ऑगस्टीन, संत : (१३ नोव्हेंबर ३५४—२८ ऑगस्ट ४३०). एक ख्रिस्ती संत. ‘हिप्पोचा ऑगस्टीन’ ह्याचा जन्म उत्तर आफ्रिकेमध्ये सध्याच्या अल्जेरिया प्रांतातील तागॅस्ती (थागास्ते) येथे झाला. हा लहानसा गाव रोमन साम्राज्याची उत्तर आफ्रिकेतील उपराजधानी कार्थेजच्या नियंत्रणाखाली असून त्या वेळी लॅटिन भाषेचा तो प्रदेश होता. ऑरीलियस ऑगस्टायनस हे त्याचे लॅटिन नाव. त्याचे वडील पॅट्रीशिअस हे एक सामान्य रोमन मनुष्य; तर आई मोनिका ही बेर्बेर वंशातली सात्त्विक, पापभीरू साध्वी होती. ऑगस्टीन शिकून मोठा व्हावा आणि नावलौकिक मिळवावा अशी आईवडिलांची इच्छा होती आणि त्यानुसार त्याचे शिक्षण प्रथम तागॅस्तीच्या शाळेत व नंतर कार्थेजच्या विद्यापीठात झाले. हे सर्व शिक्षण मुख्यत: लॅटिन भाषा व वाङ्मययाचे असून ऑगस्टीनचे ध्येय वक्तृत्वकला संपादन करणे, हे होते. साहजिकच शब्दप्रभुत्व व अलंकारचातुर्य हे गुण अंगी बाणून ऑगस्टीन एक उत्कृष्ट वक्ता तयार झाला.

अभ्यास करीत असताना नगरीच्या विलासी जीवनात ऑगस्टीन रमू लागला. वैषयिक वृत्तीमुळे कार्थेजच्या मोहमयी नगरीत त्याला चांगलेच खाद्य मिळाले. आपल्याबरोबर त्याने एक रक्षा ठेवली आणि तिच्यापासून त्याला एक मुलगा झाला. त्याचे नाव ऑगस्टीनने ‘देओदातूस’ (देवाने दिलेला म्हणजे देवदत्त) असे ठेवले. हा त्याचा अनैतिक संबंध आईला मान्य नसल्याने तिने ऑगस्टीनचे एका कुलवधूशी लग्न लावण्याचे अनेक प्रयत्न केले. ऑगस्टीनला त्याच्यात काहीही महत्त्व वाटले नाही. त्याची अंतरीची ओढ आत्मसुखाची होती; त्याचा देह स्त्री-सुखासाठी आसुसलेला होता. अशा परस्परविरोधी वृत्तीमध्ये त्याची झालेली कुतरओढ आपण त्याच्याच शब्दात वाचतो, ती अशी : ‘‘मला विशुद्ध चारित्र्य आणि संयम दे; पण आत्ताच नको’’.

कार्थेजला आल्यावर ऑगस्टीनने सिसेरो या प्रसिद्ध तत्त्ववेत्त्याचा हॉर्टेन्शस हा ग्रंथ अभ्यासला. त्यामधील त्याने सांगितलेल्या परमसत्याचा आपण शोध करावा, असे ऑगस्टीनला वाटू लागले. त्यामुळे तो तत्त्वज्ञानाकडे वळला. कार्थेजच्या निवासात त्याच्यावर भौतिक-द्वैतवादी असलेल्या मणिसंप्रदाय (Manicheism)चा प्रभाव पडला. मणिसंप्रदाय म्हणजे बुद्धिवादाचा प्रकार. (कॅथलिक श्रद्धा त्याच्या विरुद्ध होती). आई कॅथलिक असल्याने ऑगस्टीन नावापुरता ख्रिस्ती होता. मणिसंप्रदाय तत्त्वज्ञान द्वैतवादानुसार चांगले आणि वाईट (दुष्ट) अशी परस्परविरोधी दोन स्वयंसिद्ध तत्त्वे मांडत. ऑगस्टीनच्या आईला ऑगस्टीनला मणिसंप्रदायचे झालेले आकर्षण पसंत नव्हते. ‘पाप स्वयंसिद्ध दुष्ट शक्तीतून लादले जाते’ अशी ऑगस्टीनने स्वत:ची समजूत करून घेतली होती व त्यानुसार तो बेजबाबदार व स्वैर जीवन जगत होता. मणिसंप्रदायचे तत्त्वज्ञान त्याच्या स्वैर वागण्याला सोईस्कर पडत होते. मित्रमंडळींसह त्याने या तत्त्वज्ञानाचे सांप्रदायिकत्व स्वीकारले. पण हळूहळू त्या तत्त्वज्ञानाची निष्फळता व निरर्थक कृती त्याला जाणवली व त्याची निराशा सर्वांना दिसू लागली.

