शल्यक्रियागार (Operation Theatre) : शस्त्रक्रियेकरिता वापरण्यात येणाऱ्या खोल्यांना शल्यक्रियागार किंवा शस्त्रक्रियाशाला असे संबोधिले जाते. अगदी सुरुवातीच्या काळात या खोल्यांची रचना एखाद्या थिएटरप्रमाणे करण्यात आली होती. याचे बांधकाम सज्जा शैली (Gallery Style) स्वरुपात केले जात असत, ज्याचा मुख्य उद्देश शिक्षण व प्रात्यक्षिक हा होता. या सज्जामधून वैद्यकीय विद्यार्थी व परिचारिका यांना रुग्णाची शस्त्रक्रिया पाहण्याची परवानगी असे. रुग्णालयातील ही खोली सर्व अद्ययावत यंत्र व सुविधांनी सुसज्ज असून शस्त्रक्रियेच्या दृष्टीने पूर्णत: निर्जंतुक केलेली असते. शल्यक्रियागार हे ऑपरेटिंग रूम, ऑपरेटिंग सूट किंवा ऑपरेशन सूट म्हणून देखील ओळखले जाते.

शल्यक्रियागार परिचारिका (Operation Theatre Nurse) : कोणत्याही परिचारिकेची प्राथमिक जबाबदारी, रुग्णाची त्याच्या आजारपणात निरपेक्षपणे शुश्रूषा करणे ही असते. शल्यक्रियागारात कार्यरत असणाऱ्या परिचारिकांना शस्त्रक्रियेसंदर्भातील सर्व उपकरणांचे अद्ययावत ज्ञान व त्यांना हाताळण्याची कला अवगत असणे अत्यंत आवश्यक असते. याबरोबरच रुग्णाचा संपूर्ण वैद्यकीय इतिहास जाणून घेऊन, तज्ञांच्या सल्ल्यानुसार त्याला योग्य त्या औषधोपचाराची व्यवस्था करणे, आवश्यक त्या वैद्यकीय चाचण्या करणे, रुग्णाला त्याच्या आजार व उपचारासंदर्भात योग्य ती माहिती देणे आणि रुग्णाला आधार देणे ही कार्ये शल्यक्रियागारातील परिचारिका पार पाडते. शल्यक्रियागार परिचारिका होण्यासाठी नोंदणीकृत प्रशिक्षण घेणे गरजेचे असते.

शल्यक्रियागार परिचारिकेच्या भूमिका : शल्यक्रियागारात कार्यरत परिचारिका शस्त्रक्रिया सुरू होण्यापुर्वीपासून ते शस्त्रक्रिया झाल्यानंतरही आपली जबाबदारी अत्यंत काळजीपूर्वक पार पाडत असते. परिचारिका प्रत्येक कालावधीतील आपली विशिष्ट जबाबदारी स्वतंत्रपणे किंवा आरोग्यसेवा संघाचा एक घटक म्हणून पार पाडते. नोंदणीकृत परिचारिकेच्या शल्यक्रियागारातील काही सामान्य भूमिका खालील प्रमाणे :

अ) परिसंचरण करणारी परिचारिका (Circulating Nurse) : या विभागात कार्यरत परिचारिका ही नोंदणीकृत परिचारिका (Registered Nurse) असते. या परिचारिका, शस्त्रक्रियेपूर्वी रुग्णाचे मूल्यांकन करणे; शस्त्रक्रियेदरम्यान घ्यावयाच्या काळजीची योजना आखणे; शल्यक्रियागारातील सर्व कर्मचाऱ्यांशी समन्वय साधणे; रुग्ण, कर्मचारी आणि शल्यक्रियागार प्रक्रियेशी संबंधित जमा-खर्चावर देखरेख ठेवणे इ. कार्ये करत असतात. याव्यतिरिक्त यांची महत्त्वाची कार्ये पुढीलप्रमाणे :

