विशिष्ट योगसाधना केल्यावर योग्याला स्वत:च्या चित्तात, इंद्रियांत किंवा शरीरात असणाऱ्या असाधारण योग्यतेची जाणीव होते व योगी स्वत:मधील विशेष सामर्थ्य वापरण्यास सक्षम होतो. त्या सामर्थ्यालाच सिद्धी असे म्हणतात. सिद्धी हा शब्द संस्कृतमधील ‘सिध्’ या धातूपासून बनलेला आहे. जे सिद्ध आहे किंवा जे आधीपासूनच अस्तित्वात आहे, त्याला सिद्धी म्हणतात. ज्यांना सिद्धी समजले जाते, त्या विशेष प्रकारच्या योग्यता प्रत्येक व्यक्तीमध्ये असतात; परंतु, व्यक्तीला त्यांची जाणीव नसते. स्वत:मध्ये असणाऱ्या योग्यतेला साधनेद्वारे जाणून तिचा उपयोग करणे म्हणजे सिद्धी होय. योगदर्शनामध्ये  सिद्धीलाच विभूती असेही म्हटले आहे. विभूती या शब्दाचा अर्थ ‘विशेष रूपाने कल्याण करणारी’ असा होय. महर्षी पतंजली यांनी लिहिलेल्या योगसूत्रांधील तिसरा पाद (भाग) हा विशेषत्वाने विभूतींचे वर्णन करणारा आहे. कोणती साधना केल्यानंतर कोणती सिद्धी प्राप्त होऊ शकते, याविषयीचे वर्णन विभूतिपादामध्ये मिळते. त्याव्यतिरिक्त साधनपाद आणि कैवल्यपादामध्येही काही सिद्धींचे वर्णन प्राप्त होते.

योगसूत्रांमध्ये (२.३५–४५; ३.१६–५२; ४.४) वर्णिलेल्या प्रमुख सिद्धींची सूची पुढीलप्रमाणे –

