(टीक ट्री). प्राचीन काळापासून इमारतींसाठी व बांधकामासाठी लागणाऱ्या लाकडासाठी वापरला जाणारा एक महत्त्वाचा वृक्ष. साग हा पानझडी वृक्ष लॅमिएसी कुलातील असून त्याचे शास्त्रीय नाव टेक्टोना ग्रँडिस आहे. पुदिना, तुळस, मरवा इ. वनस्पतीही लॅमिएसी कुलातील आहेत. साग हा वृक्ष मूळचा दक्षिण-पूर्व आशियातील भारत, श्रीलंका, इंडोनेशिया, मलेशिया, थायलंड, म्यानमार आणि बांगला देश या देशांतील असावा. या वृक्षाची लागवड आफ्रिकेतील अनेक देशांमध्ये तसेच कॅरिबियन बेटांवर केली जाते. सामान्य इंग्लिश भाषेत त्याला बर्मा टीक, नागपूर टीक अशीही नावे आहेत. टेक्टोना प्रजातीत एकूण तीन जाती आहेत. त्यांपैकी टेक्टोना ग्रँडिस ही जाती आर्थिक दृष्ट्या सर्वांत महत्त्वाची असून बांगला देश, श्रीलंका, म्यानमार, थायलंड, चीन, भारत आणि पाकिस्तान या देशांत आढळते. दुसरी, टे. हॅमिल्टोनियाना ही जाती केवळ म्यानमारमध्ये आढळत असून आता तिचे अस्तित्व संकटात आहे आणि तिसरी टे. फिलिपीन्सिस ही जाती केवळ फिलिपीन्स येथे आढळत असून तिचेही अस्तित्व धोक्यात आलेले आहे. रेणवीय संशोधनातून हा वृक्ष मूळचा भारत व म्यानमार आणि लाओस येथील असल्याचे आढळून आले आहे. सामान्यपणे फांद्याविरहित उंच व सरळ खोड आणि त्यावर अर्धवर्तुळाकार पर्णसंभार अशी सागाची ओळख असते. जेथे पाऊस ५००–५,००० मिमी. पडतो, अशा प्रदेशात हा वृक्ष वाढतो. भारतात सर्वत्र (विशेषेकरून महानगरे वगळता) सागाची झाडे दिसून येतात.
भौगोलिक स्थान व परिस्थिती यांनुसार सागाचे आकार आणि आकारमान यांत विविधता आढळते. साग हा वृक्ष सु. ४० मी. उंच व सरळ वाढतो. फांद्यांचा रंग राखाडी ते राखाडी करडा असतो. जून झालेल्या सागाचे खोड काहीसे खोबणेदार दिसते आणि तळाशी काही आधारमुळे दिसतात. पाने साधी, समोरासमोर, रुंद लंबवर्तुळाकार किंवा व्यस्त अंडाकृती असून १४–४५ सेंमी. लांब आणि ८–२३ सेंमी. रुंद असून मजबूत व २–४ सेंमी. लांब देठाने जोडलेली असतात. पानांच्या कडा अखंड असतात; शेंड्याकडे पाने लहान होत जातात व फुलोऱ्यावर छदांसारखे काम करतात. पाने चिवट, खरबरीत परंतु खालच्या बाजूला लवदार असतात. त्यांवर सूक्ष्म, लालसर व ग्रंथियुक्त ठिपके असून कालांतराने ते काळे पडतात. जून ते ऑगस्ट महिन्यापासून फांद्यांच्या टोकांना २५–४० सेंमी. लांब आणि सु. ३० सेंमी. रुंद स्तबक फुलोऱ्यात पांढरी फुले येतात. फुले लहान, असंख्य, सुगंधी व द्विलिंगी असतात; अनेक फुले वंध्य असतात. फुले पुंपूर्व (प्रोटँड्रस) असतात, म्हणजे त्यांतील परागकोश हे कुक्षी पक्व होण्याच्या आधी पक्व होतात आणि फुले उमलताच परागकण गळून पडतात. परागण वारा आणि कीटक यांद्वारे होते. फळे आठळीयुक्त असून नोव्हेंबर–जानेवारी यादरम्यान गळून पडतात. ती कठीण, गोलसर, एका बाजूला टोकदार, १०–१५ मिमी. व्यासाची व चार कप्प्यांची असून त्याभोवती निदलपुंज फुग्यासारखा वाढलेला असतो. फलावरण नरम असून त्यांवर मऊ केसांचे आवरण असते. सामान्यपणे एका फळात ३-४ पांढऱ्या, स्वच्छ बिया असतात.