कार्थेज सोडून रोमला जाण्याचे त्याने ठरवले; पण ह्याला त्याच्या आईचा विरोध होता. तरी आईला फसवून ऑगस्टीन रोमला आला असताना एका जीवघेण्या आजारातून तो कसाबसा वाचला. रोमहून मिलान शहरातील महाविद्यालयात अध्यापक पदासाठी त्याने अर्ज केला व ती जागा त्याला मिळाली. मिलान येथे ३८४ मध्ये त्याची बिशप (संत) अँब्रोझची भेट झाली. मणिसंप्रदायला मुद्देसूद खोडून काढण्याची ताकद संत अँब्रोझमध्ये होती. मणिसंप्रदायनी ऑगस्टीनच्या मनात निर्माण केलेल्या बायबलविषयक शंकाकुशंका अँब्रोझने दूर केल्या व बायबलचा खरा, पारंपरिक अर्थ त्याला पटवून दिला. नव-प्लेटोमत हा ख्रिश्चन धर्माचा मोठाच आधार होता, आणि तो गवसल्यामुळे ऑगस्टीनची ख्रिस्ती श्रद्धा वाढू लागली. मात्र तो अजूनही मुख्य मार्गापासून दूरच होता. श्रद्धा निर्माण झाली होती; पण कृती वळत नव्हती.

परिवर्तनाची पहाट कशी झाली ह्याचा वृत्तांत कन्फेशन्स ह्या आपल्या आत्मचरित्रामध्ये ऑगस्टीन सांगतो, ‘‘मनाचा कोंडमारा असह्य होऊन मी (ऑगस्टीन) एकटाच बागेत अंजिराच्या झाडाखाली उभा राहिलो व अश्रू ढाळीत देवाला काकुळतीने म्हणू लागलो, ‘देवा, उद्या, उद्या असे किती दिवस चालायचे? आताच, या क्षणीच माझ्या पापांना तू पूर्णविराम का देत नाहीस?’ इतक्यात, कोठूनतरी गाणे म्हटल्यासारखे शब्द माझ्या कानांवर पडले : ‘घे आणि वाच’’.  तो देवाकडून आलेला संदेश समजून त्याप्रमाणे ऑगस्टीनने घरात जाऊन बायबलमधील ‘संत पॉलची पत्रे’ उघडली, तोच त्याची दृष्टी पुढील उताऱ्यावर पडली. ‘शरीराच्या वासना पूर्ण करण्याच्या मागे न लागता प्रभू येशूचा आधार घ्या’. ऑगस्टीन पुढे लिहितो, ‘‘अधिक वाचण्याची मला इच्छा नव्हती, जरूरीही नव्हती; कारण ते वाक्य वाचून संपवताच एका क्षणात माझे अंत:करण आत्मविश्वासाच्या प्रकाशाने उजळून निघाले आणि संशयाचा काळोख पार नाहिसा झाला’’.

इ.स. ३८७ या वर्षी काही दिवस प्रखर चिंतनात घालवून ऑगस्टीनने बाप्तिस्मा घेतला व मिलानची नोकरी सोडून देऊन आईसह आफ्रिकेला जाण्यास निघाला. वाटेत, रोममध्ये तो वर्षभर राहिला. रोममध्ये असताना त्याच्या आईचे निधन झाले. तिची एकच इच्छा होती की, मरणापूर्वी तिचा मुलगा ख्रिस्ती व्हावा. पुढे त्याचा जीवनक्रम एवढा बदलला की, त्याला हिप्पो (सध्याचे बोना) या नगरीचा बिशप नेमले गेले. आपल्या आयुष्याच्या शेवटपर्यंत सलग ३४ वर्षे एक विद्वान व आदर्श बिशप म्हणून त्याने हिप्पो नगरीची आध्यात्मिक धुरा वाहिली.