(१) अहिंसेचे संपूर्णपणे पालन, (२) सत्याचे पालन आणि आचरण, (३) अस्तेयाचे (चोरी न करणे) संपूर्णपणे पालन, (४) ब्रह्मचर्याचे संपूर्णपणे पालन केल्यास शारीरिक आणि मानसिक सामर्थ्य प्राप्त होते. (५) अपरिग्रहाचे (अनावश्यक वस्तूंचा संग्रह न करणे) संपूर्णपणे पालन, (६) शारीरिक शौचाचे (शुद्धी) पालन, (७) मानसिक शौचाचे पालन केल्यास चित्ताची शुद्धी, मनाची प्रसन्नता, एकाग्रता, इंद्रियांवर नियंत्रण आणि आत्म्याचे ज्ञान प्राप्त करून घेण्याची योग्यता उत्पन्न होते. (८) संतोषामुळे अत्युत्तम सुखाचा लाभ होतो. (९) तपाचे आचरण केल्यामुळे शरीर आणि इंद्रियांच्या सिद्धी प्राप्त होतात. (१०) स्वाध्याय (मोक्षशास्त्रांचे अध्ययन केल्यामुळे) इष्ट देवतांचे स्वरूप काय आहे याचे ज्ञान होते. (११) ईश्वर-प्रणिधानामुळे (भक्तीमुळे) समाधीची प्राप्ती होते. (१२) वस्तूंमध्ये क्षणोक्षणी होणाऱ्या परिणामांवर संयम (धारणा + ध्यान + समाधी) केल्यास भूतकाळातील झालेल्या आणि भविष्यकाळातील होणाऱ्या वस्तूच्या स्वरूपाचे ज्ञान होते. (१३) प्रत्यक्ष वस्तू, वस्तूचे नाव आणि वस्तूचे ज्ञान या तीन गोष्टींमधील भेदावर संयम केल्यास योग्याला सर्व प्राणिमात्रांची भाषा समजू शकते. (१४) स्वत:च्या चित्तातील संस्कारांचा साक्षात्कार केल्यामुळे पूर्वजन्माचे ज्ञान प्राप्त होते. (१५) दुसरी व्यक्ती कशा पद्धतीने ज्ञान ग्रहण करते त्यावर संयम केल्यास त्या व्यक्तीच्या चित्ताचा स्वभाव समजतो. (१६) स्वत:च्या शरीराच्या रूपावर संयम केल्यास रूपातील ग्राह्यशक्ती स्तंभित होते. त्यामुळे दुसऱ्या व्यक्तीची दृष्टी योग्याच्या शरीराच्या रूपाचे ग्रहण करू शकत नाही. यालाच अंतर्धान असे म्हणतात. (१७) शीघ्र फळ देणारे आणि विलंबाने फळ देणारे असे दोन प्रकारचे कर्म असते. त्यावर संयम केल्यास अथवा मृत्युसूचक चिन्हांचे (अरिष्टांचे) ज्ञान प्राप्त झाल्यास मृत्यू कधी होणार आहे हे समजते. (१८) मैत्री, करुणा आणि मुदिता या भावनांवर संयम केल्याने त्यांचे सामर्थ्य प्राप्त होते. (१९) हत्ती, गरूड इत्यादी प्राणी-पक्षांच्या बळावर संयम केल्यास योग्यालाही त्यांसारखे बळ प्राप्त होते. (२०) ज्योतिष्मती नावाच्या प्रवृत्तीद्वारे होणाऱ्या ज्ञानावर संयम केल्यास आकाराने लहान असणाऱ्या वस्तूंचे, मध्ये अडथळा असतानाही त्यापलिकडे असणाऱ्या वस्तूंचे आणि दूरच्या वस्तूंचे ज्ञान प्राप्त होते. (२१) सूर्यावर संयम केल्यास संपूर्ण ब्रह्मांडाचे ज्ञान होते. (२२) चंद्रावर संयम केल्यास तारा-नक्षत्रांच्या रचनेचे ज्ञान होते. (२३) ध्रुवावर संयम केल्यास तारा-नक्षत्रांच्या गतीचे ज्ञान होते. (२४) नाभिचक्रावर ध्यान केल्यास शरीराच्या रचनेचे ज्ञान होते. (२५) कंठातील पोकळीवर संयम केल्यास भूक किंवा तहान लागत नाही. (२६) कूर्म नावाच्या नाडीवर संयम केल्यास शरीर स्थिर होते आणि विचलित होत नाही. (२७) कपाळाच्या मध्यभागी असणाऱ्या ज्योतीवर संयम केल्यास सिद्धपुरुषांचे दर्शन होते. (२८) प्रातिभ नावाच्या सिद्धीमुळे सर्व वस्तूंचे ज्ञान होते. (२९) हृदयस्थानावर संयम केल्यास स्वत:च्या चित्ताचे ज्ञान होते. (३०) बुद्धी आणि पुरुष ही दोन वेगळी तत्त्वे असतानाही ती अज्ञानामुळे एकच आहेत असे वाटते. त्यांवर संयम केल्यास पुरुष (आत्म) तत्त्वाचे ज्ञान होते. (३१) पुरुष (आत्म) ज्ञान झाल्यावर प्रातिभ (सर्व वस्तूंचे ज्ञान), श्रावण (दिव्य ध्वनी), वेदना (दिव्य स्पर्श), आदर्श (दिव्य रूप), आस्वाद (दिव्य रस) आणि वार्ता (दिव्य गंध) यांचेही ज्ञान होते. (३२) जीवाच्या बंधनाचे कारण अविद्या नष्ट झाल्यावर आणि दुसऱ्या जीवाच्या शरीरात प्रवेश कसा करावा याचे ज्ञान झाल्यास योगी परकायाप्रवेश करू शकतो. (३३) शरीरातील उदान नावाच्या प्राणावर नियंत्रण केल्यास पाणी, चिखल, काटे इत्यादी जमिनीवर असणाऱ्या गोष्टींना स्पर्श न करता योगी आपल्या शरीराचे उत्थान करू शकतो. त्याचबरोबर भौतिक शरीर कधी सोडायचे याचेही स्वातंत्र्य योग्याला मिळते. (३४) शरीरातील समान नावाच्या प्राणावर नियंत्रण मिळविल्यास योग्याचे शरीर तेजस्वी होते. (३५) श्रोत्रेंद्रिय आणि आकाशतत्त्व यांच्या संबंधावर संयम केल्यास दिव्य शब्दांचे ज्ञान प्राप्त होऊ शकते. (३६) शरीर आणि आकाशतत्त्व यांच्या संबंधावर संयम केल्यास किंवा कापूस इत्यादी अतिशय हलक्या वस्तूवर चित्त एकाग्र केल्यास आकाशगमनाची सिद्धी प्राप्त होते. (३७) महाभूतांमधील विशेष गुण (स्थूल), सामान्य स्वरूप, सूक्ष्म तन्मात्र, त्रिगुण आणि महाभूतांच्या अस्तित्वाचे प्रयोजन या पाच गोष्टींवर संयम केल्याने भूतजय नावाची सिद्धी प्राप्त होते. भूतजयामुळे अणि मा, महिमा इत्यादी अष्टसिद्धींची प्राप्ती होते. (३८) इंद्रियांचे विषय ग्रहण करण्याचे सामर्थ्य (स्थूल), त्यांचे स्वरूप, अहंकार तत्त्व, त्रिगुण आणि इंद्रियांच्या अस्तित्वाचे प्रयोजन या पाच गोष्टींवर संयम केल्याने इंद्रियजय नावाची सिद्धी प्राप्त होते. (३९) क्षण आणि त्याच्या क्रमावर संयम केल्यास विवेकजन्य ज्ञान प्राप्त होते. (४०) योगी स्वत:प्रमाणेच स्वत:च्या प्रतिकृती निर्माण करू शकतो, यालाच निर्माणचित्त असे म्हणतात.

