(प्रोसो मिलेट). एक तृणधान्य. वरी ही वनस्पती पोएसी (गवत) कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव पॅनिकम मिलिएशियम आहे. गहू, तांदूळ, नाचणी इत्यादी वनस्पतीही पोएसी कुलातीलच आहेत. जगातील उष्ण व उपोष्ण प्रदेशांतील देशांमध्ये वरीची लागवड केली जाते. सु. ७,००० वर्षांपूर्वीपासून चीन, भारत, नेपाळ, रशिया, युक्रेन, बेलारूस, टर्की, रूमानिया आणि मध्य-पूर्वेकडील देशांत ती लागवडीखाली असल्याचे आढळले आहे. तसेच कॉकेशिया पर्वतांच्या देशांमध्ये वरीची लागवड होत असल्याचे आढळले आहे. अमेरिकेत पक्ष्यांच्या खाद्यासाठी तिची लागवड केली जाते. भारतात तमिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा, महाराष्ट्र या राज्यांत मोठ्या प्रमाणात, तर बिहार, पंजाब, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश या राज्यांत वरीचे पीक घेतले जाते.
वरी ही वर्षायू वनस्पती सु. १ मी. उंच वाढते. पाने लांबट १५–३० सेंमी. लांब, तर ६–२० मिमी. रुंद असतात. खोडाच्या टोकावर स्तबक प्रकारचा फुलोरा येतो. फुलोरा सु. ४५ सेंमी. लांब असून कणिशके फांद्यांच्या टोकावर, ४-५ मिमी. लांब, हिरवी अथवा तपकिरी हिरव्या रंगाची, एकेकटी किंवा जोडीने येतात. फळांचे म्हणजेच दाण्यांचे टरफल (बाह्यावरण) तपकिरी हिरवे किंवा पिवळसर असते. दाण्यांवरची टरफले काढली की आत तांदळासारखे दाणे मिळतात. या दाण्यांना वरीचे तांदूळ किंवा भगर म्हणतात. ते दाणे शिजवून खातात.
वरी हे जलद वाढणारे पीक असून ते वेगवेगळ्या मातीत आणि हवामानात येते. याच्या पीकाला कोणत्याही तृणधान्यांपेक्षा पाणी कमी लागते. अनेक देशांमध्ये दोन पिकांच्या दरम्यान वरीचे पीक घेतात. १०० से. पेक्षा कमी तापमान वरीच्या उत्पादनाला प्रतिकूल असते.
वरीचे तांदूळ पचायला हलके असतात. १०० ग्रॅ. वरीच्या सेवनातून सु. १२% पाणी, सु. १२% प्रथिने, १.१% मेद, सु. ६९% कर्बोदके, २.२% तंतू व ३.४% क्षार मिळतात. कॅल्शियम, लोह (आयर्न), मॅग्नेशियम, फॉस्फरस इत्यादींचा वरीचे तांदूळ उत्तम स्रोत आहे. ते पौष्टिक असून त्याचा भात करतात, तर पिठाच्या भाकऱ्या करतात. वरी भाजून लाह्या तयार करतात. उपवासाच्या दिवशी वरीचा जास्त वापर करतात. पेंढा जनावरांना चारा म्हणून देतात. काही ठिकाणी वरीपासून मद्य बनवितात. वरी तसेच नाचणी, बाजरी इत्यादी धान्यांमध्ये ग्लुटेन नसते. त्यामुळे ज्या व्यक्तींना गव्हातील ग्लुटेनमुळे पचनाच्या समस्या असतात किंवा ग्लुटेनची असह्यता असते, अशा व्यक्तींच्या आहारात वरीचा (तसेच नाचणी, बाजरी यांचा) समावेश करतात.