ज्यू आणि ख्रिस्ती धर्मीयांचा पवित्र धर्मग्रंथ. बायबलला ‘देवशब्द’ असेही म्हटले जाते (देवशब्द–ईश्वरी प्रेरणा व देवशब्दाची जडणघडण). बायबल हा शब्द मूळ ग्रीक भाषेतून इंग्रजीत आला. ‘ता बिब्लिया’ (Ta Biblia) ह्या ग्रीक शब्दाचा अर्थ म्हणजे अनेक लहान-मोठ्या पुस्तकांचा संग्रह. ‘Bible’ ह्या इंग्रजी शब्दप्रयोगावरून मराठीसारख्या इतर भाषांतही बायबल हा शब्दप्रयोग रूढ झाला आहे. इंग्रजीत बायबलसाठी ‘होली स्क्रिप्चर्स’ हा पर्यायी शब्दही वापरला जातो, तसेच मराठीतही ‘पवित्र शास्त्र’ हा पर्यायी शब्द वापरला जातो.
बायबलचे पूर्वार्ध आणि उत्तरार्ध असे दोन भाग आहेत. पूर्वार्ध हा ‘जुना करार’ म्हणून; तर उत्तरार्ध हा ‘नवा करार’ म्हणून ओळखला जातो. कॅथलिक परंपरेप्रमाणे ‘जुन्या करारा’मध्ये ४६ पुस्तकांचा समावेश असून ‘नवा करार’ हा २७ पुस्तकांचा मिळून बनला आहे. ‘करार’ ही संज्ञा एखाद्या संहितेला वापरली जाण्याअगोदर हिब्रू (इब्री) लोकांच्या आणि इझ्राएली लोकांच्या कथांमध्ये आपण ‘करार’ (ठराव) याबद्दल ऐकतो. देवाने नोहाशी, अब्राहमशी आणि डेव्हिड राजाशी केलेल्या अशा करारांद्वारे आपले विशेष साहाय्य आणि आशीर्वादाचे आश्वासन दिलेले आहे; तथापि परंपरेनुसार देवाने मोझेस(मोशे)बरोबर आणि इझ्राएली जनतेबरोबर केलेले करार सर्वांत प्रसिद्ध आहेत. अशा करारांद्वारे इझ्राएली लोक ‘देवाचे निवडलेले लोक’ बनले. (‘जुना करार’–निर्गम १९:५,३४:१०-२७).
इ.स.पू. १३०० ते १०० ह्या साधारणत: बाराशे वर्षांच्या कालावधीत ‘जुन्या करारा’चे लेखन झाले आहे. इ.स.च्या पहिल्या शतकामध्ये ‘नव्या करारा’चे लेखन झाले आहे. सु. चौदाशे वर्षांच्या कालखंडात अनेक साक्षात्कारी लेखकांनी बायबलमधील ग्रंथांचे लेखन, संपादन आणि संग्रहन केले आहे. बायबलमध्ये ७३ पुस्तकांचा संग्रह असून त्यांची निर्मिती क्रमाक्रमाने झाली आहे. विविध वाङ्मयप्रकार व नानाविध विषय त्यामध्ये हाताळलेले आपणास पाहावयास मिळतात. विविधता असूनही एकता हे बायबलचे मूलभूत वैशिष्ट्य आहे.
बायबल हा ख्रिस्ती श्रद्धेची ओळख करून देणारा, सकारात्मक जीवन व प्रेरणा देणारा, ख्रिस्ती धर्माची मूलभूत तत्त्वे समजावून सांगणारा जीवंत ग्रंथ आहे. देव कसा आणि कुठे प्रकट झाला हे सर्व या ग्रंथात आढळून येते. येशू हा बायबलच्या केंद्रस्थानी असल्यामुळे ख्रिस्ती लोक बायबलला ‘देवाचा शब्द’ असे संबोधतात. शुभवर्तमानकार योहान म्हणतो, ‘‘प्रारंभी शब्द होता, आणि शब्द देवासह होता आणि शब्द देव होता… त्याच्या ठायी जीवन होते व ते जीवन मनुष्यमात्राचा प्रकाश होते’’ (योहान १:१-४).
बायबल हे परमेश्वराचे प्रकटीकरण आहे. परमेश्वर कसा आहे, तो कोणत्या स्वरूपात आहे, त्याचे प्रेम आणि सामर्थ्य किती अमर्याद आहे, हे सारे परमेश्वराने स्वत: प्रकट केले आहे. ‘जुन्या करारा’च्या काळात यहुदी (ज्यू) लोक एकेश्वरवादी बनले होते. त्यांच्या आसपासच्या प्रदेशांतील परराष्ट्रीय लोक हे अनेक देव-देवतांच्या भजनी लागले होते. अशा पार्श्वभूमीवर परमेश्वर यहुदी लोकांस सांगतो, ‘‘मी परमेश्वर तुझा देव आहे. माझ्याखेरीज तुला वेगळे देव नसावेत’’ (निर्गम २०:२-३). परमेश्वर एकच आहे.