ऑगस्टीनची साहित्यकृती विपुल आणि विविध आहे. बाप्तिस्मा स्वीकारल्यावर अगस्तीनने खूप लिहिले. त्याचे साहित्य मुख्यत: त्याच्या दीक्षा घेतलेल्या धार्मिक जीवनातून निर्माण झालेले आहे. ख्रिश्चन धर्माचे विवेचन, स्पष्टीकरण, समर्थन, संरक्षण, प्रसार हे सर्व बिशप म्हणून ऑगस्टीनला करावे लागत असे. अशा संदर्भातून त्याचे बहुतेक सर्व ग्रंथ निर्माण झाले आहेत (एकूण ६०). त्या सर्व ग्रंथांचे वर्गीकरण करणे अशक्यप्राय: आहे. त्याच्या ग्रंथांपैकी कन्फेशन्स हा ग्रंथ अधिक प्रसिद्ध आहे. ह्या ग्रंथाची गणना जगातील अभिजात साहित्यात केली जाते. ‘‘दोन प्रकारच्या प्रेमांतून दोन नगरी उभ्या राहिल्या आहेत. ईश्वर निरपेक्ष अशा स्वत:च्या प्रेमातून उभारलेली एक ऐहिक नगरी व दुसरी आत्मनिरपेक्ष अशा ईश्वरी प्रेमातून उभारलेली दिव्यनगरी. पैकी पहिली स्वत:च्या वैभवात, तर दुसरीचे ईश्वरी वैभवात. पहिलीत सर्वत्र सत्तेची लालसा दिसते, तर दुसरीत ‘एकमेका साह्य करू। अवघे धरू सुपंथ’ या संत रामदासांच्या भावनेने प्रत्येकजण वागतो’’. कन्फेशन्स ह्या सुप्रसिद्ध ग्रंथाचे सुंदर मराठीत ओघवते भाषांतर डॉ. शं. गो. तुळपुळे ह्यांनी १९८० साली आत्मशोध ह्या शीर्षकाने प्रसिद्ध केले आहे.

कन्फेशन्सचे महत्त्व अनन्य साधारण आहे. हे पारमार्थिक आत्मचरित्र ऑगस्टीनने इ.स. ३९९ साली लिहिले. आत्मनिवेदनाची नऊ प्रकरणे व ख्रिश्चन धर्माविषयीची चार प्रकरणे, शं. गो. तुळपुळेंनी नऊ प्रकरणे मराठीत आणली, ही ऑगस्टीनने केलेली आत्मनिंदा व ईश्वरस्तुती आहे. एका बाजूला पापमय जीवनात देवाला अस्तित्वच नाही, तर दुसऱ्या बाजूला मनाच्या अस्वस्थतेत देवावाचून दुसरा तरणोपाय नाही. कन्फेशन्स ही मनाची पापमय जीवनाकडून पुण्यमय जीवनाकडे होणारी वाटचाल आहे. ह्या अजरामर ग्रंथात ऑगस्टीनने त्याच्या ७६ वर्षांच्या आयुष्यातील फक्त ३२ वर्षांचा, म्हणजे त्याने बाप्तिस्माची दीक्षा घेईपर्यंतचा वृत्तांत दिला आहे. खरे पाहिले असता, वाङ्मयाच्या ‘आत्मचरित्रा’त ते मोडत नाही; कारण ऑगस्टीनच्या चरित्राचा बाह्य तपशील ह्या ग्रंथात फारच थोडा आहे. कामजीवनाविषयी ऑगस्टीन ह्या ग्रंथात फारच थोडे आणि तेही मोघमपणे बोलतो. हा ग्रंथ आत्मनिवेदनापलीकडे जातो. स्वत:चा शोध, स्वत:चे शोधन म्हणजे शुद्धीकरण हा ग्रंथ करतो. पाणी जसे वाहता वाहता नितळ होत जाते, त्याप्रमाणे ऑगस्टीनचा जीवनपट उलगडता उलगडता आत्मशोध व निव्वळ आत्मशोधन करीत जातो. देवाच्या कृपेचा अनुभव येऊन ख्रिस्ती धर्माची दीक्षा घेईपर्यंत बत्तीस वर्षांचा काळ म्हणजे त्याच्या आत्मजीवनातील प्रदीर्घ अशी काळोखी रात्रच होती. ती रात्र संपून आत्मज्ञानाचा सूर्योदय झाला तो प्रसंग म्हणजे एका दृष्टीने त्याचा नवा जन्मच! ह्या आत्मनिवेदनाचे अंतिम ध्येय परमेश्वराची प्राप्ती हे आहे व त्यातील सर्व आठवणींचा किंवा घटनांचा अर्थ त्यादृष्टीने लावला आहे.

