लाख वनस्पती फॅबेसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव लॅथिरस सॅटिव्हस आहे. ही नाजूक वेल मूळची दक्षिण यूरोप आणि पश्चिम आशिया येथील असून ती भारत, इराण, आफ्रिका आणि दक्षिण अमेरिका या ठिकाणी पिकविली जाते. वाटाणा व घेवडा या वनस्पतीही फॅबेसी कुलातील आहेत. लाख म्हणून जो पदार्थ सामान्यपणे वापरला जातो त्याचा आणि या वनस्पतीचा काहीही संबंध नाही.
लाख वनस्पतीचे खोड सु. १ मी. उंच वाढते. खोडाच्या प्रत्येक पेऱ्यावर एक लांबट हिरव्या अनुपर्णांची म्हणजे पानाच्या तळाशी असलेल्या उपांगांची जोडी आणि एक संयुक्त पिसासारखे पान असते. पानाच्या टोकाला असलेली दोन दले तणाव्यासारखी आणि इतर दले भाल्यासारखी असतात. फुले द्विलिंगी असून ती एकाकी पानांच्या बगलेत येतात. ती लालसर, जांभळी, निळी अथवा पांढरी अशा रंगांची असतात. ती पतंगरूपासारखी दिसत असून त्यांमध्ये पुंकेसर ९+१ असतात. शिंबावंत फळे चपटी, २·५–४ सेंमी. लांब व काहीशी वाकडी असून ती तडकून फुटतात. शेंगेमध्ये ४-५ पिवळट किंवा तपकिरी, वाटाण्यापेक्षा लहान व साधारण त्रिकोणी बिया असतात.
लाख वनस्पती वर्षायू तण म्हणून भारतात पसरलेली आहे. मात्र तिची जनावरांच्या चाऱ्यासाठी लागवड केली जाते. चाऱ्याखेरीज डाळीसाठीही हे पीक घेतात. पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेशाचा पूर्वेकडील भाग, मध्य प्रदेश, गुजरातचा मध्यभाग व दख्खनचा भाग या प्रदेशांत लाख वनस्पतीची लागवड होते. महाराष्ट्रात चंद्रपूर, भंडारा व परभणी या जिल्ह्यांत लाखी डाळीचे पीक घेतले जाते. दुष्काळप्रवण भागातील काही लोक लाखी डाळीचा वापर करतात. बियांची डाळ खाद्य असून ती सोयाबीनच्या खालोखाल पौष्टिक असते. होमिओपॅथिक औषधांमध्ये तसेच प्लायवुडाचे तक्ते चिकटविण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या गोंदात लाखेच्या बियांची पूड वापरतात.
लाखी डाळीचे दीर्घकाळ सेवन केल्यास मनुष्याला लॅथिरस रुग्णता नावाचा विकार जडतो. या विकारामुळे कंबरेखालील भाग लुळा पडतो. लाखी डाळीमध्ये बीटा-एन-ऑक्झॅलिल-आल्फा बीटा-डायॲमिनो प्रोपिऑनिक आम्ल हे चेताविष असते. त्याचा परिणाम चेतासंस्थेवर होतो. हा विकार अद्याप असाध्य आहे. मनुष्याप्रमाणे जनावरांनाही हा विकार होतो.