दि ओव्हरस्टोरी : रिचर्ड पॉवर्स यांची पुलित्झर प्राईज मिळालेली प्रसिद्ध कादंबरी. रिचर्ड पॉवर्स अमेरिकेतील एक प्रसिद्ध कादंबरीकार आहेत. त्यांच्या कादंबऱ्या विज्ञान व तंत्रज्ञानाचा मानवी जीवनावर होणारा परिणाम स्पष्ट करतात. दि इको मेकर या कादंबरीसाठी त्यांनी २००६ यावर्षी राष्ट्रीय पारितोषिक मिळवले. त्यानंतर त्यांनी लेनन आणि स्मिथ यांच्या नावावर दिले जाणारे पारितोषिक सुद्धा पटकावले. २०१४ या वर्षी त्यांना मॅन बुकर प्राईझने सुद्धा सन्मानित करण्यात आले. या सर्व पुरस्कारांचा कळस म्हणजे त्यांच्या दि ओव्हरस्टोरी या कादंबरीसाठी त्यांनी २०१९ या वर्षाचे मानाचे समजले जाणारे पुलित्झर प्राईज पटकावले. १९८० नंतर पुलित्झर पुरस्कार हे काल्पनिक कादंबरी, नाटक आणि संगीतासाठी अमेरिकेतर्फे दरवर्षी ३ साहित्यिकांना दिले जातात. २०१८ या वर्षापर्यंत पॉवर्स यांच्या एकूण १२ कादंबऱ्या प्रकाशित झालेल्या आहेत.
दि ओव्हरस्टोरी ही २०१८ या वर्षी प्रकाशित झालेली रिचर्ड पॉवर्स यांची बारावी कादंबरी आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगात आधुनिक मानव स्वतःच्या स्वार्थासाठी नैसर्गिक संसाधनांची लयलूट करताना दिसत आहे. संपूर्ण जगभरात काँक्रीटचे जंगल वाढत जात असताना नैसर्गिक जंगल आपोआप कमी होत आहे. या कादंबरीच्या माध्यमातून वृक्षारोपणाचा आणि पर्यावरणाच्या जतन-संवर्धनासाठी लेखक अत्यंत गंभीर संदेश देतात. या कादंबरीत एकूण नऊ पात्रे आहेत. वेगाने नष्ट होत जाणाऱ्या जंगलांच्या विरोधात अमेरिकेतील नऊ माणसं एकत्र येवून संघर्ष करतात. निकोलस होएल, मिमी मा, अडम, रे ब्रिंकमन, डोरोथी, डग्लस, नीलएइ मेहता, पेट्रीसिया वेस्टरफोर्ड आणि ओलीविया हे ९ अमेरिकन पात्रे पर्यावरणीय जाणिवेतून एका सूत्रबद्ध शृंखलेत बांधली जातात. निकोलस हे आयरिश मूळ असलेले नॉर्वेचे एक कलाकार आहेत. मिमी ही वेस्टन मा यांची मोठी मुलगी आहे. अगोदर कीटकशास्त्रमध्ये रुची असणारा अडम नंतर मात्र मानसशास्त्रामध्ये रममाण होऊ लागतो. रे ब्रिंकमन हे डोरोथीचे पती असून ते पेशाने वकील आहेत. नंतर मात्र ते निसर्गामध्ये रममाण होऊ लागतात. पेशाने स्टेनोग्राफर असलेली डोरोथी नंतरच्या आयुष्यात मात्र निसर्गाच्या सान्निध्यात अलौकिक सुखाचा अनुभव घेते. डग्लसचे विमान कोसळले असताना निव्वळ एका झाडामुळे त्याचा जीव वाचतो. त्यामुळे तो नंतरचे आयुष्य पर्यावरणासाठी खर्च करतो. नीलएइ मेहता हा एक कंप्यूटर प्रोग्रामर असतो. व्हिडीओ गेम्सच्या माध्यमातून, झाडांची वारेमाप होणारी कत्तल, निर्वनीकरण आणि पर्यावरणाचे ढासळलेले संतुलन या ज्वलंत समस्यांवर तो प्रकाश टाकतो. त्याचे व्हिडिओ गेम्स इतके प्रसिद्ध होतात की तो नंतर व्हिडिओ गेम्सची एक कंपनी टाकतो.
पेट्रीसिया वेस्टरफोर्ड हिला झाडे माणसांप्रमाणे एकमेकांशी संपर्क करू शकतात, हा अचानक शोध लागतो. पेट्रीसिया संशोधनाद्वारे झाडे ही स्वतंत्र गोष्ट नसून अविभाज्य सामाजिक घटक आहे, हे प्रयोगाअंती सिद्ध करण्याचा प्रयत्न करते. सुरुवातीला तिच्या संशोधनाची हेटाळणी केली जाते पण नंतर मात्र तिच्या संशोधनाला जगभर मान्यता मिळते. तिच्या संशोधनाच्या अनुभवातून ती झाडांवर एक पुस्तकच लिहून काढते. मुक्त आयुष्य जगणारी ओलिविया मात्र नंतरच्या आयुष्यात निर्वनीकरणाच्या मोहिमेत सामील होऊन आपल्या जीवनाचा अर्थ शोधते. रिचर्ड पॉवर्स यांनी वर्णन केलेले हे सर्व नऊ पात्र पर्यावरणवादी आहेत.
अमेरिकेत होणारी झाडांची बेसुमार कत्तल पाहून हे सर्व पात्र व्यथित होतात आणि वृक्षतोडीच्या विरोधात अत्यंत खंबीरपणे उभे राहतात. मोठमोठ्या संमेलन आणि चर्चासत्रांतून झाडांच्या जतन संवर्धनाच्या फक्त पोकळ गप्पाच मारल्या जातात; प्रत्यक्षात मात्र काहीही केले जात नाही, हा वास्तववादी अनुभव या नऊ पात्रांना सुद्धा या कादंबरीत येतो. पर्यावरण वाचवण्यासाठीच्या मोहिमेमध्ये सक्रिय सहभाग घेत असताना बऱ्याच वेळा त्यांना पोलिसांकडून सुद्धा त्रास सहन करावा लागतो. वृक्षारोपणाच्या माध्यमातून धरणीमातेला पुन्हा एकदा हिरवेगार करण्याच्या प्रयत्नात सगळेजण पछाडलेले असतात. प्रस्तुत कादंबरीमध्ये नऊ पात्रांच्या माध्यमातून कादंबरीकाराने प्रतिकात्मक संदेश देत पृथ्वीचा विनाश थांबवण्याच्या दृष्टिकोनातून वृक्षारोपणासाठी संपूर्ण मानवी समाजाने एकत्र येत झपाटून काम केले पाहिजे, हा अत्यंत गंभीर संदेश दिलेला आहे.
संदर्भ :
- Powers, Richard, The Overstory, W. W. Norton & Company, 2018.