अपघात, बलात्कार किंवा नैसर्गिक आपत्ती इत्यादींसारख्या भयानक घटनेला भावनिक प्रतिसाद म्हणजे आघात किंवा ट्रॉमा होय. आघाताचा प्रकार व रुग्णाची सर्वसाधारण स्थिती यास अनुसरून रुग्णास शुश्रूषा दिली जाते. रुग्णाच्या महत्‍त्वाच्या शारीरिक संस्थांचे (vital organs) कार्य लवकरात लवकर सुरळीत करण्याचा आरोग्य संघाचा प्रमुख उद्देश असतो. आरोग्य संघात आपत्कालीन विभागात कार्यरत परिचारिकेचा सहभाग महत्त्वाचा असतो. अशा रुग्णसेवेकरिता परिचारिकेला विशिष्ट प्रशिक्षण दिले जाते. या विभागात कार्य करण्याकरिता परिचारिकेला मास्‍टर ऑफ नर्सिंग इन मेडिकल-सर्जिकल – ट्रॉमा केअर ही पदव्युत्तर पदवी घ्यावी लागते.

आघाताचे रुग्णावर होणारे परिणाम

परिचारिकेची कर्तव्ये व जबाबदारी : आघातानंतर रुग्णाला देण्यात येणाऱ्या त्वरीत उपचारादरम्यान परिचारिका पुढीलप्रकारे आपली जबाबदारी पार पाडत असते.

  • सुवर्णतास (Golden hour) : आघात झाल्यानंतर त्वरित एक तासात (पाहिल्या ३ ते ५ मिनिटात) रुग्ण सेवा मिळाल्यास त्या व्यक्तीचा जीव वाचू शकतो. आघात केंद्रामध्ये (Trauma Centre) रुग्ण आल्यानंतर परिचारिका आरोग्य संघाचा एक घटक म्हणून रुग्ण तपासणी करताना काही निरक्षणे करून नोंदी ठेवते आणि डॉक्टरांना कळवितात. उदा., १) रुग्ण दाखल झाल्याबरोबर त्याला अर्धवट पालथ्या स्थितीत झोपवून, रुग्ण बेशुद्धावस्थेत असलेल्या त्याच्या बेशुद्धावस्थेचा स्तर (level) तपासतात. २) रुग्णाची नाडी, श्वासोच्छ्वास, शरीराचे तापमान ठराविक कालावधीने तपासून नोंद करतात. ३) रुग्णाची नखे, कानांच्या पाळ्या, ओठ आणि जिभेचा रंग (गुलाबीसर – स्वाभाविक; फिक्कट गुलाबी; निळसर रंग – अस्वाभाविक) बघून रुग्णाच्या गंभीर स्थितीविषयी (level of consciousness) तपासणी केली जाते.
  • रुग्णाचा हवेचा मार्ग (Airway petency ) मोकळा करणे : आघातानंतर रुग्णाच्या जीविताचा धोका टाळण्यासाठी, त्याची स्वाभाविक श्वास घेण्याची क्रिया चालू राहण्यासाठी श्वसन मार्ग मोकळा असणे गरजेचे असते त्याकरिता रुग्ण शुश्रूषेमध्ये पुढील बाबींचा तत्काळ समावेश केला जातो : १) रुग्णाचे तोंड उघडून हवेचा मार्ग तपासणे, २) घशात काही अडकले नसल्याची खात्री करणे, ३) घशात रक्तस्राव, लाळ किंवा थुंकी साठलेली आहे का, याची तपासणी करणे, ४) शोषण यंत्र आणि शोषण नलिका यांच्या साहाय्याने रुग्णाचा घसा स्वच्छ करणे, ५) रुग्णाची जीभ घशात मागे पडून श्वसनास अडथळा येतो आहे का याची पाहणी करणे, ६) घशातील सुजेमुळे हवेचा मार्ग बंद झाला आहे काय ते पाहणे, ७) गुदमरण्याचे/बेशुद्धावस्थेचे कारण शोधण्याचा प्रयत्न करणे, ८) वयस्कर रुग्ण असल्यास त्याचे कृत्रिम दात ( दातांची कवळी) आहे का हे तपासणे व तसे आढळल्यास कृत्रिम दात काढून ठेवणे, ९) आवश्यकतेनुसार कृत्रिम वायुवीजन नळी टाकण्याची तयारी करावी व डॉक्टरांना कळवावे.
  • स्वाभाविक श्वासोच्छ्वास व्यवस्थापन : आघातानंतर रुग्णाची श्वासोच्छ्वास क्रिया पूर्ववत होण्यासाठी परिचारिका पुढीलप्रमाणे व्यवस्थापन करत असतात – १) रुग्णाच्या श्वासोच्छ्वासाच्या निरीक्षणांची आणि रुग्णाच्या बेशुद्धावस्थेत त्याच्‍यात होणारे बदल व सुधारणा यांची नोंद करून ठेवते. २) श्वसनक्रिया अतिमंद किंवा अस्वाभाविक आढळल्यास कृत्रिम श्वास देण्याकरिता ॲम्बु बॅग (Ambu Bag), सामान्य मुखाच्छादक (Common Mask), हवापूरक मुखाच्छादक (Mask with inflator), संजीवनित्र (Resuscitator) इ. उपकरणांचा उपयोग करतात.
  • अभिसरण क्रिया : रुग्णाची रक्ताभिसरणाची ‍क्रिया योग्य होत आहे याची खात्री करण्याकरिता – १) रुग्णाच्या मनगटातील किंवा जांघेतील नाडी तपासली जाते. २) शरीराचे तापमान कमी झाल्यास जास्तीचे पांघरून देऊन त्याच्या पायाकडील बाजू उंच करतात. ३) बेशुद्धावस्थेचे कारण समजल्यास स्वाभाविक रक्ताभिसरण क्रियेकरिता उपाययोजना करण्यास साहाय्य होते.
  • हृद्-फुप्फुस पुनरुत्थान क्रिया (C.P.R.) : या प्रक्रियेत रुग्णाला कठीण पृष्ठावर किंवा सतरंजीवर उताणे झोपवून डोक्याखाली अशी उशी देतात ज्याने त्याची मान जास्तीत जास्त वर राहिल. दोन्ही हातांच्या अंगठ्याने खालचा जबडा उचलून धरतात (सूचना : रुग्णास मान किंवा पाठीच्या मणक्याची दुखापत असल्यास मान उचलू नये) आणि पुढील प्रकारे कृत्रिम रीत्या श्वास देण्यास सुरुवात केली जाते – १) आरोग्य कर्मचारी किंवा परिचारिका आपले दोन्ही तळहात पाठीमागील बाजूने एकमेकांवर ठेऊन हात कोपरामध्ये न दुमडता रुग्णाच्या हृदयाच्या ठिकाणी दाब देतात. २) एक श्वसन आणि चारवेळा हृद मर्दन (Cardiac Massage) याप्रमाणे एकाआड एक अशी ही प्रक्रिया रुग्णाची नाडी आणि श्वसन क्रिया स्वाभाविक होईपर्यंत पुन:पुन्हा केली जाते. ३) रुग्णात होणाऱ्या परिणामांचे निरीक्षण करून नोंद ठेवली जाते.
  • आपत्कालीन परिस्थिती : पूर, भूकंप, चक्रीवादळ, दुष्काळ इ. नैसर्गिक आपत्ती आणि अपघात, बॉम्बस्फोट, दंगली, वायूगळती इ. अनैसर्गिक आपत्ती अशा परिस्थितीमध्ये साधारणत: रुग्णास होणाऱ्या इजा आणि आघात हे त्या आपत्कालीन घटनेवर अवलंबून असतात. अशा रुग्णांच्या सेवेकरिता संपूर्ण आरोग्य संघाचा सहभाग असतो.