माणूस परमेश्वराच्या प्रतिमेप्रमाणे बनलेला असला, तरी त्याचा ओढा पापवृत्तीकडे आहे. मानवाने सतत देवाची आज्ञा मोडून तारणकार्यात अडथळा निर्माण केला. सर्व मानवजातीचे तारण करण्यासाठी परमेश्वराने स्वत:चा पुत्र येशू ह्या जगात पाठवला. येशूने क्रूसावर प्राणार्पण करून मानवजातीचे तारण केले. येशूचे कार्य पुढे चालू ठेवणाऱ्या त्याच्या शिष्यांवर पवित्र आत्मा अवतरला (बायबल, ‘प्रेषितांची कृत्ये’ २:३-४). परमेश्वर एकच असून तो पिता, पुत्र (येशू) आणि पवित्र आत्मा अशा तीन व्यक्तींत प्रकट झाला, अशी ख्रिस्ती धर्मीयांची श्रद्धा आहे. देवपणात तीन व्यक्ती असल्या, तरी त्यांचे स्वरूप एकच असून त्या तिघांना मिळून ‘पवित्र त्रैक्य’ (Trinity) असे संबोधले जाते.
वेगवेगळ्या काळांत परमेश्वराने ठरावीक लोकांना निवडून, त्यांना पवित्र आत्म्याची प्रेरणा देऊन, त्याचे प्रकटीकरण शब्दबद्ध करण्यासाठी प्रेरणा दिली. मानवी लेखक हे ‘साधन’ (लेखनिक) झाले असले, तरी खरा लेखक परमेश्वरच आहे. बायबलमधील ग्रंथ हे पवित्र आणि ईशप्रेरित आहेत, अशी ख्रिस्ती लोकांची श्रद्धा आहे. बायबलमधील प्रत्येक पुस्तकाचा लेखक वेगळा असल्यामुळे प्रत्येक पुस्तकाची रचना, भाषाशैली आणि वाङ्मयप्रकार ह्यांमध्ये वेगळेपणा जाणवतो. बायबलचे लेखन मानवी लेखकांनी केले असल्याने त्यात काही मानवी मर्यादा असणे क्रमप्राप्त आहे. बायबलचे वाचन करताना प्रत्येक लेखकाची संस्कृती, तत्कालीन समाजाची विचारसरणी आदी गोष्टी विचारात घेणे जरूरीचे आहे. बायबल जरी अनेक लेखकांनी वेगवेगळ्या कालखंडांत लिहिले असले, तरी त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांचा आणि घटनांचा उद्देश एकच आहे; तो म्हणजे मानवाच्या अंतिम व शाश्वत तारणासाठी परमेश्वराची जी योजना आहे, ती प्रकट करणे. ‘‘बायबलच्या बाबतीत जो हेतू परमेश्वराचा होता तोच मानवी लेखकांचा होता… म्हणूनच श्रद्धावंत समाजाने–म्हणजेच चर्चने–त्यांच्या लिखाणास अधिकृतपणे मान्यता दिली’’ असे फादर दिब्रिटो सुबोध बायबल ह्या आपल्या ग्रंथात म्हणतात.
बायबलचे लिखाण करणे हे मानवी लेखकांसाठी सहज साध्य नव्हते. हे लिखाण करण्यासाठी त्यांना खूप परिश्रम घ्यावे लागले (बायबल, २ मक्काबी २:२४-३२). बायबलमधील काही पुस्तके जरी काही विशिष्ट व्यक्तींच्या नावाने असली, उदा., संदेष्ट्यांपैकी यशया, यिर्मया, यहज्ज केल आणि शुभवर्तमानकारांपैकी मत्तय, मार्क, लूक, योहान, तरी त्या त्या पुस्तकाच्या रूपाने अनेक पिढ्यांची, अनेक शतकांची विचारधारा, त्यांची संस्कृती आणि त्यांचा इतिहास या सर्वांचे दर्शन तिथे घडते. संदेष्टे हे स्वत: लेखक नव्हते, तर ते प्रामुख्याने प्रबोधनकार होते. त्यांनी केलेले प्रबोधन, त्यांचे मूळ लिखाण, त्यांच्या शिष्य-परिवाराने त्यात टाकलेली भर, त्यांची आत्मचरित्रपर टिपणे आणि भाष्ये या सर्व गोष्टींचा समावेश एका ग्रंथात झालेला आढळतो. सरतेशेवटी त्या ग्रंथाचे संपादन झालेले असते. संदेष्ट्यांच्या ग्रंथाबाबतीत जे घडले, तसेच मोझेसलिखित ग्रंथ पंचक व इतर ग्रंथांबाबतीतही खरे आहे.
‘नव्या करारा’चे वाचन करणाऱ्यांना ‘जुन्या करारा’चीही माहिती असावी, अशी ‘नव्या करारा’च्या लेखकांची अपेक्षा आहे; कारण अनेक वेळा ‘जुन्या करारा’तील वचनांचे संदर्भ, यहुदी लोकांच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक जीवनाविषयीचे संदर्भ ‘नव्या करारा’त आढळून येतात. आपला तारणहार येणार आहे, असे ‘जुना करार’ सुचवितो; तर ‘नव्या करारा’त तोच तारणहार येशू प्रकट झाल्याचे दिसून येते.
बायबल ही जशी ईश्वराच्या अथांग प्रेमाची कहाणी आहे, तशीच ती माणसाच्या श्रद्धेची कथा आहे. अब्राहम, मोझेस आणि डेव्हिड यांसारख्या थोर भक्तांचे आदर्श बायबलमध्ये आढळतात. श्रद्धा पक्की असावी, एकनिष्ठ असावी, याची बायबल सतत आठवण करून देते.
संदर्भ :
- Wansbrough, Henry, Ed. The New Jerusalem Bible, London, 1985.
- दिब्रिटो, फ्रान्सिस, सुबोध बायबल, पुणे, २०१०.
समीक्षक : फ्रान्सिस कोरिया