भारत आणि म्यानमार या देशांतील अनेक जुन्या इमारतींमधील सागाचे तुळया, खांब व जमीन (तक्तपोशी) अजूनही चांगल्या स्थितीत आहेत. काही राजवाडे, देवळे यांतील तुळया तर सु. १,००० वर्षांनंतरही उत्तम स्थितीत आहेत.
सागाच्या लाकडाचा पुरवठा करण्यात म्यानमार आघाडीवर असून त्याच्या खालोखाल इंडोनेशिया, भारत आणि थायलंड हे देश आहेत. भारतात साधारणत: केरळ, तमिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा, महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान, ओडिशा, मणिपूर या राज्यांत साग वृक्ष वाढतो. त्यांपैकी केरळ, तमिळनाडू, महाराष्ट्र, मध्य प्रदेश या राज्यांत त्याची लागवड केली जाते. इमारतीच्या लाकडासाठी या वृक्षाच्या खोडाचा भाग महत्त्वाचा असून त्याच्या आकारमानाला महत्त्व असते. कर्नाटकातील सागाच्या वृक्षांचा घेर इतर राज्यांतील वृक्षांच्या घेरापेक्षा अधिक असतो. टिकाऊपणा, आकार–स्थिरता, जलरोधकता आणि आकर्षकपणा अशा गुणधर्मांमुळे सागाचे लाकूड जगातील उत्कृष्ट लाकडांपैकी एक मानले जाते. त्याचे रसकाष्ठ (बाह्यकाष्ठ) पांढरट ते पिवळसर तपकिरी असते. ते अंत:काष्ठापासून सहज वेगळे करता येते. अंत:काष्ठ पिवळे असते आणि कालांतराने ते गडद होत जाते. ते कठीण व बळकट असते व त्यावरील वलये स्पष्ट दिसतात. काही वेळा त्यावर पट्टे असतात. नवीन कापलेल्या लाकडाला चामड्यासारखा गंध असतो.
सागाचा नैसर्गिक प्रसार त्याच्या बियांमुळे होतो. कठीण साल असल्याने सागाचे बी रुजण्याकरिता बी थंड पाण्यात भिजवून नंतर उन्हात सुकविणे असे वारंवार करतात. ही प्रक्रिया १०–१५ दिवस करतात आणि पीटवर वाळूचा थर देऊन पसरवून ठेवतात. १५–३० दिवसांत बिया अंकुरतात. जगात अनेक ठिकाणी सागाची कलमे बांधून सुधारित प्रकारचे खुंट तयार करून त्यांची लागवड करतात. आता ऊती संवर्धनाने सागाची रोपे तयार करतात.
सागाच्या लाकडातील तेलयुक्त पदार्थांचे लक्षणीय प्रमाण, लाकडाची ताण झेलण्याची क्षमता आणि कणांची घट्ट रचना यांमुळे सागाचे लाकूड वेगवेगळ्या हवामानात टिकून राहते. म्हणूनच नावा, जहाजे, लाकडी पूल, रेल्वेचे डब्बे आणि इतर वाहनांचे भाग, सजावटी सामान, कपाटे, शेतीची अवजारे इ. खुल्या हवेत वापरल्या जाणाऱ्या वस्तू सागाच्या लाकडापासून बनवितात. सागाच्या लाकडात सिलिका असल्याने त्यांपासून केलेल्या वस्तूंच्या कडा मऊ व बोथट करता येतात. भारतात घरे बांधताना खिडक्या व दारे यांच्या चौकटी, फर्निचर, खांब, तुळया यांसाठी अजूनही सागाचा वापर करतात. तसेच व्हायोलिन, सतार, हार्मोनियम बनविण्यासाठी सागाचे लाकूड वापरतात. प्लायवुड किंवा हार्डबोर्ड यांपासून बनविलेल्या वस्तू आकर्षित दिसण्यासाठी जे पृष्ठावरण (व्हिनिअर) चिकटवितात, तेही सागापासूनच मिळवितात. सागात काही औषधी गुणधर्म असून सागाची भुकटी त्वचेच्या दाहावर बाहेरून लावतात. फुले कडू असून ही पित्तविकार, खोकला यांवर देतात. फुले व बिया मूत्रल आहेत.