योग म्हणजे चित्ताच्या सर्व वृत्तींचा निरोध होय. ज्यावेळी चित्तातील सर्व वृत्ती शांत होतात व चित्त निर्विचार अवस्थेला प्राप्त होते, त्यावेळी कोणतेच ज्ञान होत नाही. म्हणून त्या अवस्थेला योगाच्या परिभाषेत असम्प्रज्ञात समाधी असे म्हणतात. असम्प्रज्ञात म्हणजे कोणत्याही प्रकारच्या ज्ञानाचा अभाव होय. चित्त निर्विचार किंवा असम्प्रज्ञात अवस्थेत जाण्याचे दोन मार्ग महर्षी पतंजलींनी सांगितले आहेत – भवप्रत्यय आणि उपायप्रत्यय.
उपायप्रत्यय म्हणजे साधनेच्या योग्य मार्गांचा अवलंब करून यथार्थ ज्ञान प्राप्त करून (संप्रज्ञात समाधीनंतर) विचारशून्य अवस्था प्राप्त करणे होय. ही अवस्था श्रद्धा, वीर्य, स्मृती, समाधी आणि प्रज्ञा या पाच उपायांद्वारे प्राप्त होते म्हणून या पाच गोष्टींना उपायप्रत्यय असे योगसूत्रात (१.२०) म्हटले आहे.
(१) श्रद्धा : चित्ताची प्रसन्नता म्हणजे श्रद्धा होय. श्रद्धेनेच योगसाधनेतील अभिरुची वाढत जाते. येथे ईश्वरावर किंवा देवतेच्या एखाद्या स्वरूपावर श्रद्धा असणे अभिप्रेत नसून जी योगसाधना केली जाते, ती निश्चित फळ देईल या विश्वासाने आणि संपूर्ण समर्पणाच्या भावनेने करणे म्हणजे श्रद्धा होय.
(२) वीर्य : संपूर्ण श्रद्धेने योगसाधना केल्यास ती साधना नित्यनेमाने आणि अधिकाधिक करण्यासाठी प्रयत्नात्मक उत्साह उत्पन्न होतो, त्यालाच वीर्य असे म्हणतात.
(३) स्मृति : योगसाधना दृढ होत गेली की त्या साधनेमध्ये चित्त आपोआप एकाग्र होऊ लागते व साधकाचे चित्त ध्यानावस्थेत जाऊ लागते. येथे स्मृती शब्दाचा अर्थ पूर्वी अनुभवलेल्या गोष्टीचे स्मरण असा नसून ध्यानालाच येथे स्मृती शब्दाने सूचित केले आहे. वाचस्पति-मिश्रांनीही तत्त्ववैशारदी नावाच्या टीकाग्रंथात स्मृती शब्दाचा अर्थ ‘ध्यान’ घ्यावा असे म्हटले आहे.
(४) समाधी : स्मृती अर्थात् ध्यान हे जसेजसे अधिक प्रगल्भ होत जाते त्यानंतर तेच समाधीमध्ये रूपांतरित होते. चित्ताची एखाद्या विषयावर असणारी संपूर्ण एकाग्र अवस्था म्हणजे समाधी होय. या अवस्थेत ज्या विषयावर चित्त एकाग्र आहे, त्या विषयाचे संपूर्ण ज्ञान प्राप्त होते म्हणून हिलाच सम्प्रज्ञात समाधी असेही म्हणतात.
(५) प्रज्ञा : सम्प्रज्ञात समाधीद्वारे प्राप्त होणारे एखाद्या विषयाचे यथार्थ आणि संपूर्ण ज्ञान म्हणजे प्रज्ञा होय. सांख्य-योग दर्शनांप्रमाणे पुरुष आणि बुद्धी यांतील भेदाचे ज्ञान अर्थात् विवेकख्याती हे सर्वोत्कृष्ट ज्ञान होय. या ज्ञानालाच ऋतंभरा प्रज्ञा असेही म्हणतात. ही प्रज्ञा प्राप्त झाल्यानंतर चित्तामध्ये परवैराग्य उत्पन्न झाल्यावर साधकाच्या चित्तातील सर्व वृत्ती शांत होतात. तेव्हा चित्त विचारशून्य (असम्प्रज्ञात) अवस्थेमध्ये जाते आणि साधकाला कैवल्याची प्राप्ती होते.
या पद्धतीने श्रद्धा, वीर्य, स्मृती, समाधी आणि प्रज्ञा या पाच उपायांद्वारे असम्प्रज्ञात समाधी प्राप्त होते, म्हणून यांना उपायप्रत्यय असे म्हणतात. या पाच उपायांचा उल्लेख योगसूत्रांमध्ये आढळतो. परंतु, या पाचांना उपायप्रत्यय ही संज्ञा भाष्यकार व्यासांनी दिलेली आहे.
पहा : असम्प्रज्ञात समाधि, भवप्रत्यय, विवेकख्याति, सम्प्रज्ञात समाधी.
संदर्भ :
- स्वामी श्री ब्रह्मलीनमुनि, पातञ्जलयोगदर्शन, वाराणसी, २००३.
- कर्णाटक विमला, पातञ्जलयोगदर्शनम् (भाग १), वाराणसी, १९९२.
समीक्षक : रुद्राक्ष साक्रीकर