आपत्कालीन परिस्थितीत परिचारिकेची मुख्य जबाबदारी : १) संबंधित विभागात गरजेनुसार खाटांची उपलब्धता तपासणे. २) आवश्यक असणारी सर्व साधनसामग्री, प्रथमोपचाराची सर्व साधने, औषधे, रक्त साठा, निर्जंतुकीकरणाची साधने, मलमपट्टीची साधणे इ. सर्व साठा तयार ठेवणे. ३) संबंधित आपत्कालीन विभागाच्या नियमांनुसार रुग्णाच्या सर्व नोंदी ठेवणे व गरजेनुसार पोलीस प्रक्रिया पूर्ण करणे. ४) विभागातील सर्व माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांना ‍कळविणे. ५) रुग्णाच्या स्थितीनुसार व नातेवायीकांच्या संमतीनुसार पुढील रुग्ण व्यवस्थापन आणि उपचारांसाठी संदर्भ सेवा देण्याची सोय करणे.

आघात केंद्रामध्ये उपचारासाठी दाखल झालेल्या रुग्णांचा दाखल झाल्यानंतरचा एक तास हा त्याला तात्काळ दिल्या जाणाऱ्या शुश्रूषेचा सुवर्णकाल समजला जातो. त्या दरम्यान दिली जाणारी रुग्णसेवा तसेच आघात केंद्रामध्ये कार्यरत असलेल्या आरोग्यसेवा संघाच्या ज्ञान आणि तत्कालीन सेवा देण्याच्या कौशल्य गुणांवर रुग्णाचा जीव वाचवणे अवलंबून असते. म्हणूनच आपत्कालीन विभागात काम करणाऱ्या संघाला त्याकरिता विशेष प्रशिक्षण दिलेले असते.

संदर्भ :

  1. Hinkle, Janice L.; Kerry H., Cheever Textbook Of Medical-Surgical Nursing, South Asian Edition (Vol1&2).
  2. Kochar, S. K., Principles And Practice Of Trauma Care, 2nd Edition.
  3. https://fampsy.org/psychological-trauma/

 समीक्षक : राजेंद्र लामखेडे