नत्थू खाँ : (१८७५ – १९४०). हिंदुस्थानी संगीतातील दिल्ली घराण्याचे ख्यातकीर्त तबलावादक. त्यांच्या जन्म मृत्यूच्या निश्चित तारखा ज्ञात नाहीत. त्यांचा जन्म दिल्ली येथे झाला. दिल्ली घराण्याचे प्रख्यात तबलावादक उस्ताद बोलीबक्ष खाँ हे त्यांचे वडील आणि सुप्रसिद्ध तबलावादक काले खाँ हे त्यांचे आजोबा. नत्थू खाँ यांचे तबलावादनाचे बहुतांशी शिक्षण वडिलांकडेच झाले. खूप मेहनतीने त्यांनी केलेल्या रियाझामुळे त्यांचे दिल्ली घराण्याच्या अवघड कायद्यांवर प्रभुत्व प्राप्त झाले होते. ‘धातीट धातीट धाधा तीट धागे तिनाकिन’ हा दिल्लीचा सुप्रसिद्ध कायदा त्यांच्या विशेष आवडीचा होता. त्याचे विविध प्रकारांत खूप सौंदर्यपूर्ण व अभ्यासपूर्ण बल ते करीत असत. कोणताही कायदा त्याच्या ठराविक लयीतच वाजला पाहिजे. कमी-अधिक लयीत वाजल्यास त्यातील सौंदर्यस्थळे नाहीशी होतात असे त्यांचे मत होते. पेशकार कायदा व रेला (अतिशय द्रुत लयीत वाजविला जाणारा आणि प्रत्येक बोलीची अखेर आणि प्रारंभ एकमेकांत गुंफले गेल्यामुळे विशिष्ट नाद निर्माण करणारा तबलावादनातील एक प्रकार) यांच्या विस्ताराबाबत त्यांची ख्याती होती. काही विशिष्ट कायदे ते अत्यंत वरच्या लयीत वाजवीत. उदा., ते वाजवीत असलेली दोन बोटांच्या धिरधिर कायद्याची त्यांची अत्यंत वरची लय. तिचा प्रभाव उस्ताद अमीर हुसेनखाँ यांच्यावरही होता. उस्ताद अहमदजान थिरकवा व उस्ताद हबीबुद्दीन खाँ आणि उस्ताद अमीर हुसेनखाँ यांच्यावरही त्यांच्या तबलावादनाचा प्रभाव होता.

नथ्यूखाँ विशेषतः मध्य लयीमध्ये तबलावादन करीत. दायाँ-बायाँचे संतुलन, त्यावरील प्रयत्न, निकास (निकाल) आणि विस्तारप्रक्रिया ही त्यांच्या तबलावादनाची प्रमुख वैशिष्ट्ये होती. त्यामुळे त्यांचे तबलावादन खूप आकर्षक होत असे. नथ्यूखाँ यांच्या तबलावादनाच्या दोन ध्वनिमुद्रिका निघाल्या असून, त्या आता दुर्मीळ आहेत.

समीक्षक : मनीषा पोळ