(इंडियन रिव्हर टर्न). पक्षिवर्गाच्या कॅरॅड्रिफॉर्मिस गणाच्या लॅरिडी कुलाच्या स्टर्निडी उपकुलातील पक्ष्यांना इंग्लिश भाषेत ‘टर्न’ म्हणतात. जगात सुरय पक्ष्याच्या १२ प्रजाती असून त्यांपैकी अनेक जाती भारतात आढळतात. भारतात ठळकपणे स्टर्ना ऑरँशिया ही सुरय पक्ष्याची जाती आढळते. त्याला ‘नदी सुरय’, ‘नदी कुररी’ असेही म्हणतात. इराणपासून पूर्वेकडे पाकिस्तान, भारत, नेपाळ, बांगला देश, म्यानमार, थायलंड, चीन, व्हिएटनाम या देशांमध्ये हा पक्षी दिसून येतो. सामान्यपणे गोड्या पाण्याजवळ हा पक्षी आढळतो. मात्र क्वचितप्रसंगी खाडीजवळही तो दिसून येतो. नदी सुरय हा स्थानिक पक्षी असून स्थलांतर करत नाही. पुढील वर्णन नदी सुरय (स्टर्ना ऑरँशिया) या पक्ष्याचे आहे.

नदी सुरय (स्टर्ना ऑरेंशिया)

नदी सुरय हा पक्षी कबुतरापेक्षा सडपातळ असतो. त्याच्या शरीराची लांबी ३८–४३ सेंमी. असते. शरीराच्या पाठीकडचा भाग राखाडी, तर पोटाकडचा भाग पांढरा असतो. शेपटी दुभंगलेली असून एखाद्या लांब पताकेप्रमाणे असते. पंख लांब व टोकदार असून पंखांचा विस्तार ८०–८५ सेंमी. पर्यंत असतो. चोच लांब व पिवळी असते. पाय तांबडे असतात. विणीच्या काळात त्यांच्या डोक्यावरची, मानेच्या मागच्या भागापर्यंतची पिसे काळ्या रंगाची होतात. त्यामुळे हे पक्षी डोक्यावर टोपी घातल्याप्रमाणे भासतात. हिवाळ्यात ही पिसे करड्या पांढऱ्या रंगाची होतात. नर व मादी सारखेच दिसतात. लहान असताना सुरय पक्ष्यांचा रंग राखाडी करडा असतो आणि त्यांच्या टोकाला काळा ठिपका असतो.

नदी सुरय पक्ष्यांचा विणीचा हंगाम फेब्रुवारी–मे महिने असा असतो. या काळात ते समूहाने राहतात, परंतु यातील नर मादीबरोबर जोडीने वावरतात. सहसा हे पक्षी नद्यांच्या काठांवरील किंवा जलाशयांच्या प्रवाहातील वाळूत घरटी तयार करतात. जमीन खरवडून किंवा गवताखाली खड्डा तयार करून ते कपासारखे घरटे तयार करतात. दर वेळी मादी तीन अंडी घालते. अंडी हिरवट करड्या किंवा पिवळसर रंगाची असून त्यांवर फिकट तपकिरी ठिपके असतात. यांच्या सर्व जाती क्वचितच स्थलांतर करतात. विणीच्या हंगामानंतर ही पिले – लहान पक्षी – विखुरतात आणि जवळच्या नवीन प्रदेशात राहू लागतात.

नदी सुरय यांचे मुख्य खाद्य हे मासे असले तरी खेकडे, बेडकाचे डिंभ आणि पाणकीटक ते खातात. भक्ष्य पकडण्यापूर्वी पाण्यावर साधारणपणे ६–९ मी. अंतरावर ते घिरट्या घालत राहतात आणि मासा दिसला की, पाण्यात धाडकन बुडी मारून मासा पकडतात. भारतात नद्यांतील पाण्याच्या प्रदूषणामुळे या पक्ष्यांची संख्या कमी झालेली आहे. परंतु आयुयसीएन या संस्थेने अजून त्यांचा समावेश धोक्यात आलेल्या पक्ष्यांच्या गटात केलेला नाही.