सुगंधी तेलासाठी प्रसिद्ध असलेला एक वृक्ष. हा वृक्ष सँटॅलेसी कुलातील असून जगभर चंदनाच्या साधारणपणे २५ जाती आहेत. हा मूळचा भारतीय वृक्ष असून भारत, चीन, श्रीलंका, मलेशिया, इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया ते हवाई बेटांमध्ये याची लागवड करण्यात आली आहे. भारतात, विशेषत: कर्नाटकात आणि तमिळनाडूत कोरडया भागात समुद्रसपाटीपासून सु. १,२०० मी. उंचीपर्यंत चंदन मोठया प्रमाणात आढळतो. राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश व ओडिशा या राज्यांमध्येही हा लागवडीखाली आहे; मात्र त्याचे लाकूड कमी प्रतीचे असते. भारतात चंदनाची सँटॅलम आल्बम ही जाती विपुल प्रमाणात आढळते.

चंदन (सँटॅलम आल्बम) : पानाफुलोऱ्यासहित फांदी

चंदन हा वृक्ष सदापर्णी असून ४ ते १५ मी. उंच वाढतो. फांदया बारीक व लोंबत्या असतात. साल लाल किंवा गडद राखाडी किंवा काळी व खरखरीत असून जुन्या झाडाच्या सालीवर उभ्या भेगा पडलेल्या दिसतात. पाने संयुक्त, अंडाकार, पातळ व समोरासमोर असतात. फुले लहान, गंधहीन व पिवळसर ते जांभळट लाल, पानांच्या बेचक्यात येतात. फळे आठळीयुक्त, गोलसर व गर्द जांभळी असतात. बिया गोलसर किंवा लांबट असतात. चंदनाचे झाड सु. १०० वर्षे जगते.

चंदनाच्या सर्व जाती अर्धोपजीवी आहेत. यांच्या मुळांच्या टोकाशी शोषकांगे असतात. त्यांदवारे ती इतर झाडांच्या (आश्रयी वनस्पती) मुळांच्या ऊतींमधील पोषकद्रव्ये (फॉस्फरस, नायट्रोजन आणि पोटॅशियमसारखी) मिळवितात. मात्र, त्यामुळे आश्रयी वनस्पतीला फार नुकसान पोहोचत नाही. चंदनासह इतर सु. ३०० वनस्पती चंदन वृक्षासाठी आश्रयी म्हणून उपयुक्त आहेत. ही वनस्पती लहान असताना रानात काही वेळा मुनव्यादवारा विस्तारत जाते.

चंदनाचे लाकूड आणि तेल यांचा फार पूर्वीपासून औषधात वापर होत आला आहे. चंदनाच्या तेलात ९०% सँटॅलॉल असते. त्यामुळे या तेलाला गंध आणि औषधी गुणधर्म प्राप्त झाले आहेत. लाकुड (मध्यकाष्ठ) गर्द पिंगट व सुगंधी असते. बाहेरचा भाग पिवळा असून आतील भाग पांढरा असतो व त्याला वास नसतो. साधारणत: वीस ते साठ वर्षांच्या झाडाच्या ४०‒६० सेंमी. व्यासाच्या खोडात भरपूर तेल असते. ते मिळविण्यासाठी झाड मुळापासून खणून काढतात. मुळांमध्येही तेल असते. चंदनाच्या लाकडाला वाळवी लागत नाही. त्यापासून कोरीव काम केलेल्या वस्तू बनवितात. झाडाची साल व रसकाष्ठ काढून सोटाचे लहान ओंडके करतात. लाकडाचा भुसा धुपाकरिता, कपडयात व कपाटात वासाकरिता ठेवतात. लाकडापासून मिळविलेले तेल फिकट पिवळसर असते. ते चिकट असून त्याला टिकाऊ गोड वास असल्यामुळे अत्तरे, सुगंधी तेले, सौंदर्यप्रसाधने, साबण इत्यादींसाठी मोठया प्रमाणात वापरतात. चंदनाचे लाकूड व तेल शीतल, ज्वरनाशक, मूत्रल, कफ काढून टाकणारे आहे. भाजलेल्या जागी, ताप आणि डोकेदुखीवर चंदनाचा लेप लावतात.

बियांपासून गर्द लाल तेल निघते. तेल त्वचारोगांवर तसेच लवकर वाळणाऱ्या व्हार्निशासाठी वापरतात. फळात अनेक शर्करा, बाष्पनशील आणि अबाष्पनशील तेले असतात. अबाष्पनशील तेल चिकट असते. ते परम्यावरील औषधात वापरतात.