आजारपणामुळे तसेच अपघात किंवा आघातामुळे बरेचदा व्यक्तीच्या शारीरिक हालचालींवर निर्बंध येतात. व्यक्तीच्या स्नायू, हाडे व चेतासंस्था (muscular, skeletal & nervous system) यावर परिणाम झाल्याने त्याला स्वाभाविक क्रिया करण्यात (उदा., हात-पाय धुणे,  खाणे-पिणे, उठणे- बसणे, स्वाभाविक श्वासोच्छ्वास, उत्सर्जन क्रिया करणे, तसेच समाजातील वावर, नोकरी-व्यवसाय इ.) अडचण निर्माण होते. याचा व्यक्तीच्या मानसिक, भावनिक व व्यावसायिक जीवनशैलीवर विपरित परिणाम होतो. रुग्णाला अशा परावलंबनाच्या स्थितीतून बाहेर काढण्याच्या कार्यात परिचारिका महत्त्वपूर्ण भूमिका बजावते.

परिचर्या नियोजनाचा उद्देश (Aim) : रुग्णाला कोणत्या शारीरिक हालचालींवर निर्बंध येत आहे, हे जाणून घेऊन, त्याला त्या क्रिया करण्यात मदत करणे आणि त्याला लवकरात लवकर स्वावलंबी करण्यासाठी प्रयत्न करते हा परिचर्या नियोजनाचा प्रमुख उद्देश आहे.

परिचर्या नियोजनाची तत्त्वे (Principles) :

  • रुग्णाच्या निर्बंधित हालचाली नुसारच सेवा देण्यात यावी.
  • रुग्णामध्ये स्वतःची शारीरिक काळजी घेण्यासाठी असलेली उर्वरित पात्रता समजून घ्यावी.
  • रुग्णाच्या शारीरिक गरजांसोबतच, मानसिक, सामाजिक व अध्यात्मिक गरजा पुरविण्यासाठी नियोजन करणे.

रिचर्या नियोजनातील अंतर्भूत सेवा :

  • रुग्णास अधिकाधिक विश्रांती देऊन आवश्यक त्या शारीरिकदृष्ट्या सुरक्षित अशा हालचाली व व्यायाम करण्यास साहाय्य करणे. ज्यामुळे रुग्णातील परावलंबित्व कमी करण्यास मदत होते.
  • रुग्णाच्या शारीरिक विकृतीसाठी इलाज करून त्यानंतर पुन्हा अधिक विकृती होऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक उपाय योजना करणे.
  • रुग्णाच्या हालचालींवर आलेल्या निर्बंधांमुळे होणारे दुष्परिणाम कमी व्हावेत याकरिता त्याची मानसिकता बदलण्यासाठी समुपदेशन करणे.

परिचर्या नियोजनाच्या पद्धती :

अ) रुग्ण पूर्णपणे बिछान्यावर खिळून असणे (Patient confined to the bed) : रुग्णाच्या शारीरिक हालचालींवर आलेल्या निर्बंधांमुळे जेव्हा रुग्ण पूर्णवेळ बिछान्यावर असेल तेव्हा पुढीलप्रमाणे परिचर्येचे नियोजन केले जाते.

