डाल्टन, ह्यू (Dalton, Hugh) : (१६ ऑगस्ट १८८७ – १३ फेब्रुवारी १९६२). विसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या दशकांमध्ये अर्थशास्त्र आणि राजकीय धोरण यांवर आपला प्रभाव पाडणारे प्रसिद्ध ब्रिटिश अर्थतज्ज्ञ व मुत्सद्दी. त्यांचे पूर्ण नाव एडवर्ड ह्यू जॉन नील डाल्टन होते. त्यांचा जन्म नीथ (वेल्स) येथे झाला. त्यांचे सुरुवातीचे शिक्षण समर फिल्ड्स स्कूल आणि एटन कॉलेज येथे झाले. त्यानंतरचे शिक्षण किंग्ज कॉलेज, केंब्रिज व लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्स येथे झाले. त्यांनी लंडन विद्यापीठातून अर्थशास्त्र या विषयातली डी. एससी. ही सर्वोच्च पदवी मिळविली. त्यांचे विशेषीकरण ‘सार्वजनिक वित्तव्यवहार’ या शाखेमध्ये होते.

डाल्टन यांनी सप्टेंबर १९२० मध्ये इकॉनॉमिक जर्नल या अंकात अर्थशास्त्रातला ‘प्रिन्सिपल ऑफ पब्लिक फायनन्स’ हा शोध निबंध सर्वप्रथम लिहिला. तेव्हापासून त्यांच्या अर्थशास्त्रातील लेखनाला सुरुवात झाली. आर्थिक विषमतेवर मॅक्स लॉरेन्झ यांनी इ. स. १९०५ मध्ये प्रथम एक विवेचन करून सोबत एक आलेखही प्रसिद्ध केला. तो लॉरेन्झ वक्र या नावाने प्रसिद्ध आहे. याच विषयावर अधिक संशोधन करून त्या संकल्पनेची सैद्धांतिक पार्श्वभूमी डाल्टन यांनी आपल्या शोधनिबंधात विशद केली. उत्पन्नाच्या पुनर्वाटपासंबंधी विवेचन करताना त्यांनी प्रसिद्ध ब्रिटिश अर्थतज्ज्ञ आर्थर सेसिल पिगू यांचा सिद्धांत अधिक स्पष्ट केला. अर्थशास्त्रात ते ‘पिगू-डाल्टन तत्त्व’ म्हणून प्रसिद्ध आहे. व्यक्तिचे उत्पन्न आणि आर्थिक कल्याण यांच्यातील परस्पर संबंधांवरही डाल्टन यांनी विपुल लेखन केले आहे. पैशातील उत्पन्न वाढल्यास कल्याणात वाढ होतेच असे नाही. जर उत्पन्न वाटप समान झाले, तर मात्र ते वाढू शकते असे त्यांनी प्रतिपादन केले. ‘केंब्रिज इकॉनॉमिक हँडबुक’ या मालिकेमध्ये त्यांनी सार्वजनिक वित्तशास्त्र हे पुस्तक लिहिले. या पुस्तकात सार्वजनिक वित्त व्यवहारांची मूलतत्त्वे, सार्वजनिक कर्जे, कर बसविण्यामागील सिद्धांत, त्यासंबंधीचे धोरण, सार्वजनिक खर्च इत्यादी मुद्द्यांची चर्चा आहे.

डाल्टन यांचा राजकीय क्षेत्रातला प्रवास लक्षणीय, पण काहीसा वादग्रस्त ठरला. ते व त्यांच्या पत्नी रूथ डाल्टन हे दोघेही ब्रिटिश संसदेमध्ये खासदार होते. इंग्लंडमधील मजूर पक्षातील ते पुढारी मानले जात. मजूर पक्षाच्या आर्थिक व विशेष करून परराष्ट्र धोरणाच्या मांडणीमध्ये त्यांची प्रमुख भूमिका होती. त्यांनी नेविल चेंबरलिन यांच्या मवाळ धोरणांना जाहीर विरोध केला. डाल्टन हे पहिल्या महायुद्धात सहभागी होऊन त्यांनी फ्रेंच आणि इटालियन आघाडीवर लेफ्टनंट म्हणून कर्तव्य बजाविले. त्यानी या युद्धाच्या आठवणी आपल्या विथ ब्रिटिश गन्स इन इटली या पुस्तकात लिहिल्या. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात ब्रिटिनचे पंतप्रधान सर विन्स्टन चर्चिल यांच्या सर्वपक्षीय मंत्रिमंडळात ते आर्थिक व्यवहार खात्याचे मंत्री होते (१९४० – १९४२). युद्धानंतर ब्रिटिनचे पंतप्रधान क्लेमंट रिचर्ड ॲटली यांच्या मंत्रिमंडळातही ते ब्रिटनचे अर्थमंत्री होते (१९४५ – १९४७). देशातील उद्योगधंद्यांचे राष्ट्रीयीकरण, आरोग्य सेवा, शिक्षण, अन्नधान्यावरील अनुदान इत्यादी कल्याणकारी योजनांचा त्यांनी पाठपुरावा केला. सोव्हिएट रशियाच्या आर्थिक नियोजन कार्यक्रमासारखा कार्यक्रम इंग्लंडमध्ये राबविण्यात यावा, असे त्यांचे मत होते. उत्पन्नाच्या समन्यायी वाटपासाठी श्रीमंतांवर कर लावावेत या भूमिकेचा त्यांनी आग्रह धरला होता. इ. स. १९४७ मधील वार्षिक अंदाजपत्रक संसदेस मांडणे सुरू असतानाच अंदाजपत्रकाचा तपशील वृत्तपत्रांच्या आवृत्त्यांमध्ये प्रसिद्ध झाला. त्यामुळे अंदाजपत्रक फुटले, करप्रस्तावांचे काही गोपनीय तपशील एका पत्रकाराला सांगितल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आला. या प्रकरणामुळे त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. नंतर त्यांना चौकशी समितीने निर्दोष ठरविले. त्यानंतर ते पुन्हा मंत्री झाले (१९४८ – १९५१).

डाल्टन यांनी पुढील ग्रंथांचे लेखन केले : विथ ब्रिटिश गन्स इन इटली (१९१९), सम ॲस्पेक्ट्स ऑफ द इनइक्वॅलिटी ऑफ इन्कम्स इन मॉडर्न कम्युनिटिज (१९२०), प्रिन्सिपल ऑफ पब्लिक फायनान्स (१९२२), द कॅपिटल लेव्ही एक्सप्लेंड (१९२३), टुवर्ड्स द पिस ऑफ नेशन्स (१९२८), सोशलिजम अँड द कंडिशन ऑफ द पिपल (१९३३), फॉर सोशलिजम अँड पिस (१९३४), प्रॅक्टिकल सोशलिजम फॉर ब्रिटन (१९३५), कॉल बॅक यस्टरडे (१९५३), द फेटफुल इयर्स (१९५७), हाय टाईड अँड आफ्टर (१९६२) इत्यादी.

डाल्टन यांचे लंडन येथे निधन झाले.

समीक्षक : अवधूत नाडकर्णी