(पीच/नेक्टरीन). चवदार फळांसाठी प्रसिद्ध असलेला रोझेसी कुलातील एक लहान वृक्ष. सप्ताळू हा पानझडी वृक्ष असून त्याचे शास्त्रीय नाव प्रूनस पर्सिका आहे. जरदाळू, बदाम, चेरी या वनस्पतीही रोझेसी कुलातील असून त्या सप्ताळूप्रमाणे प्रूनस प्रजातीतील आहेत. सप्ताळू हा वृक्ष मूळचा वायव्य चीनमधील असून भारत, इंग्लंड, अमेरिका, यूरोप, आफ्रिका व ऑस्ट्रेलिया येथे लागवडीखाली आहे. समशीतोष्ण व उष्ण प्रदेशात त्याची वाढ चांगली होते.
सप्ताळूचा वृक्ष ४–१० मी. उंच वाढतो. पाने साधी, २.५ सेंमी. पेक्षा लांब, एकाआड एक, भाल्यासारखी व साधारण दातेरी असून त्यांच्या देठांवर ग्रंथी असतात. मार्च-एप्रिल महिन्यात पाने येण्यापूर्वी या वनस्पतीला फुले येतात. फुले एकेकटी, लालसर, गुलाबी रंगाची असून फुलांचा बहर आल्यावर हे झाड आकर्षक दिसते. फुलांमध्ये पाकळ्या पाच असून पुंकेसर १५–३० असतात. फळे आठळीयुक्त, तपकिरी, गोलसर, टोकदार, खरबरीत, नरम व चिकूएवढी (५–७ सेंमी. व्यास) असतात. फळांतील मगज पिवळा किंवा पांढरा व सुवासिक असतो. आठळी कठीण व खाचदार असून तिच्यात एक मोठी, अंडाकार, लालसर रंगाची बी असते. फळांची साल मलमली असल्यास त्या फळांना ‘पीच’ म्हणतात, तर साल मऊ असल्यास फळांना नेक्टरीन म्हणतात. मगजानुसार सप्ताळूच्या फळांचे दोन गट केले आहेत; मगज आठळीस चिकटलेला असल्यास ‘क्लिंगस्टोन’, तर मगज आठळीपासून सुटा असल्यास ‘फ्रीस्टोन’ अशी नावे त्यांना दिली आहेत.
सप्ताळूची फळे दीपक, शामक व पित्तनाशक असतात. त्यांत साखर, अ आणि क जीवनसत्त्वे असतात. १०० ग्रॅ. पक्व फळांमध्ये ८३% पाणी, ९% कर्बोदके असून प्रथिने व मेद अत्यल्प प्रमाणात असतात. यांशिवाय पोटॅशियमयुक्त खनिजे अधिक प्रमाणात असतात. सप्ताळूंचे काही प्रकार मुखशुद्धीकरिता खातात; काहींचा रस पेय म्हणून घेतात. काही फळे उकडून खातात किंवा मुरंबा करतात. फळांपासून पीच ब्रँडी (मद्य) बनवितात. पाने, फुले व बियांतील मगज विषारी असतो. बियांमध्ये हायड्रोजन सायनाइड असते. बियांपासून काढलेले तेल स्वयंपाकात, दिव्यांत किंवा केसांना लावण्यास वापरतात. मुळांच्या सालीपासून रंग काढतात. लाकडाचा वापर बांधकामात करतात.
अनेक देशांत सप्ताळूची लागवड केली जाते. अमेरिकेत सफरचंदाखालोखाल त्याला महत्त्व आहे. याशिवाय यूरोपात इटली, फ्रान्स व स्पेन; आशियात चीन व जपान; दक्षिण अमेरिकेत अर्जेंटिना, तसेच ऑस्ट्रेलिया व दक्षिण आफ्रिका इ. देशांत सप्ताळूची लागवड होते. सप्ताळूच्या उत्पादनात चीन, स्पेन, इटली, अमेरिका, ग्रीस हे देश आघाडीवर आहेत. भारतात काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश, पंजाब, तसेच दक्षिणेकडील निलगिरीचा काही प्रदेश इ. ठिकाणी लागवड केली जाते. या ठिकाणी इतर देशांतून आणलेले सुधारित प्रकार आढळून येतात. भारतात लागवडीखाली असलेल्या सप्ताळूंच्या प्रकारांमध्ये अलेक्झांडर, पेरेग्राइन, अर्ली (रिव्हर्स) व्हाइट जायंट, ड्यूक ऑफ यॉर्क, बॅबॉक, एल्बर्टा, हनी, एल्टन इ. प्रकार महत्त्वाचे आहेत.