हा ग्रंथ वाचताना प्रभू येशूने सांगितलेल्या ‘उधळ्या पुत्रा’चे चित्र डोळ्यांसमोर उभे राहते. आत्मशोधन ऑगस्टीनच्या बुद्धीला कळले होते, तरी ते त्याच्या कृतीत येत नव्हते, हे माणसाच्या अंतर्मनातील द्वंद्व त्याने परिणामकारक रीत्या शब्दांकित केले आहे. ऑगस्टीन किंवा प्रत्येक माणूस पापांच्या गर्तेत लोळणारा नव्हे, तर ईश्वरी साक्षात्काराच्या दिशेने वाटचाल करणारा असतो, हे सत्य त्याने ठासून सांगितलेले वाचकाच्या पुढे येते. ऑगस्टीन ही सर्व कहाणी कोण्या माणसाला नव्हे, तर खुद्द देवालाच सांगत आहे. कन्फेशन्स म्हणजे केवळ आठवणी नव्हेत; आयुष्याचे ते एक चिंतनात्मक अवलोकन आहे. ती प्रदीर्घ प्रार्थना आहे. बरीच आत्मचरित्रे केवळ लौकिक किंवा ऐहिक जीवनाचे वर्णन असतात. त्यात ‘आत्मा’असा नसतोच! ऑगस्टीनच्या घटनांचे चिंतन करून त्यातून देवाकडे कसे जायचे ते ऑगस्टीनचे कन्फेशन्स सांगते. त्याच्या सांस्कृतिक जीवनासोबतच त्याची बुद्धिमत्ता, प्रतिभा, बहुश्रुतता, विचारस्वातंत्र्य, सौंदर्यदृष्टी, ध्येयनिष्ठा, मित्रप्रेम, मातृभक्ती, इत्यादी अनेक गुणविशेष कन्फेशन्समध्ये उमटलेले आहेत.

ऑगस्टीनचे आणखी दोन महत्त्वाचे ग्रंथ म्हणजे De civitate Dei (४१३–४२६, इं.शी. द सिटी ऑफ गॉड) व De Trinitate (४००–४१७, इं.शी. ऑन द ट्रिनिटी) हे होत. यांपैकी पहिल्या ग्रंथात त्याने जगाच्या इतिहासाचे सार व कॅथलिक चर्चचे स्वरूप यांबाबत आपले विचार मांडले आहेत, तर दुसऱ्यात त्याने ईश्वराच्या स्वरूपाबाबतचे विवेचन केले आहे. समतोल शैलीचा त्याच्या ग्रंथात परमोत्कर्ष आढळतो. मानवी हृदयाला स्पर्श करून धार्मिक भावना जागृत करण्याचे त्याच्या लेखणीतील सामर्थ्य अन्यत्र क्वचितच पहावयास मिळते. तत्त्ववेत्ता व ईश्वरविद्यावेत्ता अशा दोन्हीही भूमिकांतून त्याची योग्यता मोठी मानली जाते. त्याने आपल्या ईश्वरविद्येत नव-प्लेटोमताचा आणि ख्रिस्ती धर्माचा समन्वय साधण्याचा प्रयत्न केला.

एक थोर विचारवंत आणि ख्रिस्ती धर्माच्या आरंभीच्या काळातील एक थोर ईश्वरविद्यावेत्ता म्हणून ऑगस्टीन प्रसिद्ध आहे. तत्कालीन ईश्वरविद्या आणि तत्त्वज्ञान यांतील सर्वच महत्त्वाच्या समस्यांचा त्याने ऊहापोह केलेला आहे. ख्रिस्ती तत्त्वज्ञानात त्याचे विचार अनेक शतके प्रभावी व मार्गदर्शक ठरले. तत्कालीन अभिजाततावादाचा प्रभाव त्याच्यावर असला आणि त्याने त्यातील परिभाषाही आपल्या लेखनात वापरली असली, तरी त्याच्या विचारसरणीचे अधिष्ठान ख्रिस्ती धर्मश्रद्धा हेच आहे. ह्या धर्मश्रद्धेतूनच त्याने नीतिशास्त्र, ज्ञानमीमांसा, सत्ताशास्त्र, इतिहासाचे तत्त्वज्ञान इत्यादींबाबतची आपली मते मांडली आहेत. ख्रिस्ती धर्मातील ‘त्रयी सिद्धांत’ (Doctrine of Trinity) हा त्याच्या तत्त्वज्ञानाचा गाभा होय. त्याने आपल्या De Trinitate ह्या प्रसिद्ध ग्रंथातही हा ‘त्रयी सिद्धांत’च मूलभूत मानला आहे. त्याची विचारसरणी ऑगस्टीनवाद म्हणून ओळखली जाते.

१५०० वर्षांपूर्वी होऊन गेलेला हा संत आजही आपल्या मनाची पकड घेतो. प्राचीन व आधुनिक यूरोपची पाळेमुळे ऑगस्टीनने दिलेल्या विचारांच्या भक्कम पायावर उभी असलेली आज सर्वमान्य झाले आहे.

संदर्भ :

  • Bonner, G. St. Augustine : Life and Controversies, London, 1963.
  • Gilson, E. Trans. Lynch, L. E. M. The Christian Philosophy of Saint Augustine, London, 1961.
  • O’Meara, John J. Ed. An Augustine Reader, New York, 1973.
  • Ryan, J. K. Trans. The Confessions, New York, 1960.
  • तुळपुळे, शं. गो. आत्मशोधन, पुणे, १९८०.
  • https://iep.utm.edu/augustin/
  • https://plato.stanford.edu/entries/augustine/

समीक्षक : फ्रान्सिस कोरिया