तोसी, मॉरिझिओ : (३१ मे १९४४–२४ फेब्रुवारी २०१७). विख्यात इटालियन पुरातत्त्वज्ञ. त्यांचा जन्म इटलीतील झेव्हिओ (व्हेरोना) येथे झाला. त्यांचे कुटुंब उच्चशिक्षित होते. ते मूळचे नापोलीचे (नेपल्स) होते. तोसींचे वडील फॅसिस्ट राजवटीत वरिष्ठ सरकारी अधिकारी होते. युद्धकाळात त्यांचे आईवडील उत्तर इटलीत अडकून पडले होते.
तोसी यांचे सर्व शिक्षण रोममध्ये झाले. त्यांनी रोम विद्यापीठातून मानवविद्या या विषयात एम.ए. पदवी मिळवली (१९६७). त्यांचे पुढील पदव्युत्तर शिक्षण तत्कालीन पूर्व जर्मनीत (German Democratic Republic) झाले. त्यानंतर त्यांना लंडन येथील इन्स्टिट्यूट ऑफ आर्किऑलॉजीत पदव्युत्तर शिष्यवृत्ती मिळाली. तसेच ते अमेरिकेत जाऊन रॉबर्ट ब्रेडवुड आणि रॉबर्ट मकॉर्मिक ॲडम्स अशा दिग्गज पुरातत्त्वज्ञांना भेटले.
तोसी मॅसॅच्युसेट्स येथील वेलस्ली कॉलेज (१९७८-७९), शिकागो विद्यापीठ (१९८७ आणि हार्वर्ड विद्यापीठ (२००२) येथे अभ्यागत प्राध्यापक होते. तसेच १९८६ ते १९८९ या काळात ते स्मिथसोनियन इन्स्टिट्यूशनमध्ये (वॉशिंग्टन डीसी) सहयोगी संशोधक होते. तोसींची नेपल्सच्या इस्टिट्युटो युनिव्हर्सिटारिओ ओरिएन्टाले येथे प्राध्यापक पदावर नेमणूक झाली (१९८१). ते या पदावर १९९४ पर्यंत होते. त्यांनी १९८९ ते १९९३ या काळात दिल्लीतील इटालियन वकिलातीत सांस्कृतिक प्रतिनिधी (Cultural attache) या पदावर काम केले. १९९४ ते २०१४ या काळात ते बोलोन्या विद्यापीठात पॅलिओएथ्नॉलॉजी (Palaeo-ethnology) अध्यासनावर प्राध्यापक होते. ओमानच्या संस्कृती व वारसा मंत्रालयाचे पुरातत्त्व सल्लागार म्हणून त्यांना २०११ मध्ये निमंत्रित करण्यात आले. ते अखेरपर्यंत या पदावर कार्यरत होते.
रोममधील इस्टिट्युटो इटालिआनो पर इल मेडीओ एड एस्ट्रिमो ओरिएन्टे (IsMEO) या संस्थेचे संचालक असलेल्या जेष्ठ पुरातत्त्वज्ञ जुसेप्पे तुच्ची यांनी तोसींवर इराणमधील संशोधनाची जबाबदारी टाकली. ती यशस्वीपणे पेलून तोसींनी १९६७ ते १९७६ या काळात इराणमधील सिस्तान भागात शहर-इ-शोख्ता (Shahr-i-Sokhta) या नागरी कांस्ययुगीन स्थळाचे उत्खनन केले. या स्थळावर तोसींनी पुरातत्त्वीय संशोधनाच्या आधुनिक पद्धतींचा वापर केला आणि सुमारे एक हजार वर्षांच्या (इ. स. पू. ३२०० ते २३५०) सांस्कृतिक इतिहासाचा यशस्वी मागोवा घेतला.