स्वत:मध्ये असणाऱ्या विशेष सामर्थ्याचे ज्ञान व त्याचा उपयोग पुढील पाच प्रकारे होऊ शकतो, असे महर्षी पतंजली (योगसूत्र ४.१) सांगतात – (१) जन्म : काही व्यक्ती जन्मत:च स्वत:मधील विशेष योग्यता वापरू शकतात; त्यासाठी काही विशेष परिश्रम करावे लागत नाहीत; (२) औषधी : विशिष्ट औषधींच्या सेवनाने काही सिद्धी प्राप्त होऊ शकतात. कोणत्या औषधीच्या सेवनाने कोणती सिद्धी मिळू शकते, याचे वर्णन प्रामुख्याने आयुर्वेद आणि तंत्रशास्त्राच्या ग्रंथांमध्ये आढळते; (३) मंत्र : विशिष्ट काळात विशिष्ट मंत्राच्या उच्चारणाने सिद्धी प्राप्त होऊ शकतात. मंत्रांद्वारे प्राप्त होणाऱ्या सिद्धींचे वर्णनही तंत्रशास्त्राच्या ग्रंथांमध्ये आढळते; (४) तप : दीर्घकाळपर्यंत एकच क्रिया सातत्याने आणि परिश्रमपूर्वक करणे म्हणजे तप होय. तपाद्वारेही विशिष्ट सिद्धी प्राप्त होतात. तपाद्वारे प्राप्त होणाऱ्या सिद्धींचे वर्णन प्रामुख्याने हठयोगाच्या ग्रंथांमध्ये आढळते; (५) समाधी : चित्ताची एकाग्र स्थिती म्हणजे समाधी होय. विशिष्ट गोष्टींवर चित्त एकाग्र केल्यामुळे त्यांचे संपूर्ण ज्ञान प्राप्त होऊन सिद्धी प्राप्त होते. समाधीद्वारे मिळणाऱ्या सिद्धींचे वर्णन महर्षी पतंजलींनी योगसूत्रातील विभूतिपादामध्ये केलेले आहे.

योगसाधना हा वैयक्तिक अनुभवाचा विषय असल्यामुळे त्यांद्वारे प्राप्त होणाऱ्या सिद्धी सत्य आहेत की असत्य हे पडताळणे किंवा अभ्यासणे हा स्वतंत्र विषय आहे.

पहा : अंतर्धान, अरिष्ट, इंद्रियजय, तप, प्रातिभ, भूतजय.

संदर्भ :

  • आगाशे, काशिनाथशास्त्री (संपा.), पातञ्जलयोगसूत्राणि, पुणे, १९०४.
  • स्वामी श्री ब्रह्मलीनमुनि, पातञ्जलयोगदर्शन, चौखम्भा संस्कृतसंस्थान, वाराणसी, २००३.

                                                                                                     समीक्षक : प्राची पाठक