त्यांच्या विकासाची आणि देखभालीची जबाबदरी ‘सीमा रस्ते संघटन’ (बॉर्डर रोड्स ऑर्गनायझेशन – बीआरओ) यांच्याकडे असते. हा खिंडमार्ग अधिक कालावधीसाठी वाहतुकीस खुला ठेवण्याचे प्रयत्न ‘बीआरओ’कडून केले जाते. त्यासाठी बर्फ कर्तक यंत्राच्या साह्याने रस्त्यावरील बर्फाचे जाड थर कापून रस्ता वाहतुकीस मोकळा करून दिला जातो. विशेषत: खिंडीमध्ये दोन्ही बाजूकडील कठीण बर्फाच्या उंच व उभ्या भिंती आणि त्यांच्यामधून जाणारा रस्ता हे चित्र विशेष रमणीय दिसते.
भारताच्या सीमा भागात अलीकडच्या काळात पाकिस्तानी आणि चिनी लष्कराच्या वाढत्या कुरापती, तसेच पाक पुरस्कृत दहशतवादी कारवायांमुळे भारतीय लष्कराच्या दृष्टीने हा मार्ग वर्षभर वाहतुकीस खुला असणे अत्यंत गरजेचे बनले आहे. या खिंडमार्गाने वर्षभर आणि अधिक गतिमान वाहतूक व्हावी या उद्देशाने झोजी ला बोगदा हा विशेष महत्त्वाकांक्षी प्रकल्प भारत सरकारने हाती घेतला आहे. जानेवारी २०१८ मध्ये या प्रकल्पास केंद्र शासनाकडून मान्यता देण्यात आली, तर मे २०१८ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या बोगद्याच्या कामास प्रारंभ झाला. अंदाजे पाच वर्षांत हे काम पूर्ण होणे अपेक्षित आहे. कारगील जिल्ह्यातील सोनमार्ग आणि द्रास या नगरांदरम्यान हा १४.२ किमी. लांबीचा बोगदा काढला जाणार आहे. हा बोगदा तयार झाल्यानंतर झोजी ला खिंडमार्गे जे अंतर कापायला तीन तासांपेक्षा अधिक वेळ लागतो, ते अंतर केवळ १५ मिनिटात कापले जाणार आहे. तसेच या मार्गाने वर्षभर वाहतूक सुरू राहणार आहे. जी आज पाच-सहा महिने बंद असते. ज्या वेळी हा बोगदा तयार होईल, त्या वेळी तो आशियातील सर्वांत लांब, दुहेरी बोगदा मार्ग ठरणार आहे. भारतीय लष्कराबरोबरच लडाखी लोकांच्या दृष्टीनेही हा बोगदा अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.
१९४७-४८ च्या भारत-पाक युद्धात पाकने ही खिंड बळकावली होती; परंतु भारतीय लष्कराने लगेचच तिच्यावर पुन्हा आपला कब्जा घेतला. १९९९ मध्ये झालेल्या कारगील युद्धादरम्यान झोजी ला खिंड आणि आसपासच्या परिसरावर पाक पुरस्कृत दहशतवादी आणि पाक लष्कराने अतिक्रमण केले होते; परंतु भारतीय लष्कराने ‘ऑपरेशन बायसन’ अंतर्गत झोजी ला खिंड आणि आसपासचा परिसर पुन्हा आपल्या ताब्यात घेतला होता.
https://www.youtube.com/watch?reload=9&v=pHJSKzCYpec
समीक्षक : वसंत चौधरी
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.