(हार्ट डिसीज). शरीराच्या सर्व ऊतींना रक्तपुरवठा करण्यासाठी हृदय हे इंद्रिय अविरत कार्य करीत राहणे अत्यावश्यक असते. जगात सु. २५% पेक्षा अधिक मृत्यू हृदयविकारांमुळे होतात. हृदयविकारांचे सर्व प्रकार संसर्गजन्य नसले तरी ते जीवनशैलीशी आणि अन्य बाबींशी संबंधित असतात; वाढत्या वयाबरोबर हृदयविकार उद्भवू शकतात. विकसित देशांमध्ये हृदयविकारांमुळे होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण अधिक आढळते. हृदयविकारांचे वर्गीकरण शारीरिक रचनेनुसार केले जाते. त्यासंबंधी थोडक्यात माहिती पुढे दिलेली आहे –

हृदयधमनी विकार

(१) हृदयधमनी विकार : (कोरोनरी आर्टरी डिसीज). याला धमनीकाठिण्यता असेही म्हणतात. हा विकार धमन्यांच्या आतील बाजूला मेद, कॅल्श‍ियम, मृत पेशी इ.–याला प्लाग असे म्हणतात–पदार्थ साचून राहिल्याने उद्भवतो. त्यामुळे हृदयधमन्यांचा मार्ग अरुंद होतो आणि विकार तीव्र असल्यास हृदयाकडे जाणारा रक्तप्रवाह कमी होतो. हृदयधमनीचा संकोच खूप नसेल तर रुग्णाला कोणतीही लक्षणे जाणवत नाहीत; मात्र संकोच खूपच असल्यास व्यायाम करताना किंवा विश्रांती अवस्थेत छातीत दुखते किंवा धाप लागते. जेथे धमनीकाठिण्य झालेले असते, तेथील भाग फाटू शकतो. त्यामुळे आतील भाग रक्ताच्या संपर्कात येतो. या अवस्थेत तेथे गाठ किंवा गुठळी होऊन धमनीचा मार्ग बंद होतो आणि हृदयाच्या स्नायूंचा रक्तप्रवाहात अडथळा येऊन हृदयविकाराचा झटका येतो. अगदी वाईट परिस्थितीत रुग्णाला एकाएकी मृत्यू येतो. स्थूलता, उच्च रक्तदाब, अनियंत्रित मधुमेह, धूम्रपान आणि कोलेस्टेरॉलचे उच्च प्रमाण इ. कारणांमुळे हृदयधमनी विकार उद्भवतो.

(२) हृदय विराम : (हार्ट फेल्युअर). शरीराच्या गरजा भागविण्यासाठी आवश्यक असलेले रक्त हृदय जेव्हा पंप करू शकत नाही, अशा स्थितीला हृदय विराम म्हणतात. ज्यांना हा विकार असतो, अशा रुग्णांना झोपलेल्या स्थ‍ितीत दम लागतो, तसेच त्यांचा घोटा सुजतो. हृदयाच्या कार्यावर परिणाम करणाऱ्या अनेक विकारांचा शेवट हृदय विराम असतो; परंतु हा विकार सामान्यपणे हृदयधमनी विकार, हृदयाच्या झडपेचे रोग किंवा उच्च रक्तदाब यांच्याशी निगडीत असतो. ज्या रुग्णांच्या निलयाच्या भागातील स्नायू कमकुवत असतात त्यांच्यात हा विकार सहसा दिसून येतो; परंतु ज्या रुग्णांच्या हृदयाचे स्नायू मजबूत आणि कठीण असतात, त्यांनाही होतो. यामुळे डावे निलय, उजवे निलय किंवा दोन्ही निलय यांच्या कार्यावर परिणाम होऊ शकतो.