प्रागितिहासात गुंतागुंतीची सामाजिक रचना असलेल्या संस्कृतींचा विकास कसा झाला आणि ताम्रपाषाणयुगातील विविध संस्कृतीमध्ये परस्परसंबंध कसे होते, हा तोसींच्या अभ्यासाचा मध्यवर्ती भाग होता. त्यासाठी त्यांनी इराण, ट्युनिशिया, ओमान, येमेन, पाकिस्तान, भारत, उझबेकिस्तान, तुर्कमेनिस्तान, ताजिकीस्तान, कझाखस्तान, मंगोलिया, इजिप्त, मायदेश इटली आणि पेरू या देशांमध्ये अनेक संशोधन मोहिमा काढल्या आणि उत्खनने केली. उपग्रह दूरसंवेदन (Satellite Remote Sensing), जागतिक स्थाननिश्चिती प्रणाली (GPS) व भौगोलिक माहिती प्रणाली (GIS) अशा सन १९९० मध्ये पुरातत्त्वात नवीन असलेल्या तंत्रांचा वापर हे तोसींच्या संशोधनाचे वैशिष्ट्य होते.
तोसींनी १९६८ ते १९७० या काळात पेरूची राजधानी लिमापासून २५ किमी. अंतरावर असलेल्या कयामारक्विला (Cajamarquilla) या स्थळाचे उत्खनन केले. त्यांना स्पॅनिशांच्या आक्रमणापूर्वीच्या इ.स. ६०० ते ११०० या काळातील सांस्कृतिक इतिहासात रस होता. या काळाला पेरूच्या इतिहासात वारी साम्राज्याचा (Wari Empire) कालखंड असे म्हणतात. तोसींनी या काळातील प्रशासकीय व्यवस्थेचा पुरातत्त्वीय संशोधनातून मागोवा घेतला.
ओमानने १९७५ मध्ये आपला देश सांस्कृतिक अभ्यासासाठी परकीयांना खुला केल्यानंतर तोसींनी तेथे १९७५ ते १९८८ या काळात रास अल-हमरा, रास अल-जिंझ आणि रास अल-हाद या स्थळांचे उत्खनन केले. अरबस्तानातील प्रागितिहासाच्या अभ्यासाला चालना देण्याचे महत्त्वाचे कार्य त्यांनी केले. कांस्ययुगात अरबस्तानातील स्थानिकांचे मेसोपोटामिया, इराण व सिंधू संस्कृतीच्या लोकांशी संबंध कसे होते, याबद्दल त्यांनी मूलभूत संशोधन केले. तोसींना ओमानमधील उत्खननात नौकांना लावलेल्या डांबराचे (Bitumen) असंख्य तुकडे सापडले. मेसोपोटामियात वर्णन केलेल्या मगानमधील (प्राचीन ओमान) नौकांच्या पुनर्बांधणीचा एक प्रयोग त्यांनी २००० ते २००५ या दरम्यान ग्रेगरी पोशेल व टॉम व्होस्मर यांच्या सहकार्याने हाती घेतला होता.
ओमानमध्ये काम करत असताना तोसींना मध्य आशियातील पुरातत्त्वातही रस होता. ते पहिल्यांदा १९६९ मध्ये प्रथम सोविएत रशियात गेले होते. तेव्हापासून त्यांचे रशियन पुरातत्त्वज्ञांशी संबंध होते. तथापि भारतातून परतल्यावर १९९३ मध्ये त्यांनी रशियन पुरातत्त्वज्ञांशी अधिकृत सहकार्य करून मध्य आशियातील तुर्कमेनिस्तानात मुर्घाब नदीच्या पुरातत्त्वीय नकाशाच्या संशोधनासाठी आंतरराष्ट्रीय पुरातत्त्व मोहिमेचे आयोजन केले. विविध पुरातत्त्वीय वैज्ञानिकांचा समावेश असलेल्या (प्रस्तुत लेखकाचा त्यात सहभाग होता) या मोहिमेत आता वाळवंटी प्रदेश असलेल्या भागातील अल्टिन-डेपे, गोनूर-डेपे व ताहिरबाय-डेपे इत्यादी स्थळांवर सखोल संशोधन करण्यात आले. तोसींनी १९९९ मध्ये उझबेकीस्तानात समरकंद व झेरावशान नदीच्या खोऱ्यात आंतरराष्ट्रीय शोधमोहीम काढली. या संशोधनाचा मुख्य उद्देश शेतकरी व स्टेपी प्रदेशातील पशुपालकांमधील संबंध आणि त्यांच्यातील सामाजिक व राजकीय रचनांचा उदय शोधणे, हा होता. याच कामासाठी तोसींनी कझाखस्तानात २००१ मध्ये पुरातत्त्वीय प्रकल्प पूर्ण केला.
