पूर्वाषाढा नक्षत्र : पूर्वाषाढा हे नक्षत्रचक्रातील २० वे नक्षत्र आहे. आयनिकवृत्ताच्या अंशात्मक विभागणीनुसार धनु राशीत ‘मूळ’ नक्षत्र, पूर्वाषाढा आणि उत्तराषाढाचा काही भाग अशी नक्षत्रे भारतीय पंचांगानुसार मानली जातात. परंतु प्रत्यक्ष तारकासमूहाचे क्षेत्र पाहिले, तर मूळ नक्षत्र हे वृश्चिक राशीत येते आणि पूर्वाषाढा आणि उत्तराषाढा ही दोन ही नक्षत्रे पूर्णपणे धनु राशीत येतात. आकाशातल्या राशी जरी ३६० अंश ÷ १२ = ३० अंशाची एक राशी, अशा धरल्या जात असल्या, तरी प्रत्यक्षात ताऱ्यांच्या मांडणीनुसार त्यांची क्षेत्रे कमीअधिक आहेत. तसेच आकाशातले चंद्राचे एका तिथीतील प्रत्यक्ष चलनही कमीअधिक अंतराने होत असते. पण आपण सोयीसाठी आयनिकवृत्ताचे ३६०÷२७ = १३.३ असे वर्तुळाचे समान भाग गृहीत धरल्याने कोणत्या राशीत कोणते नक्षत्र मानायचे, यात हा फरक पडतो.

पूर्वाषाढा नक्षत्रात धनु राशीतील चार तारे येतात: कौस बोरिॲलिस (Kaus Borealis; Lambda sagittarii), कौस मेरिडिओनॅलिस किंवा कौस मेडिआ (Kaus Meridionalis; Delta sagittarii), कौस ऑस्ट्रॅलिस (Kaus Australis; Epsilon sagittari) आणि अल्नसल किंवा नषबा (Alnasl or Nushaba; Gamma Sagittarii).

यातील कौस मेरिडिओनॅलिस हा डेल्टा तारा पूर्वाषाढाचा योग तारा मानला जातो. अनेक ताऱ्यांचा मिळून हा तारा बनला आहे. हा सूर्यापेक्षा १,१८० पट जास्त तेजस्वी असून याचे वस्तुमान सूर्याच्या ५ पट जास्त आहे आणि त्रिज्या ६२ पटींनी मोठी आहे. हा तारा धनु राशीत दिसणाऱ्या धनुष्याच्या ३ ताऱ्यांपैकी मधला तारा आहे. त्याची दृश्यप्रत २.७२ आहे.  हा तारा वर्णपटीय वर्गीकरणाच्या K3III या गटात मोडतो. त्याचे आपल्यापासूनचे अंतर ३०६ प्रकाशवर्षे आहे.

कौस बोरिॲलिस हा नारिंगी रंगाचा राक्षसी तारा असून K1+ III b या वर्णपटीय गटात मोडतो. हा पृथ्वीपासून ७७.३ प्रकाशवर्षे दूर असून २.८२ दृश्यप्रतीचा तारा आहे. हा तारा सूर्यापेक्षा ५२ पट जास्त तेजस्वी आहे. या ताऱ्याच्या पारंपरिक नावाचा, कौसचा अर्थ धनुष्य आणि बोरीआलीसचा अर्थ उत्तरेकडील भाग असा आहे.

कौस ऑस्ट्रॅलिस हा तारा द्वैती असून आपल्यापासून १४३ प्रकाशवर्षे दूर आहे. निळ्या रंगाचा B वर्णपटीय गटाचा हा तारा असून त्याची दृश्यप्रत १.७९ आहे. धनु तारकासमूहातला हा सगळ्यात तेजस्वी तारा आहे. कौस म्हणजे अरेबिक भाषेमध्ये धनुष्य आणि ऑस्ट्रॅलिस म्हणजे लॅटिन भाषेमध्ये दक्षिणेकडचा असा अर्थ होतो. तर कौस मेडिआ म्हणजे धनुष्यातील मधला तारा. अर्थात लॅमडा, डेल्टा आणि इप्सिलॉन हे तीन तारे मिळून या तारकासमूहातील धनुष्य बनते. तर अल्नॅसल तारा हे त्याला लावलेल्या बाणाचे टोक मानतात.

अल्नॅसल हा एक राक्षसी तारा असून K0III प्रकारच्या वर्णपटीय गटात मोडतो. पृथ्वीपासून तो ९६.१ प्रकाशवर्षे दूर असून तो २.९८ दृश्यप्रतीचा तारा आहे. याला गॅमा-२ असे ओळखले जाते. अल्नॅसल हा द्वैती असून गॅमा-१ आणि गॅमा-२ मिळून हा तारा आपल्याला दिसतो. यातला गॅमा-१ हा रूपविकारी असून तिथेही 1Aa, 1Ab आणि 1B अशा तीन ताऱ्यांनी तो बनलेला आहे असे आता माहीत झाले आहे. यातल्या गॅमा-१ ताऱ्याला ‘W Sagittarii’ असेही ओळखतात. याच्या अल्नॅसल किंवा नषबा या अरबी नावांचा अर्थ ‘बाणाचे टोक’ असाच होतो.

धनु राशी ओळखताना तिच्यातील ताऱ्यांची रचना चहाच्या किटलीच्या आकाराची करतात. या किटलीच्या झाकणाचे वरचे टोक ते चहा ओतण्याची तोटी हा भाग या नक्षत्राला ओळखण्यासाठी सोपा पडतो. किटलीचे झाकण आणि तोटी जोडणारा कौस मेडिआ तारा हाच या नक्षत्राचा योग तारा आहे, हे लक्षात ठेवणेही मग सोपे जाते.

पूर्वाषाढा आणि उत्तराषाढा या दोन नक्षत्रांच्या दरम्यान पौर्णिमेचा चंद्र जेव्हा असतो, त्या भारतीय महिन्याला आषाढ महिना असे नाव आहे. सर्वच नक्षत्रांची नावे त्या महिन्यातील पौर्णिमेचा चंद्र ज्या नक्षत्रात आहे त्यांच्या नावावरून दिलेली असतात.

धनु राशीतील पूर्वाषाढा नक्षत्राचा भाग आकाशगंगेच्या पट्ट्याच्या अगदी ऐन मध्यात येतो. त्यामुळे तिथे ताऱ्यांची भरपूर दाटी दिसते. अनेक तारकांनी समृद्ध असा हा भाग असल्याने आकाशाच्या या भागाला ‘सुवर्णांकित मार्ग’ (The Golden Path) असे म्हणतात.

समीक्षक : आनंद घैसास