हृदयस्नायुविकार

(३) हृदयस्नायुविकार : (कार्डिओमायोपॅथी). या विकारामुळे हृदयाच्या स्नायूंवर वाईट परिणाम होतात. काही जणांमध्ये हृदयाचे स्नायू जाड होतात, तर काहींमध्ये हृदय विस्तारते आणि दुबळे होते. काही जणांमध्ये हृदयाचे स्नायू ताठर होतात आणि ते आकुंचनाच्या दरम्यान पूर्णपणे शिथिल होत नाहीत, तर काहींच्या हृदयाची लय अनियमित होते. हे विकार बहुधा आनुवंशिक असले, तरी मद्यपानामुळे हे विकार कधीकधी उद्भवतात. हृदयस्नायुविकारामुळे भविष्यात अनेकदा हृदय विराम उद्भवतो.

(४) हृदयाच्या झडपांचे रोग : (वॉल्व्हुलर हार्ट डिसीज). हृदयाच्या झडपा रक्त एकाच दिशेने वाहू देतात आणि उलट दिशेने रक्त वाहण्यापासून रोखतात. रोगग्रस्त हृदयाच्या झडपांची तोंडे अरुंद असू शकतात आणि म्हणून रक्ताचा प्रवाह पुढच्या दिशेने होण्यात अडथळा निर्माण करतात किंवा उलट दिशेने रक्ताची गळती होते. झडपांच्या विकारामुळे दम लागणे, अंधारी येणे किंवा छातीत दुखणे इ. बाबी संभावतात आणि नेहमीच्या परीक्षणात हृदयाचे आवाज वेगळे ऐकू येतात किंवा हृदयाची मर्मर ऐकू येते.

(५) हृदय लयहीनता : (हार्ट अरिथमिया). हृदयाच्या ठोक्यांमध्ये अनियमितपणा उद्भवल्यास हृदयाचे ठोके वेगाने किंवा हळू पडू लागतात. अशा विकाराला हृदय लयहीनता म्हणतात. कधीकधी हृदयाचे ठोके खूप वेगाने (मिनिटाला १०० पेक्षा जास्त) किंवा हळू (मिनिटाला ६० पेक्षाही कमी) पडतात. या विकाराची कोणतीही लक्षणे सहसा दिसून येत नाहीत किंवा लक्षणे दिसून आल्यास छातीची धडधड, छातीचे ठोके थोडा वेळ थांबणे अशी लक्षणे दिसतात. अधिक गंभीर स्थितीत रुग्णाला चक्कर आल्यासारखे वाटणे, मूर्च्छा येऊन पडणे, श्वास घेताना कष्ट पडणे किंवा छातीत कळा येणे इ. लक्षणे संभवतात. हृदय लयहीनतेचे अनेक प्रकार गंभीर नसले, तरी एखाद्या व्यक्तीला धक्का किंवा हृदय विराम स्थिती उद्भवू शकते. काही इतर कारणांमुळे अचानक मृत्यू संभवतो.

हृदयावरण विकार

(६) हृदयावरण विकार : (पेरीकार्डियल डिसीज). हृदयाभोवती असलेल्या दोन पदरी पिशवीला ‘हृदयावरण’ म्हणतात. या स्तरामध्ये जीवाणूंचे किंवा विषाणूंचे संक्रामण झाल्यास त्याचा दाह होतो. त्यामुळे छातीत दुखू लागून ती वेदना पाठीच्या भागात पोहोचते. काही वेळा या पोकळीत द्रव साचू लागतो. त्यामुळे किंवा दाहामुळे खोकला, छातीत बारीक दुखणे इ. लक्षणे जाणवतात. शस्त्रक्रियेने हा द्रव काढता येतो, परंतु द्रवाचे प्रमाण वाढल्यास हृदय वेगाने दाबले जाते (हृदय संपीडन). परिणामी दम लागतो आणि रक्तदाब इतका खाली घसरतो की प्रसंगी मृत्यू येऊ शकतो.

