भारतातील एक अनुसूचित जमात. ही जमात मध्य प्रदेश राज्यातील छिंदवाडा, सिवनी, मंडला आणि सरगुजा या जिल्ह्यांमध्ये वनांत व खोल दऱ्यांमध्ये वास्तव्यास आहे. भारिया जमात ही गोंड जमातीची एक शाखा असून भूमिया, पलिहा, पांडो, भुईधर इत्यादी नावांनीही हा समाज ओळखला जातो. भारिया लोक गोंड जमातीच्या लोकांना आपले वडील बंधू मानतात. ही जमात मध्य प्रदेश राज्याव्यतिरिक्त छत्तीसगढ, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल या राज्यांतही विखुरलेली आहे. यांची लोकसंख्या सुमारे २०,८९० (२०२० अंदाजे) इतकी आहे.

पांडवांपैकी अर्जुनाने भारू नावाच्या गवतापासून काही माणसांची उत्पत्ती केली. हीच माणसे भारिया या जमातीचे पूर्वज आहेत, असे काही भारिया मानतात; तर कर्णदेव हा आपला पूर्वज आहे, असेही काहीजण मानतात. ही जमात भार उचलण्याचे काम करत, म्हणून त्यांना भारिया असे म्हणतता, असेही काही तज्ज्ञांचे मत आहे. हे लोक रंगाने काळे-सावळे, मध्यम उंचीचे, सडपातळ बांधा, छोटे डोळे, मोठे व पसरट नाकाचे, जाड ओठ आणि छोट्या दातांची ठेवण असलेले आहेत. भारिया पुरुष धोतर, कुर्ता-बंडी घालतात व डोक्यावर पगडी बांधतात, तर स्त्रीया लुगडे व चोळी घालतात. हे लोक ज्या ठिकाणी राहतात, त्यास ढाना असे म्हणतात. एका ढान्यात दोन ते पंचेविस घरांची वस्ती असते. त्यांची घरे लाकूड-बांबू, माती व गवतापासून बनलेली असतात. भारिया लोकांची भरनौती ही मूळ बोली असून ती द्रविडीयन प्रकारची आहे; मात्र ते परस्परांशी हिंदी भाषेत बोलतात. स्त्री व पुरुष यांना समाजात समान हक्क आहे.

भारिया जमातीमध्ये भारडिया, बिजारिया, अमोलिया, बगोथिया, पचालिया, ठाकरिया, मेहानिया, अंगारिया, नहाल, चालथिया, राऊतिया आणि गडारिया ही कुळे समावेश आहेत. स्वतःची जमीन नसल्यामुळे हे लोक इतरांच्या शेतावर जाऊन रोजंदारीवर मजुरी करतात. लाकडे गोळा करणे व ती विकणे, बांबुच्या टोपल्या बनविणे, लाकडांपासून कलात्मक वस्तू बनविणे इत्यादी कामेही ते करतात. तसेच दऱ्याखोऱ्यांत त्यांचे वास्तव्य असल्यामुळे त्यांना अनेक औषधी वनस्पतींची चांगली माहिती आहे. भारिया लोक मांसाहारी आहेत. मोह व आंब्याच्या बीयांच्या पीठापासून बनविलेली भाकरी, तसेच गहू व मका हे त्यांचे मुख्य अन्न आहे.

भारिया लोक गोत्र प्रणाली मानतात. त्यामुळे त्यांच्यात केवळ दोन वेगवेगळी गोत्र असणाऱ्यांमध्येच लग्न होतात. त्यांच्यात मॅगनी विवाह, लमसेना, विधवा विवाह व राजी बाजी ही लग्नाची चार प्रकार आहेत. मामा व आत्या यांच्या मुला-मुलींमध्ये लग्न होतात. लग्नात बांगड्या भरण्याच्या कार्यक्रमाला ते जास्त महत्त्व देतात. लग्न लावणाऱ्याला फालडन म्हणतात.

भारिया जमातीत बाळाच्या जन्मानंतर चौदाव्या दिवशी बाळाच्या आईवर पवित्रतेचा संस्कार करतात. होळी, दिवाळी, बिदरी पूजा, भुजालिया, आखाती, शिवरात्री, नवाखानी, जावरा, राखी हे त्यांचे मुख्य सण आहेत. सण समारंभात ते सेतम, सैला, भेतम, करमा ही नृत्ये करतात. बैगा, गौड, वाघ, साप यांना ते देव मानतात व त्यांची पूजा करतात. त्यांच्यात मृत्यूनंतर दहन करण्याची प्रथा आहे. या लोकांचा जादूटोणा, भूतखेत यांवर विश्वास आहे. हे लोक मुखियाला पटेल, तर इतर सदस्यांना भुमला, कोटयार व पडिहार असे म्हणतात.

आज भारिया लोक इतर समाजाच्या संपर्कात येत असून त्यांच्यात अनेक प्रकारचे बदल होताना दिसत आहे.

समीक्षक : प्रमोद जोगळेकर


Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.