  • सर्व उपकरणे व्यवस्थित /चालू स्थितीत आहेत याची खात्री करणे.
  • साधने व पुरवठ्यांच्या निर्जंतुकीकरणाची हमी देणे.
  • शस्त्रक्रिया करावयाच्या जागेची पूर्व तयारी करणे. निर्जंतुकीकरणाच्या पद्धती खंड पडू नये यासाठी खोली आणि कार्यसंघाच्या सदस्याचे पर्यवेक्षण करणे.
  • शस्त्रक्रियेपूर्वी भूल देण्यास मदत करणाऱ्या कर्मचार्‍यांना प्रशिक्षण देणे
  • शस्त्रक्रियेदरम्यान घेतलेले नमुने हाताळणे.
  • क्ष-किरण व रोगनिदान प्रयोगशाळा यांसारख्या इतर विभागांशी समन्वय साधणे.
  • दस्तऐवजीकरण काळजी प्रदान करणे.
  • शस्त्रक्रियागारामधील संभाषण आणि रहदारी कमीतकमी करणे.

आ) स्क्रब परिचारिका (Scrub Nurse) : स्क्रब परिचारिकेला परिपूर्ण परिचारिका असेही संबोधिले जाते. नोंदणीकृत परिचारिका किंवा शस्त्रक्रिया तंत्रज्ञ (एस.टी.) ह्याच स्क्रब परिचारिकेची भूमिका पार पाडू शकतात. स्क्रब परिचारिकाची प्रमुख कार्ये अशी : शस्त्रक्रियेसाठी लागणारी सर्व उपकरणे उपलब्ध करून देणे, निर्जंतुकीकरण तंत्रज्ञानाचा वापर करून शल्यक्रियागार, सर्व साहित्य व उपकरणे निर्जंतुक करून तयार ठेवणे, शस्त्रक्रियेदरम्यान शल्यचिकित्सकाला (Surgeon) आवश्यक सर्व साधने व उपकरणे पुरविणे, शस्त्रक्रियेनंतर सर्व साधनांची साफसफाई करणे, स्पंज, धारधार उपकरणे व इतर वस्तूंची गणना करून ठेवणे, आवश्यक असल्यास रुग्णासंदर्भातील काही महत्त्वाची कागदपत्रे तयार करणे इ.

इ) नोंदणीकृत परिचारिका प्रथम साहाय्यक (Registered Nurse First Assistant) : नोंदणीकृत परिचारिका प्रथम साहाय्यक ही एक अनुभवी शस्त्रक्रिया परिचारिका असते. नों.प.प्र.स. ही शस्त्रक्रियेदरम्यान प्राथमिक शल्यचिकित्सकांना त्यांनी दिलेल्या सूचनांनुसार सहकार्य करते, ह्या परिचारिकेची भूमिकेपेक्षा स्क्रब परिचारिकेहून वेगळी आहे. नों.प.प्र.स. च्या जबाबदारीमध्ये शल्यक्रियागार संपर्क प्रदान करणे, शस्त्रक्रियेसाठी लागणारी हत्यारे आणि उपकरणे यांचा वापर करणे, रुग्णाचे निरीक्षण करणे, रक्तस्राव अति झाल्यास नियंत्रित करणे, टाके टाकणे इ. कार्यांचा समावेश होतो.

ई) प्रमाणित नोंदणीकृत भूलतज्ञ परिचारिका (Certified Registered Nurse Anesthetist) : भूलतज्ञ परिचारिका रुग्णास भूल देण्याचे कार्य करते. तसेच शस्त्रक्रियेपूर्वी व शस्त्रक्रियेनंतर रुग्णाची विशेष काळजी घेते. प्र.नों.भू.प. या अभ्यासक्रमात प्रवेश घेण्यासाठी परिचर्या किंवा इतर योग्य क्षेत्रात विज्ञान पदवी तसेच अतिदक्षता विभागाचा ०१ ते ०२ वर्षे अनुभव असणे आवश्यक असतो. या सर्व परिचारिका भूलतज्ञाच्या मार्गदर्शनाखाली काम करतात.