  • रुग्णाला बेडवर झोपणे किंवा बसणे याकरिता योग्य व आरामदायी स्थिती मिळावी यासाठी विविध उपकरणे व वस्तूंचा उपयोग केला जातो.
  • अधिक काळ बेडवर राहिल्याने अन्य विकृती (contracture) उद्भवू नये यासाठी वेळीच प्रतिबंधक उपाय योजले जातात. उदा. विविध प्रकारच्या उश्या, विशिष्ट प्रकारच्या गाद्या (special mattresses), हात-पाय-पाठ यांच्या आधारासाठी फळ्या इ. वापरून रुग्णास आरामदायी ठेवले जाते.
  • हात, पाय, कंबर किंवा पाठ यांचे हाड मोडले असेल तर बेडच्या कोणत्याही एका बाजूस लाकडी चौकट लावून त्यावर एक किंवा अधिक कप्पी (Pulley) बसवली जाते. आणि त्यावर आधारासाठी दोरखंड ठेवून हालचालीस साहाय्य केले जाते.
  • रुग्णाच्या निर्बंधित अवयवास सुस्थितीत ठेवण्यासाठी काही बाबींचा परिचर्येत समावेश केला जातो. उदा., रुग्णाला स्वाभाविक श्वासोच्छ्वास घेण्यासाठी व्यवस्था करणे; हृदय, फुप्फुस, मेंदू, मूत्रपिंड इ. महत्त्वाच्या अवयवांची रक्ताभिसरण प्रक्रिया सुलभतेने चालू असल्याची खात्री करणे; हाडे आणि सांध्यातील अस्वाभाविक जोड किंवा विकृती (contractures) टाळणे; उत्सर्जन संस्थेच्या कार्यावर लक्ष ठेवणे; शरीराच्या दुखऱ्या भागास आधार देऊन विश्रांतीसाठी मदत करणे इ.
  • रुग्णाची शारीरिक स्थिती गरजेनुसार वेळोवेळी बदलल्यामुळे स्नायूंचा ताठरपणा कमी होऊन त्यांची बळकटी राखली जाते, रक्ताभिसरण प्रक्रिया सुलभतेने होण्यास मदत होते, फुप्फासांवर होणारे दुष्परिणाम टाळता येतात, रुग्णाची उत्सर्जन क्रिया स्वाभाविक ठेवण्यास मदत होते इ.

आ) रुग्ण पूर्णपणे बिछान्यावर खिळून नसणे (Patient not confined to the bed) : काहीवेळा अपघात किंवा आघातामुळे रुग्णाच्या शारीरिक हालचालींवर पूर्णपणे निर्बंध येत नाही अशावेळी परिचर्या नियोजन पुढील प्रमाणे केले जाते.

  • अशा परिस्थितीत रुग्णाला त्याच्या शारीरिक क्षमतेनुसार चलन-वलन करण्याची परवानगी असते. त्याकरिता अस्थिरोगतज्ञ, शल्यचिकित्सक, भौतिकोपचारतज्ञ यांच्या सूचनांनुसार परिचारिका रुग्णास मार्गदर्शन करते.
  • विवध उपकरणे किंवा वस्तूंचे साहाय्य घेऊन रुग्णाला स्वत:चे कार्य स्वत: करण्यास प्रोत्साहन दिले जाते. उदा., योग्य उंचीचे बिछाने व खुर्च्या, सोयीस्कर प्रसाधगृह, आधारकाठी, तिपायी (tripod), कुबड्या, बिछ्यान्याजवळील लॉकर किंवा टेबल इ.
  • पायातील वापरात येणाऱ्या चप्पल / बूट योग्य आकाराचे (size) व न घसरणारे असावेत. अंगावरील कपडे पायघोळ नसावेत. जेणेकरून पडण्याची शक्यता नसेल.
  • वरीलप्रमाणे वस्तू व उपकरणे वापरात आणण्यापूर्वी रुग्णास प्रशिक्षित करण्याची जबाबदारी परिचारिकेची असते व तो सराव करणे महत्त्वाचे असते.

सारांश : वरील सर्व प्रक्रियेतून रुग्णाचा स्वावलंबीपणा आणि आत्मविश्वास वाढतो. स्वत:ची काळजी घेण्याची क्षमता वाढते. संपूर्ण आरोग्य सेवा चमू बरोबर परिचारिका रुग्णास आधार देऊन हालचालींवर आलेल्या निर्बंधनातून बाहेर येण्यास मदत करते.

संदर्भ :  

  • Hinkel, J. L.; Cheerer, K.H. Brunner & Suddarth’s Textbook of Medical-Surgical Nursing, 2017.
  • Jenkins, M. J. Principles of Nursing (Nursing Revision Notes).

समीक्षक : कविता मातेरे