सर्वसामान्यपणे मराठीमध्ये प्रत्यय या शब्दाचा अर्थ ‘जाणीव’ असा होतो. परंतु, योगदर्शनानुसार चित्ताच्या वृत्तीद्वारे पुरुषाला प्राप्त होणारे ज्ञान म्हणजे प्रत्यय होय. पुरुष म्हणजे ‘ज्ञान प्राप्त करण्याची योग्यता’ होय आणि चित्त म्हणजे ‘ज्ञान प्राप्त करण्याचे साधन’ होय. ज्ञान प्राप्त करण्याची योग्यता असूनही पुरुषाला चित्ताशिवाय कोणत्याही प्रकारचे ज्ञान प्राप्त होत नाही. ज्यावेळी चित्त एखाद्या विषयाचा आकार धारण करते, तेव्हा चित्ताच्या त्या रूपाला ‘चित्तवृत्ति’ असे म्हणतात. चित्तवृत्ति म्हणजे सर्वसामान्य भाषेत ‘विचार’ होय. ज्याप्रमाणे संगणकात एखादी माहिती साठवलेली असली तरी संगणक अचेतन असल्यामुळे त्याला स्वत:ला त्या माहितीचे ज्ञान किंवा जाणीव होत नाही, त्याचप्रमाणे चित्तामध्ये वृत्ती उत्पन्न झाल्या तरीही (विचार चित्तात येत असले तरी) चित्त हे स्वत: अचेतन असल्यामुळे त्याला त्या विचारांचे ज्ञान होत नाही. चित्ताशी जणू तादात्म्य पावलेल्या पुरुषाला चित्ताच्या त्या वृत्तींचे ज्ञान होते. चित्ताच्या वृत्तीद्वारे पुरुषाला प्राप्त होणारे ज्ञान म्हणजे ‘प्रत्यय’ होय.

सामान्यपणे प्रत्येकाला असे वाटते की, ‘माझ्या मनात विचार येत आहेत’ आणि ‘मलाच त्या विचारांची जाणीव/ज्ञान होत आहे’. अर्थात जेथे विचार उत्पन्न होतात आणि ज्याला त्या विचारांची जाणीव होते तो मी एकच आहे, असे आपल्याला वाटते. परंतु, योगशास्त्र असे म्हणते की, जेथे विचार उत्पन्न होतात ते चित्त व ज्याला त्या विचारांचे ज्ञान होते, तो पुरुष हे दोन्ही पूर्णपणे वेगळे आहेत; कारण प्रत्येक क्षणी विचार वेगळे असल्यामुळे चित्ताची रूपे प्रतिक्षण वेगळी आहेत. परंतु, ज्या पुरुषाला विचारांची जाणीव होत आहे, तो पुरुष समानरूपाने तोच आहे, त्यात कोणतेही परिवर्तन होत नाही. चित्तात वृत्ती असतात व कधीतरी वृत्ती नसूही शकतात; परंतु वृत्ती असतानाही व नसतानाही पुरुष त्याच त्या रूपाने स्थित राहतो.

योगसूत्रांमध्ये प्रत्यय हा शब्द अन्य काही शब्दांसोबत उल्लेखिलेला आहे. त्याविषयी थोडक्यात स्पष्टीकरण पुढीलप्रमाणे –

१. अभाव-प्रत्यय : निद्रा वृत्तीविषयी स्पष्टीकरण करताना महर्षि पतंजलींनी ‘अभाव-प्रत्यय’ अशी संज्ञा वापरलेली आहे. अभाव-प्रत्यय म्हणजे सर्व वस्तूंच्या अभावाचे ज्ञान होय. सामान्यपणे जीवाच्या जाग्रत्, स्वप्न आणि सुषुप्ति या तीन अवस्था असतात. त्यांपैकी सुषुप्ति अवस्थेत असणारी चित्ताची वृत्ती म्हणजे ‘निद्रा’ होय. सुषुप्ति अवस्थेत कोणत्याही वस्तूचे ज्ञान होत नाही, तर सर्व वस्तूंच्या अभावाचे ज्ञान होते. (योगसूत्र १.१०).

२. विराम-प्रत्यय : पर-वैराग्याविषयी स्पष्टीकरण करताना महर्षि पतंजलींनी ‘विराम-प्रत्यय’ अशी संज्ञा वापरलेली आहे. जेव्हा चित्ताच्या एकाग्र स्थितीमध्ये योग्याला विवेकख्यातीचे ज्ञान प्राप्त होते, तेव्हा ते ज्ञानही चित्ताद्वारेच प्राप्त होते. विवेकख्याति म्हणजे पुरुष आणि चित्त भिन्न आहेत ही जाणीव. चित्ताच्या वृत्तींचा निरोध हेच योगाचे लक्ष्य असल्यामुळे विवेकख्यातीचे ज्ञान करवून देणाऱ्या चित्ताच्या त्या एकाग्र वृत्तीचाही ‘विराम’ (निरोध) झाला पाहिजे ही जाणीव म्हणजेच ‘विराम-प्रत्यय’ होय. यालाच पर-वैराग्य असेही म्हणतात. (योगसूत्र १.१८).

३. प्रत्यय-अनुपश्य : पुरुष हा चित्ताच्या वृत्तींचे ज्ञान प्राप्त करून घेत असल्यामुळे ‘प्रत्यय-अनुपश्य’ म्हणजे पुरुष होय. याचा शब्दश: अर्थ ‘ज्ञानाला पाहणारा/जाणणारा’ असा आहे. (योगसूत्र २.२०).

४. प्रत्यय-एकतानता : पतंजलींनी ध्यानाविषयी स्पष्टीकरण करताना या पदाचा उल्लेख केला आहे. प्रत्यय म्हणजे ज्ञान आणि एकतानता म्हणजे समानरूपता. एकच ज्ञान अनेक क्षणांपर्यंत होत असेल, तर त्याला प्रत्यय-एकतानता असे म्हणतात. प्रत्येक क्षणी वेगळे ज्ञान होत असेल तर ती प्रत्ययाची एकतानता नव्हे. (योगसूत्र  ३.२).

यांव्यतिरिक्तही अन्य काही सूत्रांमध्ये प्रत्यय शब्द आलेला आहे, परंतु तेथे चित्ताच्या वृत्तीद्वारे प्राप्त होणारे ज्ञान असाच प्रत्ययाचा सर्वसामान्य अर्थ आहे.

समीक्षक : कला आचार्य