(७) जन्मजात हृदयविकार : (कंजेनायटल हार्ट डिसीज). काही व्यक्तींमध्ये जन्मापासूनच हृदयाचे दोष असतात. हे दोष काही किरकोळ असतात, तर काही गंभीर, जीवघेणे असतात. जसे हृदयातील दोन्ही भाग वेगळे ठेवणाऱ्या स्नायूंवर परिणाम होणे ‘हृदयाला छिद्र असणे’ हा एक सामान्य दोष आहे. इतर दोषांमध्ये हृदयाच्या झडपांवर किंवा हृदयापासून निघालेली मुख्य रक्तवाहिनी बाधित होणे, यांचा समावेश होतो. हृदयाचा अधिक भाग बाधित असल्यास त्यापासून जटिल लक्षणे उद्भवतात. हृदयाचे काही जन्मजात विकार असे असतात, ज्याद्वारे अल्प-ऑक्सिजनयुक्त रक्त, जे सहसा फुप्फुसाकडे येते, तसे न होता शरीराच्या वेगवेगळ्या भागांकडे पुन्हा पंप केले जाते. हा विकार गंभीर समजला जातो. जन्मजात हृदयविकार जन्मानंतर लगेच किंवा जन्म होण्याआधी जडतात. त्यामुळे दम लागतो आणि वाढ खुंटते; मात्र हे आजार अनेक वर्षे दिसून येत नाहीत आणि प्रौढ वयात उद्भवतात.

निदान : हृदयविकारांचे निदान रुग्णाचा वैद्यकीय इतिहास, हृदयाचे परीक्षण आणि आनुंषगिक तपासण्या जसे रक्तपरीक्षण, अल्ट्रासाउंड (इकोकार्डिओग्राम), हृदविद्युत लेख (ईसीजी) आणि किरणोत्सारी न्युक्लाइड प्रतिमाकरण यांच्या आधारे केले जाते.

परीक्षण : हृदयाचे प्राथमिक परीक्षण छातीला हात लावून आणि स्टेथॉस्कोपने आवाज ऐकून केले जाते. त्याचबरोबर नखांच्या खाली, सांधे किंवा इतर भागांमध्ये कोणते डाग आहेत का, ते पाहिले जाते. तसेच मनगटाजवळची धमनी हाताने हलकेच दाबून नाडीची लय आणि जोम पाहिला जातो, रक्तदाबमापीद्वारे (स्फिग्मोमॅनोमीटर) धमन्यांमधील रक्तदाब मोजतात आणि मानेच्या भागातील शीर फुगली आहे किंवा नाही, ते पाहतात.

हृदयाचा आवाज : हृदयाचे कार्य चालू असताना आणि रक्तप्रवाह वाहत असताना, हृदयाचे आवाज निर्माण होतात. खासकरून, जेव्हा हृदयाच्या झडपा बंद होतात तेव्हा हे आवाज होतात. स्टेथॉस्कोपच्या साहाय्याने हे एकमेव आणि विशिष्ट आवाज ऐकून हृदयाच्या स्थितीचा अंदाज घेतला जातो. निरोगी व्यक्तीमध्ये, हदयाच्या प्रत्येक ठोक्याला ‘लल्ब्ब’ आणि ‘डब्ब’ असे दोन आवाज ऐकू येतात. हे आवाज अनुक्रमे अलिंद-निलय झडप आणि अर्धचंद्राकृती झडप बंद होताना ऐकू येतात.

रक्तपरीक्षण : हृदयविकारांच्या अनेक विकारांवर उपचार करण्यासाठी रक्तपरीक्षण करतात. यातून हृदयाला अपुरा रक्तपुरवठा होत असल्याचे समजते, तसेच रुग्णाच्या रक्तातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण आणि मधुमेह यांची स्थिती समजते.

