प्रसिद्ध अमेरिकन अर्थतज्ज्ञ मॅक्स ओ. लॉरेन्झ यांनी १९०५ मध्ये उत्पन्न अथवा संपत्ती यामधील असमान वितरण दर्शविण्यासाठी ज्या आकृतिबंधाची मांडणी केली, त्यास ‘लॉरेन्झ वक्र’ म्हणतात. लॉरेन्झ वक्रामधील फलन सामान्यपणे आकृतिबंधातील आडव्या अक्षांशावर (रेषेवर) F या रोमन अक्षराने दर्शविला जातो. हा F म्हणजे लोकसंख्येचा संचित भाग. त्याचप्रमाणे L म्हणजे संपत्ती अथवा उत्पन्न याचा संचित भाग, जो उभ्या अक्षांशावर दर्शविण्यात येतो. हा वक्र नेहमी ०-० ने सुरू होतो व १-१ ने संपतो.

लॉरेन्झ वक्र नेहमी आर्थिक विषमता दर्शविण्यासाठी वापरला जातो. कोणत्याही व्यवस्थेतील विषमता दर्शविण्यासाठी त्याचा उपयोग करता येऊ शकतो. या वक्रामधील सरळरेषा व वक्ररेषा यांमधील अंतर संपत्तीमधील असमान वितरण दर्शविते. यामध्ये ० पासून कुठेही गिनी गुणक असू शकतो, जो पूर्णत: समानता दर्शवितो, तर १ गिनी गुणक पूर्णत: विषमता दर्शवितो. राष्ट्रातील कोणत्या वर्गातील नागरिकांनी एकूण किती राष्ट्रीय संपत्ती धारण केली, याचे प्रमाण दर्शविण्यासाठी लॉरेन्झ वक्राचा उपयोग करता येऊ शकतो. उदा., देशातील १०% टक्के श्रीमंत नागरिक ९०% संपत्ती धारण करतात अथवा ९०% गरीब नागरिक १०% संपत्ती धारण करतात. संपत्ती अथवा उत्पन्नविभागणीतील ही विषमता संसाधनांची असमतोल विभागणी, कौशल्य व शिक्षण यांमध्ये असणारी असमानता, विकासाच्या संधींची असमान उपलब्धता, देशाचे आर्थिक धोरण इत्यादी कारणांमुळे असू शकते. ‘जागतिक आर्थिक संशोधन व विकास संस्थे’ने (वर्ल्ड इन्स्टिट्यूट फॉर डेव्हलपमेंट अँड इकॉनॉमिक रिसर्च) केलेल्या सर्वेक्षणानुसार २००० साली असे निदर्शनास आले होते की, जगातील १% लोकसंख्येकडे ४०% मालमत्ता आहे आणि १०% लोकसंख्येकडे फक्त ५% मालमत्ता आहे.

वरील लॉरेन्झ वक्र आकृतीवरून निदर्शनास येते की, ‘क्ष’ अक्षाच्या सुरुवातीस अत्यंत कमी प्रमाणात उत्पन्नाची विभागणी झालेली लोकसंख्या आहे, तर वक्रामधील ‘क्ष’ याच अक्षाच्या शेवटी जगातील संपत्तीचा सर्वाधिक वाटा असलेली लोकसंख्या आहे.

 

       समीक्षक : निर्मल भालेराव