उ) व्यवस्थापन परिचारिका (Management Nurse) : मानवी आणि आर्थिक संसाधनांची मुख्य जबाबदारी व्यवस्थापन परिचारिकेवर असते. त्याचबरोबर रुग्ण व कर्मचाऱ्यांचे समाधान करणे, रुग्णालयातील सर्व घटकांकरिता सुरक्षित वातावरण तयार करणे, रुग्णालयाचा दर्जा (Standard) व काळजीची गुणवत्ता (Quality of care) राखली जात आहेत हे सुनिश्चित करणे इ. जबाबदाऱ्या देखील व्यवस्थापन परिचारिका पार पाडते. व्यवस्थापन परिचारिका ही नोंदणीकृत परिचारिका असू शकते तसेच परिचर्येत पदवी (Sc. Nursing) प्रदान केलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाते. मोठ्या रुग्णालयांत पदव्युत्तर प्रावीण्य (M.Sc. Nursing in Medical / surgical) असणे आवश्यक आहे.

ऊ) प्रशिक्षक परिचारिका (Instructor Nurse) : प्रशिक्षक परिचारिका शल्यक्रियागार कर्मचार्‍यांना निरंतर शिक्षण देण्यास जबाबदार असतात, नवीन कर्मचार्‍यांना दिशानिदेशन (Orientation) आणि विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देतात. प्रशिक्षक परिचारिका कोणत्याही नोंदणीकृत परिचारिका (आरएन) असू शकतात. परंतु सामान्यता पदवी किंवा पदव्युत्तर असणाऱ्या परिचारिका त्यांच्या अध्यापणाच्या जबाबदारीसोबत चिकित्सालयीन परिचारिका (Clinical Nurse) तज्ञाची भूमिका देखील पूर्ण करू शकतात.

ए) केस व्यवस्थापक परिचारिका (Case Manager Nurse) : शस्त्रक्रिया पूर्व व्यवस्थापक हा रुग्णाच्या शस्त्रक्रियेपूर्वीच्या शुश्रूषेसाठी जबाबदार असतो. या पदासाठी दीर्घ अनुभव व सुसंवाद करण्याची क्षमता असणे गरजेचे असते. शस्त्रक्रियापूर्व आणि शस्त्रक्रियेनंतरची (post discharge) सेवा-शुश्रूषा करण्याबाबत सर्व साधारण माहिती रुग्ण व त्याचे नातेवाइकांना पुरविण्याची जबाबदारी केस व्यवस्थापक परिचारिका घेतात.

ऐ) प्रगत सराव परिचारिका (Advance Nurse Practitioner) : प्रगत सराव परिचारिका ही प्रगत पदवी आणि कौशल्य असलेली एक नोंदणीकृत परिचारिका असते. या परिचारिकेने परिचर्येमध्ये किमान पदव्युत्तर पदवी घेतलेली असणे आवश्यक असते. प्रगत सराव परिचारिका रुग्णाच्या चाचणी निकालाचे मूल्यांकन, निदान आणि निर्वचन (Interpretation) यावर आधारीत निर्णय घेण्यास स्वायत्त (Autonomous) असतात. त्या रुग्णास स्वतंत्रपणे औषधे देण्यास सक्षम असतात तसेच आवश्यकता भासल्यास इतर तज्ञांचा सल्ला घेण्यास सुचवू शकतात. प्रगत सराव परिचारिका एक वैद्यकीय परिचर्यातज्ञ असते, ज्या रुग्णालयाच्या रुग्णवाहक शस्त्रक्रिया केंद्रामध्ये किंवा शस्त्रक्रिया वैद्य गटांमध्ये कार्यरत असतात. प्रगत सराव परिचारिका नेहमी शल्यक्रियागारामध्ये व आवश्यकतेनुसार कार्यालय, घरे, रुग्णालय यूनिट किंवा इतर जागेवर रुग्णांशी संवाद साधू शकतात.

संदर्भ :

समीक्षक : राजेंद्र दशरथ लामखेडे