प्रॉटेस्टंट, अँग्लिकन, ईस्टर्न ऑर्थोडॉक्स इत्यादी २५० हून अधिक ख्रिस्तमंडळे (चर्चेस) अंतर्भूत असलेली आंतरराष्ट्रीय संघटना. जगातील विविध ख्रिस्तमंडळांमध्ये परस्परसामंजस्य, सहकार्य आणि एकात्मतेची भावना जोपासणे व ती वाढविणे हा ह्या संघटनेचा मुख्य हेतू. ह्या संघटनेची स्थापना ॲम्स्टरडॅम येथे १९४८ साली झाली. परस्परसामंजस्य, सहिष्णुता, सहकार्य ह्यांचे महत्त्व जाणून आंतरराष्ट्रीय पातळीवर एकत्र येण्याचे प्रयत्न १९४८ पूर्वी झालेले होतेच. १९३७ साली ऑक्सफर्ड आणि एडिंबरो येथे झालेल्या परिषदा ह्या संदर्भात निर्देशनीय आहेत. ह्या परिषदा ‘ऑक्सफर्ड कॉन्फरन्स ऑन ख्रिश्चन लाइफ अँड वर्क’ आणि ‘एडिंबरो कॉन्फरन्स ऑन फेथ अँड ऑर्डर’ ह्या नावांनी ओळखल्या जातात. १९३७ नंतरच्या दशकात उभ्या राहिलेल्या ‘प्रोव्हिजनल कमिटी फॉर द वर्ल्ड कौन्सिल ऑफ चर्चेस’ ह्या संघटनेने ‘वर्ल्ड कौन्सिल ऑफ चर्चेस’ ह्या संघटनेच्या पायाभरणीचे काम केले. ‘वर्ल्ड कौन्सिल ऑफ चर्चेस’ ह्या संघटनेची मुख्य कचेरी स्वित्झर्लंडमधील जिनीव्हा येथे आहे.
रोमन कॅथलिक चर्च, अमेरिकेतील सदर्न बॅप्टिस्ट चर्च ह्यांसारखी ख्रिस्तमंडळे ह्या संघटनेत नव्हती. १९६० मध्ये रोमन कॅथलिक चर्चने ख्रिस्ती ऐक्यासाठी एक समिती सुरू केली. तेव्हापासून, तसेच १९६२–६५ ह्या कालखंडातील दुसऱ्या व्हॅटिकन कौन्सिलनंतर रोमन कॅथलिक चर्च आणि वर्ल्ड कौन्सिल ऑफ चर्चेस ह्यांच्यातील संबंध व सहकार्याची भावना वृद्धिंगत होत गेलेली आहे.
अनेक वर्षे ह्या संघटनेत यूरोपीय आणि उत्तर अमेरिकन सदस्यांचा विशेष प्रभाव होता; परंतु १९६१ साली भारतात नवी दिल्ली येथे भरलेल्या ह्या संघटनेच्या तिसऱ्या सभेनंतर (Assembly) आशियाई, आफ्रिकन आणि लॅटिन अमेरिकन ख्रिस्तमंडळांचा प्रभाव वाढला. तसेच सोव्हिएट रशियाच्या कक्षेतील ख्रिस्तमंडळेही ह्या संघटनेत सहभागी झाली.
‘वर्ल्ड कौन्सिल ऑफ चर्चेस’ ह्या संघटनेच्या कामाचे तीन विभाग पडतात : (१) वेगवेगळ्या ख्रिस्तमंडळांचे परस्परसंबंध जोपासणे, (२) त्यांच्यांत ऐक्यभावना वाढीस लावण्याच्या कार्याला चालना देणे व त्या दृष्टीने संशोधन करणे, (३) आंतरराष्ट्रीय साहाय्य आणि निर्वासितांची सेवा.
ह्या विभागांच्या अंतर्गत विविध ख्रिस्तमंडळे, तसेच ख्रिस्ती समाजातील स्त्रीपुरुषांचे जीवन, कार्य व श्रद्धा ह्यांना पूरक ठरणाऱ्या बाबींसाठी अनेक मंडळे स्थापन करण्यात आलेली आहेत. ह्या संघटनेच्या सभेची बैठक दर सहा वर्षांनी भरविण्यात येते. ह्या बैठकीत सहा सह-अध्यक्ष आणि शंभर सदस्यांची एक केंद्रीय समिती नेमली जाते.
संदर्भ :
- Duff, Edward, The Social Thought of the World Council of Churches, New York, 1956.
- Hudson, Darril, The World Council of Churches in International Affairs, London, 1977.
- Schrotenboer, Paul, The Social Teaching of the World Council of Churches, Michigan, 1978.
- Vanelderen, Marlin, Introducing the World Council of Churches, 1991.