निकोबार बेटावरील एक आदिवासी समूह. बंगालच्या उपसागराच्या दक्षिणपूर्व भागात सलग १९ भूभाग असून त्यांपैकी १२ भूभागांवर मानवी वस्ती आहे. त्यात सगळ्यांत मोठा निकोबार भूभाग असून तेथे निकोबारी समूह वास्तव्यास आहेत. ते तेथे स्वतःला ‘होलचू’ (मित्र) या नावाने संबोधतात. निकोबारी समूहाची लोकसंख्या २०११ च्या जनगणनेनुसार २७,१६८ इतकी होती.

या भूभागावरील निकोबारीज हे पहिले मानव नसून शाँपेन ही जमात त्यांच्या आधीपासून या भूभागावर वास्तव्यास असल्याचे आढळून येते. निकोबारी लोक मूळ मंगोलॉईड वंशाचे असून उंचीने बुटके, डोके मोठे, नाक मध्यम, चेहरा मध्यम, वर्ण सावळा अशा बांध्याचे आहेत. यांची कुळी टूहेत, किनेम किंवा मिरोत्तो या मध्य आणि दक्षिण बेटांऐवजी वेगवेगळ्या भूभागांवर विखुरलेली आहेत. शाँपेन या समूहांबरोबर निकोबारीज लोक राहतात. या बेटावर सोळाव्या शतकापर्यंत विविध आशियाई साम्राज्यांच्या राजवटी होत्या. नंतर डेन्मार्क, ब्रिटन या लोकांच्या वसाहती होत्या. स्वातंत्र्यापासून हा भाग भारत सरकारच्या व्यवस्थेचा एक भाग आहे.

निकोबारी समूहांच्या मुख्य पदी ‘राणी’ असते. समूहांच्या पहिल्या राणीचे लग्न हे मेवालाल नावाच्या तहसीलदाराशी झाले होते. सर्व निकोबारी भूभागांची एक संघटना असते. त्यांची भाषा ऑस्ट्रो आशियाई भाषासमूहातील असून वेगवेगळ्या बेटांवर समूहांनुसार वेगवेगळ्या बोलीभाषा बोलल्या जातात; परंतु बहुसंख्य लोक हे कार निकोबारीज भाषा बोलतात. निकोबारीज आणि शाँपेन यांच्या भाषेत बरेचसे साम्य आहे.

बागकाम करणे हा निकोबारीज समूहांचा मुख्य पारंपरिक व्यवसाय आहे; परंतु आता नारळ, केळी, आंबा यांसारख्या फळांच्या विक्रीचा व्यवसायही ते करतात. स्त्रियांचा आपल्या

निकोबारी लोकांचे पारंपरिक घर

कौटुंबिक कामांबरोबरच पुरुषांबरोबर इतरही कामांत समान सहभाग असतो. पूर्वीचा निकोबारी समूह हा अशिक्षित होता; परंतु शासनाने पुरविलेल्या शैक्षणिक सुविधांमुळे आताचा निकोबारी समूह हा शिक्षण घेऊन सरकारी वैद्यक, शिक्षक, पोलीस, कारकून इत्यादी शासकीय सेवेत रुजू होत असल्याचे दिसून येते. निकोबारी स्त्रियांचा आर्थिक, सामाजिक, कौटुंबिक स्तरांवर समान सहभाग असतो.

निकोबारी समूहांचे मुख्य अन्न स्थानिक भाज्या, फळे आणि भात हे आहे. तसेच ते मांसाहारी असून मासे, डुकराचे मांस इत्यादी खातात. या समूहांची घरे झोपड्यांसारखी बांबूच्या ताट्या आणि मातीपासून बनविलेली असतात. घराचे छत हे डोम आकाराचे आणि गोलाकार असते. झोपडी ही बांबूच्या आधारावर बांधलेली असते, तर ती जमिनीलगत नसून जमिनीपासून थोडी उंचावर बांधलेली असते. गोलाकार छताच्या वरच्या बाजूस थोडी पठारी जागा असते. तेथे हे लोक रात्री चढून बसतात. अशा प्रकारची त्यांची पारंपरिक घरे असली, तरी काही निकोबारी पक्क्या आधुनिक घरांमध्ये वास्तव्यास आहेत.

निकोबारी समूहांत विवाहित पुरुषांची संख्या ही विवाहित स्त्रियांपेक्षा जास्त आहे. या समूहांत विधवा आणि घटस्फोटीत यांची

निकोबारी लोकांचा एक पारंपरिक नृत्य प्रकार

संख्या फारशी दिसून येत नाही. वेगवेगळ्या बेटांवरील मुलामुलींचे विवाह या निकोबारीज समूहांत प्रचलित आहेत. आता निकोबारी समूह लग्नाच्या समारंभातही पुढारलेला दिसतो. इतर समाजांशी येत असलेल्या संबंधांमुळे आणि नवीन येणाऱ्या सुधारणा, विकास, सुविधा यांचा प्रभाव यांच्या विविध समारंभात दिसून येतो.

निकोबारी समूहांतील लोक हे प्रामुख्याने ख्रिश्चनधर्मीय आहेत. काही थोडे लोक हे मुस्लिम आहेत. असे असले, तरी ते आपल्या पारंपरिक आणि निसर्गवादी संस्कारांची आजही पूर्णपणे जपवणूक करतात. ते कोणताही विधी आपल्या परंपरेनुसारच करतात; मात्र काही लोक ख्रिश्चन धर्माप्रमाणे समारंभ साजरे करतात. त्यांचा भूत, आत्मा या काल्पनिक गोष्टींवर खूप विश्वास आहे. त्यांच्या सभोवती भूतांचा सहवास असून कोणत्याही अशुभ गोष्टींसाठी ही भुते आणि आत्मे जबाबदार असतात, असा त्यांचा समज आहे. कोणत्याही अनपेक्षित घटनांना आत्मा जबाबदार असतो, असे मानून त्यांना दूर करण्यासाठी ते मांत्रिकांना बोलावितात. मांत्रिक हा दुष्ट आत्म्यांपासून त्यांचे रक्षण करतो, असा त्यांचा विश्वास आहे. निकोबारी लोकांच्या सण-उत्सवांमध्ये नृत्य व गायन दिसून येत असून ते त्यांस आधुनिकतेची जोड देत आहेत.

निकोबारीज लोक आपापल्या वस्तीवर आपापल्या संस्कारानुसार मृत व्यक्तीचे दफन करतात.

संदर्भ : Singh, K. S., People Of India, Delhi, 1998.

समीक्षक : लता छत्रे