थिबा राजे : (१ जानेवारी १८५९–१९ डिसेंबर १९१६ ). म्यानमारच्या (पूर्वीचा ब्रह्मदेश) कॉनबाँग वंशातील शेवटचे राजे. मिंडान राजांचे (कार. १८५३-७८) हे कनिष्ठ पुत्र. त्यांचा जन्म मंडाले येथे झाला. थिबांनी बौद्ध मठात काही काळ शिक्षण घेतले. राजपुत्राला आवश्यक ते प्रशिक्षण त्यांनी राजवाड्यात घेतले. थिबा मुळचे धर्मनिष्ठ, पाली भाषा आणि वाङ्मय यांचे अभ्यासक आणि बौद्ध धर्माचे उपासक होते. त्यांचा विवाह सुपयालत या युवतीबरोबर झाला. थिबांवर राणी सुपयालत यांचा प्रभाव होता.
ब्रिटिशांनी आधीपासूनच आपल्या हिंदुस्थानी साम्राज्याच्या सीमा पूर्वेकडे विस्तारित करण्याचे प्रयत्न सुरू केले होते. या दृष्टीनेच त्यांनी ब्रह्मी राज्यकारभारात हस्तक्षेप सुरू केला होता. यातूनच इंग्रज-ब्रह्मदेश यांच्यात युद्धे घडून आली (१८२४-२६; १८५२-५३). या युद्धांत इंग्रजांनी आराकान, तेनासरीम आदी ब्रह्मी प्रदेश ताब्यात घेतला होता. दुसऱ्या महायुद्धानंतर (१९३९-४५) इंग्रजांनी मिंडान यांच्याशी दोन व्यापारी तह केले होते (१८६२ व १८६७). मिंडान यांनीही ब्रह्मी सार्वभौमत्व ठेवूनच ब्रिटिशांशी सलोख्याचे संबंध ठेवले होते; तथापि ब्रिटिशांनी मात्र मिंडान यांची अनुमती न घेता ब्रह्मदेशाच्या मांडलिक राजांशी परस्पर राजकीय व व्यापारी संबंध स्थापण्याचे प्रयत्न सुरू केले. त्यामुळे मिंडान यांची चिंता वाढली. राजकीय डावपेचातून इंग्रजांनी मिंडान यांची सत्ता अस्थिर केली. मिंडान यांच्या मृत्यूनंतर थिबा म्यानमारच्या गादीवर आले (१८७८).
थिबा यांनीही ब्रिटिशांशी सलोख्याचे धोरण चालू ठेवले होते; तथापि इंग्रजांनी ब्रह्मी शासन व्यापारी करार योग्य रीतीने पाळत नाही, असा आरोप थिबा यांच्यावर लावला. यावेळी थिबा यांनी नवा व्यापारी करार करण्यासाठी ब्रिटिशांसोबत वाटाघाटीचे प्रयत्न केले, पण ते अयशस्वी ठरले (१८८२). पुढे थिबा यांनी फ्रान्स, इटली या यूरोपीय राष्ट्रांशी मदतीची बोलणी केली. ब्रिटिशांकित प्रदेश मिळविण्यासाठी थिबांनी फ्रेंचांची मदत घेण्याचे ठरविले आणि आपले एक शिष्टमंडळ पॅरिसला पाठविले (१८८३). त्यानंतर फ्रान्सबरोबर व्यापारी करार करण्यात आला. त्यानुसार काही फ्रेंच प्रतिनिधी मंडाले येथे वाटाघाटी करण्यासाठी आले. ब्रिटिशांना हे रुचले नाही. त्यातच आणखी एक प्रकरण घडले. ब्रिटिश मालकीची बर्मा ट्रेडिंग कंपनी ही जंगलातून लाकूड खरेदी करीत असे. ही कंपनी बेकायदेशीर जंगलतोड करून ब्रह्मी शासनाची फसवणूक करते, या कारणास्तव कंपनीस दंड करून नुकसानभरपाई देण्याचा आदेश ब्रह्मी सरकारने दिला. या निर्णयाचा ब्रह्मी सरकारने फेरविचार करावा आणि ब्रह्मी सरकारने इंग्रजांशी परराष्ट्रीय संबंध ठेवावेत, असा निर्वाणीचा खलिता हिंदुस्थानच्या व्हॉइसरॉयद्वारे पाठविण्यात आला, त्याकडे थिबांनी दुर्लक्ष केले. त्यामुळे थिबा राजे जुलमी व अनियंत्रित सत्ताधीश असून फ्रेंचांच्या चिथावणीने इंग्रजांविरुद्ध कारवाया करीत आहेत, हे कारण पुढे करत इंग्रजांनी ब्रह्मदेश ब्रिटिश साम्राज्यात विलीन करण्यासाठी हालचाली सुरू केल्या.
थिबा यांनीही ब्रह्मी जनतेला इंग्रजांना प्रतिरोध करण्याचे आव्हान केले. तत्कालीन व्हॉइसरॉय लॉर्ड फ्रेडरिक डफरिन यांनी फौज पाठवून ब्रह्मदेश पादाक्रांत केला (१४ नोव्हेंबर १८८५). ब्रह्मी सैन्याने थोडा प्रतिकार केला; तथापि अल्पावधीतच ब्रिटिशांनी मंडाले ताब्यात घेतले. थिबांना पदच्युत करून कुटुंबासह त्यांना महाराष्ट्रातील रत्नागिरी येथे नजरकैदेत ठेवण्यात आले आणि त्यांचे राज्य ब्रिटिश साम्राज्यात समाविष्ट करण्यात आले.
थिबांनी पुन्हा बंड करू नये म्हणून त्यांच्या वास्तव्यासाठी रत्नागिरी येथेच ब्रिटिशांनी ब्रह्मी पद्धतीचा प्रशस्त राजवाडा बांधला. ही वास्तू थिबा पॅलेस म्हणून प्रसिद्ध आहे. अखेरच्या काळात त्यांच्या कुटुंबियांची दैन्यावस्था झाली. सु. ३० वर्षांच्या कैदेनंतर रत्नागिरी येथे थिबांचे निधन झाले. तेथे त्यांचे समाधी-स्मारक आहे.
संदर्भ :
- Trager, F. N. Burma : From Kingdom to Independence, London, 1966.
- Woodman, Dorothy, The Making of Burma, London, 1962.
- कर्णिक, मधु मंगेश, राजा थिबा, अनघा प्रकाशन, ठाणे, २०११.
- शहा, सुधा, अनु., जोशी, गिरीश, हद्दपार राजा : थिबा, मुंबई, २०१५.
समीक्षक : सरोजकुमार मिठारी
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.