जगातील सर्वांत मोठे उष्ण कटिबंधीय वाळवंट. अरबी भाषेतील ‘सहारा’ म्हणजे ‘वाळवंट’ यावरून या प्रदेशाला हे नाव पडले आहे. भूमध्य समुद्राच्या किनाऱ्यावरील सुपीक प्रदेश, मगरबमधील अ‍ॅटलास पर्वत आणि ईजिप्त व सूदानमधील नाईल नदीचे खोरे वगळता उत्तर आफिकेचा विस्तृत प्रदेश या वाळवंटाने व्यापलेला आहे. पश्चिमेस अटलांटिक महासागरापासून पूर्वेस तांबड्या समुद्रापर्यंत, तसेच उत्तरेस ॲटलास पर्वत व भूमध्य समुद्रापासून दक्षिणेस साहेल या नावाने ओळखल्या जाणाऱ्या निमओसाड उष्णकटिबंधीय सॅव्हाना किंवा सूदान प्रदेशापर्यंत सहारा वाळवंटाचा विस्तार झालेला आहे. सहारा वाळवंटाचा पूर्व-पश्चिम विस्तार ५,६३० किमी., तर उत्तर-दक्षिण विस्तार १,९३० किमी.पेक्षा अधिक असून क्षेत्रफळ सुमारे ८६,००,००० चौ. किमी. आहे. काळानुरूप वाळवंटी क्षेत्रात वाढ किंवा घट होत असल्यामुळे प्रत्यक्ष क्षेत्रात तफावत आढळते. सांप्रत दक्षिणेस १५° ३’ उ. अक्षांशापर्यंत सहाराचा विस्तार असून तो दक्षिणेस हळूहळू वाढत असल्याचे आढळून आले आहे. मोरोक्को, अल्जीरिया, ट्युनिशिया, लिबिया, ईजिप्त, मॉरिटेनिया, माली, नायजर, चॅड व सूदान इत्यादी देशांत सहाराचा विस्तार झालेला आहे. पश्चिम सहारा, मध्यवर्ती भागातील अहॅग्गर पर्वतीय प्रदेश, तिबेस्ती पर्वतीय प्रदेश, एअर पर्वतीय प्रदेश, तेनेरे वाळवंट, लिबियन वाळवंट अशा वेगवेगळ्या विभागांत या प्रदेशाची विभागणी केली जाते. सहाराला वेगवेगळ्या भागांत वेगवेगळ्या नावांनी ओळखतात. नाईल नदी व तांबडा समुद्र यांदरम्यानचे पूर्व वाळवंट व न्यूबियन वाळवंट, ईजिप्त-लिबिया यांच्या सरहद्द प्रदेशांत लिबियन वाळवंट, नैर्ऋत्य अल्जिरियात टॅनझ्रॉफ्ट प्रदेश, तर मध्य नायजेरियात तेनेरे प्रदेश म्हणून ओळखले जाते.

सहारा वाळवंटासंदर्भात मराठी विश्वकोशात पुढील शीर्षकांनी स्वतंत्र नोंदी घेण्यात आल्या आहेत.
अ. क्र. नोंदींचे नाव
सहारा वाळवंटाचा इतिहास
सहारा वाळवंटातील आर्थिक स्थिती
सहारा वाळवंटाची भूरचना
सहारा वाळवंटाचे हवामान
सहारा वाळवंटातील लोक व समाजजीवन
सहारा वाळवंटातील वनस्पती व प्राणिजीवन

 

समीक्षक : संतोष ग्या. गेडाम