वज्रासन
वज्रासन : पश्चबाजू स्थिती.

एक आसनप्रकार. वज्र म्हणजे इंद्रदेवाचे आयुध. वज्र हे अतिशय दृढ व शक्तिशाली असते. त्याप्रमाणेच या आसनात स्थिर व दृढ राहता येऊ शकते म्हणून याला वज्रासन असे म्हणतात. हठप्रदीपिकेत कूर्मासन या नावाचे वज्रासनासारखेच दिसणारे आसन दिलेले आहे. घेरण्डसंहितेत (२.१२) व इतर अनेक ग्रंथांमध्ये वज्रासनाचे वर्णन आहे. या आसनात बसून योगमुद्रा, ब्रह्ममुद्रा, शशांकासन, समर्पणासन, सुप्त वज्रासन ही आसने तसेच प्राणायाम, ध्यान, ओंकारजप इत्यादी साधना करता येते. त्यामुळे हे आसन महत्त्वपूर्ण आहे.

कृती : दंडासनात ताठ बसावे. उजवा पाय दुमडून त्याचे पाऊल धरून ते उजव्या बाजूनेच उजव्या नितंबाखाली टाच बाहेर व पावलाची बोटे आतल्या बाजूने असे ठेवावे. थोडे उजवीकडे झुकून दावा पाय वाकवून, डाव्या बाजूने वळवून त्याचे पाऊल डाव्या नितंबाखाली, टाच बाहेर व बोटे आत असे नीट ठेवावे. म्हणजेच दोन टाचांच्या मधे परंतु, टाचा नितंबांच्या बाजूला असे ताठ बसावे. गुडघे जुळवून ठेवावे. हात गुडघ्यांवर ताठ ठेवावेत. या आसनात १ ते ३ मिनिटे किंवा त्याहीपेक्षा जास्त वेळ बसता येईल. पोट थोडे आत घेऊन स्थिर ठेवावे व छातीने श्वसन होऊ द्यावे. डोळे मिटून शांत बसावे.

ज्यांना पाय बाजूने वळवून आसनाची रचना करणे जमत नाही त्यांना प्रथम दोन्ही गुडघ्यांवर उभे रहावे. मागे असलेल्या पावलांमधे आपल्या नितंबांच्या प्रमाणानुसार अंतर ठेवावे व सावकाश दोन्ही टाचांच्या मधे बसावे. आसन सोडताना पुन्हा गुडघ्यांवर उभे रहावे व नंतर उभे राहावे किंवा सामान्यपणे मांडी घालून बसावे. या आसनात ताठ बसणे अत्यंत महत्त्वाचे आहे. दोन्ही नितंबांवर एकसारखा भर असावा. मान व डोके सरळ ठेवावे. या आसनात दुमडलेले गुडघे तसेच ठेवून पाठीवर झोपल्यास सुप्त वज्रासन हे आसन होते.

सुप्त वज्रासन

लाभ : ज्यांना पद्मासन जमत नाही त्यांना या आसनात बसून प्राणायाम, ओंकारजप, ध्यान इत्यादी साधना करता येऊ शकतात. या आसनामुळे मेरुदंड ताठ ठेवता येऊ शकतो व डोळे मिटून बराच वेळ स्थिर राहता येते. या आसनात मांड्यांचे स्नायू ताणले गेल्याने गुडघ्यांवरही ताण पडतो. यामुळे गुडघ्यांचे आरोग्य चांगले राखले जाते. कटिप्रदेश, ओटीपोट, जननेंद्रियाच्या सभोवतालचा भाग यांवर या आसनाचा विशेष असा परिणाम आहे. जेवणानंतर इतर आसने करायची नसतात. परंतु, वज्रासन यास अपवाद आहे. जेवल्यानंतरही या आसनात ५—१० मिनिटे बसता येऊ शकते, त्यामुळे पचनक्रियेस मदत होते.

विधिनिषेध : पहिल्याच दिवशी या आसनात काही सेकंदांपेक्षा जास्त वेळ बसू नये. पावलानंतर नितंबांचा भर पडून काही जणांना वेदना होऊ शकतात. अशा वेळी किंवा गुडघे दुखत असतील तर हे आसन करू नये. अन्यथा गुडघे, मांड्यांचे स्नायूबंध यांना दुखापत होण्याची शक्यता असते. संधिवात किंवा सायनोव्हायटिस असे विकार असतील तर हे आसन करू नये.

                                    समीक्षक : विनोद जोशी