(.NET Framework; डॉटनेट फ्रेमवर्क; डॉटनेट रचना). मायक्रोसॉफ्ट कंपनीने विकसित केलेली सॉफ्टवेअर रचना. प्रामुख्याने मायक्रोसॉफ्ट विंडोज या ऑपरेटिंग सिस्टमला (क्रियान्वित प्रणाली; Operating System) चालविण्याकरिता तिचा वापर करण्यात येतो. भिन्न प्रोग्रामिंग भाषांमध्ये विकसित केले गेलेले अनुप्रयोग चालविण्यासाठी डॉटनेट रचना सामान्य व्यासपीठ प्रदान करते. थोडक्यात, ही एक रचना आहे जिच्या मदतीने विंडोजचे (Windows) अनुप्रयोग विकसित केले जातात आणि चालविले जातात

डॉटनेट फ्रेमवर्क

डॉटनेटचे घटक : डॉटनेट रचनेमध्ये अनेक क्लास लायब्ररी (Class Library) आहेत, ज्याला फ्रेमवर्क क्लास लायब्ररी (Framework Class Library; FCL) असे म्हणतात. तसेच हे अनेक प्रोग्रामिंग भाषेमध्ये भाषा परस्पर सहभाग (Language interoperability) प्रदान करते. येथे भाषा परस्पर सहभागाचा अर्थ प्रत्येक भाषेला दुसऱ्या भाषेत लिहिलेली आज्ञावली वापरता येईल असा आहे. डॉटनेट रचनेमध्ये लिहिलेली आज्ञावली कॉमन लँग्वेज रनटाइमच्या (CLR; सीएलआर) संगणक प्रणाली पर्यावरणामधे चालविण्यात येते. कॉमन लँग्वेज रनटाइम हे अनुप्रयोगावर आधारित आभासी यंत्र  (application virtual machine) असून, ते सुरक्षा (security), स्मृती व्यवस्थापन (Memory Management) आणि अपवादात्मक हाताळणी (exceptional handling) या सेवा प्रदान करते. अपवादात्मक हाताळणी ही संगणकातील एक प्रक्रिया असून त्यात अपवाद होण्याच्या क्रियेस प्रतिसाद दिला जातो. म्हणून डॉटनेट रचना वापरून ‍लिहिलेल्या संगणक कोडला व्यवस्थापित कोड (managed code) असे म्हणतात. कॉमन लँग्वेज स्पेसिफिकेशन (CLS), फ्रेमवर्क क्लास लायब्ररी, कॉमन लँग्वेज रनटाइम मिळून डॉटनेट रचना तयार होते. फ्रेमवर्क क्लास लायब्ररी वापरकर्त्यास परस्परसंवादी (user interface), माहितीत थेट प्रवेश (data access), डेटाबेस कनेक्टिव्हिटी (database connectivity), क्रिप्टोग्राफी (cryptography), वेब ॲप्लिकेशन डेव्हल्पमेंट (web application development), न्युमरिक ॲल्गाॅरिदम (numeric algorithm) आणि नेटवर्क कम्युनिकेशन (network communication) इ. सेवा प्रदान करते. डॉटनेट फ्रेमवर्क आणि इतर लायब्ररीसोबत मूळ कोड (सोर्स कोड; source code) वापरून आज्ञावलीकार सॉफ्टवेअर तयार करतात. मायक्रोसॉफ्टने डॉटनेटसॉफ्टवेअरकरिता समाकलित विकसित पर्यावरण (integrated developed environment) तयार केले आहे, त्याला आभासी स्टुडिओ (virtual studio) असे म्हणतात.

डॉटनेट तंत्रज्ञानाचे फायदे : विंडोज संगणक प्रणालीसाठी डॉटनेट आजच्या घडीला सर्वोत्तम व्यासपीठ प्रदान करते. ज्याच्या मदतीने जलद, सर्वोत्तम आणि सुरक्षित संगणक प्रणाली आराखडे (Software Design) तयार करता येतात. एकापेक्षा अधिक प्रोग्रामिंग भाषा आणि सर्व्हिस ओरिएंटेड आर्किटेक्चर्स (SOA) चे समर्थन करते. विकसकांसाठी (Developer) डॉटनेट, वेब संगणक प्रणाली (Web Software) आणि सेवा (Services), विंडोज डेस्कटॉप अनुप्रयोग यांच्या उभारणीसाठी एकात्मिक साधन संच पुरवतात. कंपन्यांमध्ये संगणक प्रणाली विकसित करण्यासाठी डॉटनेट हे स्थिर, प्रमाणजोगी (Scalable) आणि सुरक्षित पर्यावरण आहे. अंतिम वापरकर्त्यांसाठी डॉटनेट मध्ये बनवलेली संगणक प्रणाली अधिक विश्वसनिय आहे आणि अधिक सुरक्षित असण्यासह अधिक सुसंगत आहे. तसेच लॅपटॉप, स्मार्टफोन आणि पॉकेट पीसी सारख्या विविध उपकरणांना सहज समर्थन करतात. डॉटनेट मध्ये बरेच समर्थन साधने आहेत जे विकसकांना डॉटनेट विनियोग आणि घटक तयार करण्यास मदत करतात.

कळीचे शब्द :  #‍विंडोज #प्रोग्रामिंगभाषा #संगणक

महत्त्वाचे दुवे : https://dotnet.microsoft.com/

संदर्भ :

समीक्षक : विजयकुमार नायक