कॅल्व्हिन, जॉन : ( १० जुलै १५०९—२७ मे १५६४ ). मार्टिन ल्यूथरप्रणीत विचारसरणीचे फ्रेंच धर्मशास्त्रवेत्ते व धर्मसुधारक. त्यांचा धर्मविचार ‘कॅल्व्हिनवाद’ म्हणून ओळखला जातो. कॅल्व्हिन यांचा जन्म फ्रान्समधील न्वायाँ, पिकर्दी येथे झाला. सुरुवातीस त्यांनी धार्मिक शिक्षण घेतले. १५२८ मध्ये ते एम. ए. झाले. नंतर ऑर्लेआं येथे कायद्याचा अभ्यास करीत असता प्रॉटेस्टंट पंथाच्या विचारांकडे ते आकृष्ट झाले. कायदा या विषयात पीएच. डी. घेऊन ते पॅरिसला परत आले; तथापि तेथे वकिली न करता ते भाषा-साहित्याचे अध्यापन-लेखन करू लागले. १५३२ मध्ये त्यांनी सेनीका (इ.स.पू.सु. ५४−इ.स. ३९) याच्या De clementia ह्या ग्रंथावर लॅटिन भाषेत उत्कृष्ट टीका लिहून प्रसिद्ध केली.

मार्टिन ल्यूथर (१४८३−१५४६) यांनी ख्रिस्ती धर्मात जी सुधारणावादी क्रांती घडवून आणली, तिची बऱ्याच अंशी कॅल्व्हिन यांनी पूर्तता केली. पॅरिस येथे असताना १५३३ मध्ये त्यांनी आपली खळबळजनक विचारप्रणाली मोठ्या आवेशाने प्रतिपादन केली. त्यामुळे रोषास कारण ठरून त्यांना पॅरिस सोडून स्वित्झर्लंडमध्ये जावे लागले. प्रथम ते बाझेल येथे गेले. १५३६ मध्ये त्यांनी बाझेल येथून आपला Institutio Eelegionis Christianae (इं. भा. इन्स्टिट्यूट्स ऑफ द ख्रिश्चन रिलिजन) हा महत्त्वपूर्ण ग्रंथ लॅटिन भाषेत प्रसिद्ध केला. या ग्रंथातच त्यांचे धर्मशास्त्र प्रामुख्याने आलेले आहे. नंतर ते जिनीव्हा येथे गेले. तेथे जी. फारेल (१४८९−१५६५) नावाचा धर्मसुधारक पोप यांच्याविरुद्ध प्रभावी प्रचार करीत होता. कॅल्व्हिन यांनी त्याच्याशी संपर्क साधून आपल्या बुद्धिमत्तेच्या व संघटनाचातुर्याच्या जोरावर तेथे प्रचंड धर्मजागृती घडवून आणली व अखेरपर्यंत तिचे नेतृत्व स्वत:कडे ठेवले. चर्चच्या कारभारातील सुधारणा आणि जिनीव्हा शहराचा कायापालट करण्यात कॅल्व्हिन यांचा फार मोठा वाटा होता.

रोमन कॅथलिक धर्मातील पोप यांचे सर्वोच्च स्थान व त्यांची प्रमादरहितता तसेच प्रॉटेस्टंट पंथातील बायबलचे सर्वोच्च स्थान व प्रमादरहितता ह्या दोहोंनाही कॅल्व्हिन यांनी विरोध करून परमेश्वराला मानवाच्या धार्मिक जीवनात केंद्रस्थानी मानले आणि परमेश्वराचीच सत्ता सर्वंकष मानणारे धर्मशास्त्र प्रतिपादन केले. ते स्वत: विद्वान, शिक्षणतज्ज्ञ व कायदेपंडित होते. त्यांनी जिनीव्हाच्या नागरी जीवनाला चांगले वळण लावून जिनीव्हा हे प्रॉटेस्टंट पंथाचे एक महत्त्वाचे केंद्र बनविले.

धर्मसुधारक म्हणून कॅल्व्हिन यांची योग्यता ल्यूथर यांच्या खालोखाल मानली जाते. चर्चसंघटनेबाबत त्यांनी प्रस्थापित केलेली पद्धती स्वित्झर्लंड, स्कॉटलंड इत्यादी देशांत आजही प्रचलित आहे. धर्मसुधारणेच्या कालखंडातील ते एक श्रेष्ठ धर्मशास्त्रवेत्ते व प्रभावी विचारवंत मानले जातात.

जिनीव्हा येथे त्यांचे निधन झाले.

संदर्भ :