तोसींना नागरीकरण आणि राजकीय संरचनांचा उगम व विकास यामध्ये रस होता. प्राचीन काळात निर्माण झालेल्या सामाजिक व राजकीय संरचना आणि सांस्कृतिक प्रगती यासाठी राजा मध्यवर्ती असण्याच्या संकल्पनेला टोळ्या व जमातींमधील सहसंबंध हा पर्याय असू शकतो, असा त्यांचा सिद्धांत होता. त्यासाठी ते सतत जगभरात नवनवीन प्रकल्प हाती घेत असत. त्यांनी २०११ मध्ये अमेरिकेच्या इलिनॉय राज्यातील काहोकिया (Cahokia) या पुरातत्त्वीय स्थळाचा अभ्यास केला आणि संशोधन प्रकल्प सुरू केला. हे कोलंबसपूर्व अमेरिकेतील (इ.स. नववे ते चौदावे शतक) सर्वांत मोठे पुरातत्त्वीय स्थळ आहे. तोसींनी लोथल आणि सिंधू संस्कृतीच्या काळातील व्यापार यांचा सर्वांगीण शोध घेणारा एक प्रकल्प २०१२ मध्ये तयार केला होता; परंतु तो सुरू होऊ शकला नाही.
तोसी यांची कारकिर्द अनेक वळणे असणारी यशस्वी, तरीही त्यांच्या राजकीय मतांमुळे आणि वैयक्तिक आयुष्यातील गुंतागुंतीमुळे काहीशी वादळी होती. रोममध्ये शिकत असतानाच तोसी साम्यवादाकडे आकृष्ट झाले. आंतरराष्ट्रीय साम्यवादी चळवळीत सामील होऊन ते प्रशिक्षणासाठी क्युबा, बोलिव्हिया व पेरूत गेले होते. पूर्व जर्मनीत असताना तर तोसी हेरगिरीत सामील होते. त्यांचे या काळातील विचार आयुष्यभर त्यांच्यावर प्रभाव टाकत होते. त्यांची एक पत्नी सोव्हिएत रशियात राजकीय कोमिसार (Political Komissar) होती. सन १९८४ मध्ये अफगाणिस्तानात सोव्हिएत सैन्याच्या विरोधातील युद्ध ऐन भरात असताना तोसी पुरातत्त्वीय शोधमोहिमेच्या नावाखाली प्रत्यक्षात स्टिंगर क्षेपणास्त्रांची हरवलेली खोकी हुडकण्यासाठी अफगाणिस्तानात शिरले होते. आपले हेरगिरीच्या विश्वातील नाव ‘कोब्राʼ असल्याचे व आपण आता त्यातून बाहेर पडलो आहोत, असे तोसींनी आयुष्याच्या अखेरीस सांगितले होते. त्यांना त्यांचे वर्णन पुरातत्त्वज्ञ असे केलेले आवडत नसे. ‘मला मानवी मनाचा थांग लावायचा आहे. आपले मन नेहमी खुले असले पाहिजे. माझे चिकित्सक कुतूहल कायम ताजे असते आणि पुरातत्त्व हा त्या मानवी मनाच्या शोधाचा फक्त एक मार्ग आहे इतकेचʼ असे ते म्हणत असत. तोसींकडे कामाची प्रचंड ऊर्मी अखेरपर्यंत होती. पण आक्रमक आणि बेधडक स्वभावामुळे ते अनेकदा वादग्रस्त ठरत.
इटलीतील रव्हेना येथे त्यांचे निधन झाले.
संदर्भ :
- Frenez, Dennys & Cattani, ‘Maurizio, ‘Maurizio Tosi : 1944-2017ʼ, Proceedings of the Seminar for Arabian Studies, Vol. 47, pp. xxiii-xxviii, 2017. https://www.jstor.org/stable/45163442
- Lamberg-Karlovsky, C. C. & B. Genito Eds., My Life is like the Summer Rose’ Maurizio Tosi e l’Archeologia come modo di vivere, Papers in honour of Maurizio Tosi for his 70th birthday, BAR S2690, 2014.
- Lawler, Andrew, ‘Profile: Maurizio Tosiʼ, Science, 328: 1101, 2010.
समीक्षक : श्रीनंद बापट