गुरजाड वेंकट अप्पाराव : (२१ सप्टेंबर १८६२- ३० नोव्हेंबर १९१५). प्रसिद्ध तेलुगू कवी, नाटककार, कथाकार, समीक्षक, देशभक्त आणि समाजसुधारक. जन्म विशाखापटनम् जिल्ह्यातील रायवरम् गावी. विजयानगरला शालेय शिक्षण चालू असतानाच त्यांनी काव्यरचनेस आरंभ केला. त्यांच्या इंग्रजी कविता शंभुचंद्र मुखर्जींच्या रईस अँड रय्यत  या मासिकात प्रसिद्ध होऊ लागल्या. १८८६ मध्ये बी.ए. झाल्यावर त्यांनी लिपीक, प्राध्यापक आणि पुरालेखविज्ञ म्हणून नोकऱ्या केल्या. विजयानगरचे विद्याप्रेमी अधिपती आनंद गजपती यांच्या सहवासाने त्यांच्या साहित्यसेवेस उत्तेजन मिळाले.

वीरेशलिंगम् यांची देशभक्ती व समाजसुधारणा आणि गिडुगू राममूर्तींचे लोकभाषाप्रेम या दोहोंचा पुरस्कार गुरजाडांनी निष्ठापूर्वक केला. १८९६ ते १९१५ या काळात कवी, नाटककार, कथालेखक आणि समीक्षक या नात्यांनी त्यांनी स्पृहणीय यश मिळविले. त्यांनी ‘मुत्यालसरम्’ नावाच्या नव्याच वृत्तात काव्यरचना केली. मुत्याल सरमुलु  या नावाचा त्यांचा काव्यसंग्रह आहे. त्यात जातिभेदाचे खंडन, प्रेमाचे उज्ज्वल स्वरूप, मानवामानवांतील ऐक्य, परकीय राजसत्तेचा धिक्कार, खरे मित्रप्रेम, स्वातंत्र्यचळवळीस चेतावणी, मूर्तिपूजेचे खंडन इ. विषय प्रभावीपणे मांडले आहेत. जरठकुमारी विवाहाचा कडाडून निषेध करणारी ‘पूर्णम्मा’ ही कविता करुणरसपूर्ण आहे. त्यांच्या देशभक्तिपर कविता ओजस्वी आहेत. देशावरील प्रेम म्हणजे देशबांधवांवरील प्रेम, असे ते कळकळीने सांगतात आणि देशहितासाठी झटण्याचे आवाहनही करतात. ग्रांथिक भाषेत काव्य रचण्याची अप्पारावांमध्ये पात्रताच नाही, अशा टीकेला उत्तर देण्यासाठी त्यांना ग्रांथिक भाषेत सुभद्रा  हे काव्य लिहून दाखविले.

‘दिद्‌दुबाटु’, ‘मी पेरेमिटि’, ‘मेटिल्डा’, ‘संस्कर्त हृदय’ या नामांकित कथांत त्यांनी समाजदोषांवर विनोदी पद्धतीने मार्मिक टीका केली आहे. कन्याशुल्कम्  (१८९७) हे एकच नाटक त्यांनी लिहिले असते, तरी त्यांची कीर्ती अजरामर झाली असती. कन्याविक्रयाच्या तत्कालीन दुष्ट रूढीचे दुष्परिणाम यात त्यांनी परिणामकारकपणे मांडले. लोकव्यवहारातील भाषा, रेखीव स्वभावचित्रण, विनोद आणि उपरोध इ. कारणांनी आजही या नाटकाची लोकप्रियता टिकून आहे. या नाटकाचे कन्नड आणि इंग्रजी अनुवादही झाले आहेत. समाजसुधारणेसाठी साहित्याचा त्यांनी प्रभावीपणे उपयोग करून घेतला.

त्यांनी समीक्षा वाङ्‌मयात मोलाची भर घालून समाजात साहित्याभिरुची निर्माण केली. ‘नन्नय ’, ‘काव्यातील शृंगाररस’, ‘कविता’, ‘वर्ड्‌स्वर्थ’ इ. त्यांच्या लेखांना शाश्वत मूल्य आहे. कोंडुभट्टीयम्  आणि बिल्हणीयम्  ही नाटके, कलिंगेतिहास  हा इतिहासग्रंथ, काही कादंबऱ्या, कथा, समीक्षापर लेख हे त्यांचे संकल्पित, पण अपुरे राहिलेले लिखाण आहे. त्यांची जन्मशताब्दी आंध्र प्रदेशात १९६२ मध्ये मोठ्या प्रमाणावर साजरी झाली. उदात्त मानवतावादाचा पुरस्कार त्यांनी प्रभावीपणे केला व साहित्यातील लोकभाषेच्या वापराची यशस्विता त्यांनी सिद्ध केली. समाजसुधारक म्हणून तसेच थोर साहित्यिक म्हणून त्यांचे स्थान विशेष महत्त्वपूर्ण आहे.

संदर्भ :

  • https://www.poemhunter.com/gurazada-apparao/biography/

Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.