हृदयविद्युत्‌लेख (ईसीजी), अल्ट्रासाउंड (इकोकार्डिओग्राम), वाहिनीदर्शन (अँजिओग्राफी), संगणकीय छेदचित्रण (सीटी स्कॅन), चुंबकीय अनुस्पंदन प्रतिमाकरण (एमआरआय) आणि पीईटी (पॉझिट्रॉन उत्सर्जन छेदचित्रण; पॉझिट्रॉन इमिशन टोमोग्राफी; पेट) इ. तंत्रांद्वारे हृदयाच्या कार्याबद्दल माहिती समजते. उदा., ईसीजी तंत्रात शरीरावर इलेक्ट्रोड लावून हृदयाची विद्युत क्रियाशीलता जाणून घेतात. हृदयाच्या पेशी आकुंचित होतात, तेव्हा विद्युतप्रवाह निर्माण होऊन हृदयातून प्रवास करतो. हृदयाच्या लयबद्धतेत उद्भवलेला अडथळा शोधणे आणि हृदयाला होणारा रक्तपुरवठा शोधणे, यासाठी ही चाचणी उपयुक्त ठरते. इकोकार्डिओग्राम तंत्रात स्वनातीत तरंगांच्या (अल्ट्रासाउंड वेव्ज) साहाय्याने हृदयाचे परीक्षण केले जाते. याद्वारे हृदयाचे कार्य, झडपांचे विकार आणि इतर विकारांची माहिती कळते. अँजीओग्राफी तंत्राचा वापर करून शरीराच्या रक्तवाहिन्या आणि इंद्रिये, खासकरून धमन्या, शीरा आणि हृदयाचे कप्पे यांच्या आतील भागाचे चित्रीकरण करून तपासले जाते. या तंत्रात वर उल्लेख केलेल्या भागातील रक्तवाहिन्यांमध्ये विशिष्ट पदार्थ सोडून त्याच्या प्रवाहाचे अवलोकन केले जाते. सीटी स्कॅन तंत्रात, शरीराला छेद न देता शरीरातील आतील भागाच्या वेगवेगळ्या कोनांमधून प्रतिमा घेतात. एमआरआय तंत्राद्वारे, शरीराचे शरीररचनाशास्त्र आणि त्यांच्याशी संबंधित प्रक्रिया यांच्या प्रतिमा घेतात, तर पीईटी तंत्राद्वारे शरीरातील चयापचय क्रिया आणि इतर शरीरक्रियांची माहिती किरणोत्सारी पदार्थांचा वापर करून मिळवली जाते.

उपचार : हृदयसंबंधित धमन्या रुंद करण्यासाठी हृदयाच्या दोषांचे निदान करून त्यानुसार उपचार करतात, तसेच हृदयविकाराच्या लक्षणांवरदेखील उपचार करतात. विशेषकरून हृदयधमनी विकारांमुळे होणाऱ्या छातीतील कळा कमी करण्यासाठी (धमनीचा मार्ग जवळपास थांबला असता अथवा धमनीचा मार्ग बंद होऊ नये म्हणून), हृदयाच्या स्नायूंची हानी कमी करण्यासाठी अरुंद धमन्यांवर उपचार केले जातात. हृदयशूल (अँजायना) लक्षणे कमी व्हावीत म्हणून नायट्रोग्लिसरीन, रक्तदाब कमी करणारी औषधे, तसेच खबरदारीचे उपाय म्हणून ॲस्पिरीन किंवा स्टॅटिन देणे, धूम्रपान सोडणे, वजन कमी करणे, उच्च रक्तदाब आणि मधुमेह या रोगांवर उपचार केले जातात. औषधांखेरीज अरुंद झालेल्या धमन्या रुंद करण्यासाठी धातूची लहान स्प्रिंग किंवा तारेची जाळीदार नळी (स्टेंट) घालतात. स्टेंट अयोग्य वाटल्यास तेवढ्याच भागात शरीराच्या दुसऱ्या भागातील धमनीचा तुकडा काढून लावतात. याला बायपास सर्जरी म्हणतात. रोगग्रस्त झडपांवर इलाज करताना त्यांवर शस्त्रक्रिया केली जाते. हृदयाची लय नीट राहण्यासाठी औषधोपचार केले जातात. काही वेळा पेसमेकर हे उपकरण शरीरात बसवून हृदयाची लय योग्य राखण्याचा प्रयत्न केला जातो.

हृदयविकार ही संज्ञा हृदयाच्या धमनीतील अडथळ्यांमुळे निर्माण होणाऱ्या वेदनाजनक आणि अनेकदा मृत्यूकडे नेणाऱ्या परिस्थितीसाठी वापरली जाते. यामुळे सामान्यांच्या मनात हृदयविकारांबद्दल एक प्रकारची भीती असते. परंतु, हृदयाचे विकार वेगवेगळ्या प्रकारचे असतात. ते प्रत्येक वेळी गंभीर नसतात आणि योग्य जीवनशैली अंगिकारून टाळता येतात.