उत्तर भारतातील शिव-पार्वतीच्या आसनमूर्तींत उमा-महेश्वरमूर्ती लोकप्रिय आहेत. दक्षिणेतही सुखासनमूर्ती, उमासहितमूर्ती, उमा-महेश्वर, सोमास्कंद या सर्व महत्त्वाच्या मानल्या जातात. मत्स्यपुराण, अपराजितपृच्छा या ग्रंथांत त्यांचे वर्णन आढळते. शिल्परत्नात सुखासनमूर्तीचे वर्णन पुढीलप्रमाणे केले आहे, ‘ही चतुर्भुज मूर्ती बैठ्या अवस्थेत असून अतिशय देखणी, रजोगुणयुक्त असावी. पोवळ्या लाल रंगाची ही मूर्ती भद्रपीठावर डावा पाय दुमडलेल्या व उजवा पाय खाली लोंबकळत असलेल्या अवस्थेत असावी. तिने व्याघ्रचर्म तसेच रेशमी वस्त्रे परिधान केलेली असावीत. मागच्या उजव्या व डाव्या हातात अनुक्रमे परशु व मृग असावेत, तर पुढचा उजवा हात अभयमुद्रेत आणि डावा हात वरद किंवा सिंहकर्णमुद्रेत असावा. जटामुकुट, यज्ञोपवीत, सर्पकंकणादी आभूषणे असावीत.ʼ अशा वर्णनात बसणाऱ्या शिवप्रतिमेला सुखासनमूर्ती म्हणतात.
![](https://marathivishwakosh.org/wp-content/uploads/2022/05/1.-उमामहेश्वर-300x178.jpeg?x35034)
देवीदेखील अशा प्रकारच्या प्रतिमेत त्याच आसनावर शिवासह स्थानापन्न झालेली असेल, तर ती उमासहितमूर्ती होय. देवी सहसा शिवाच्या डाव्या बाजूस असते. द्विभुज अशा पार्वतीने उजव्या हाती कमळ धारण केलेले असते; डावा हात सिंहकर्णमुद्रेत किंवा पीठावर सहजपणे ठेवलेला असतो. तिच्या मस्तकावर करंडमुकुट व अंगावर इतर आभूषणे असतात. अशा प्रकारे एकाच प्रभामंडळाखाली एकत्र बसलेली शिव-पार्वतीची मूर्ती ही ‘उमासहितमूर्ती’ म्हणून ओळखली जाते. सोमास्कंद मूर्तीदेखील अशाच प्रकारची शिव-पार्वतीची एकत्रित प्रतिमा असून त्यात व उमासहितमूर्तीत मुख्य फरक म्हणजे शिव आणि उमेच्या मध्ये बाळ कार्तिकेय दाखवितात. तो उभा, दोघांमध्ये पीठावर बसलेला किंवा उमेच्या मांडीवर बसलेला असतो. कधीकधी तो नृत्य करतानाही दाखवतात. अशावेळी कार्तिकेयाला एकच मुख, दोन डोळे व दोन बाहू दाखवतात. त्याने करंडमुकुट, नक्रकुंडले व इतर आभूषणे धारण केलेली असतात. उभ्या स्कंदाच्या उजव्या हातात कमळ व डावा हात सैल सोडलेला असतो. सहसा सोमास्कंद प्रकारची उभी मूर्ती आढळत नाही. महाबलिपुरम् येथील धर्मराजरथाच्या शिल्पात एक उत्तम सोमास्कंदमूर्ती आहे. येथे शिव-पार्वती दोघेही वामललितासनात बसलेले असून बाळ स्कंद पार्वतीच्या मांडीवर आहे. शिवाचा वरचा उजवा हात व खालच्या हाताचा पंजा नाहीसा झालेला असून वरचा डावा हात खांद्यास स्पर्श करीत आहे, तर खालचा, ध्यानमुद्रेत आहे. पार्वतीने उजव्या हाताने स्कंदास धरले असून डावा हात आसनावर ठेवलेला आहे. शिवाच्या मागे उजवीकडे ब्रह्मदेव आणि डावीकडे विष्णू आहेत. हात लांबवलेली व पाय किंचित उचललेली बाळ कार्तिकेयाची मूर्ती अत्यंत नैसर्गिक वाटते. वेरूळ येथील कैलास लेण्यात नंदीवर बसलेल्या सोमास्कंदाची मूर्ती आहे. शिव चतुर्भुज असून त्याच्या शेजारी पार्वती व तिच्या मांडीवर कार्तिकेय आहे.
उमा-महेश्वरमूर्तीबद्दल विष्णूधर्मोत्तर पुराण आणि रूपमंडन सविस्तर माहिती देतात. विष्णूधर्मोत्तर पुराणाच्या मते, शिव व उमा हे आलिंगनावस्थेत एका पीठावर बसलेले असावेत. शिव द्विभुज असून त्याच्या उजव्या हातात निलोत्पल (निळे कमळ) व डावा हात उमेच्या खांद्यावर असावा. डोक्यावर जटामुकुट व चंद्रकोर असावी. उमेचाही हात शिवाच्या अंगाभोवती असून डाव्या हातात आरसा धरलेला असावा. रूपमंडन ग्रंथाच्या मते, शिवप्रतिमा चतुर्भुज असावी; तिच्या वरच्या उजव्या हातात त्रिशूळ, खालच्या हातात म्हाळुंग (एक फळ), एका डाव्या हातात नाग व दुसरा पार्वतीच्या खांद्यावर असावा. ऐहोळे (कर्नाटक) येथील उत्तर चालुक्यकालीन शिल्पात शिव सव्यललितासनात बसलेला असून उजव्या हातात नाग आणि त्रिशूळ आहेत. खालच्या डाव्या हाताने पार्वतीस आलिंगन दिले आहे. पार्वतीचा उजवा हात शिवाच्या व डावा स्वतःच्या मांडीवर ठेवला आहे. सभोवार नंदी, भृंगी व इतर शिवगण आहेत.
![](https://marathivishwakosh.org/wp-content/uploads/2022/05/2.-somaskand-300x262.jpeg?x35034)
उमा-महेश्वरमूर्ती अत्यंत लोकप्रिय असल्यामुळे त्यात स्थलकालपरत्वे पुष्कळ वैविध्य आढळते. काही ठिकाणी शिव आणि पार्वती दोघांचेही हात एकमेकांच्या गळ्यात असतात, तर काही ठिकाणी पार्वतीचा केवळ उजवा हात शंकराच्या मांडीवर असतो. कधी पार्वती शिवाच्या मांडीवर बसलेली असते, तर कधी शेजारी. ‘हनुस्पर्श’ प्रकारात शंकर डाव्या हाताने पार्वतीला आलिंगन देतो आणि उजव्या हाताने तिच्या हनुवटीला स्पर्श करत असतो. गंगाधर शिव-पार्वतीच्या प्रतिमेत स्वर्गातून शंकराच्या मस्तकावर अवतरणारी गंगा व शेजारी पार्वती असे दृश्य आढळते. या प्रकारच्या प्रतिमा भारतात कमी असल्या, तरी नेपाळमध्ये मोठ्या प्रमाणावर आहेत. लिंगारूढ उमा-महेश्वर प्रतिमा मध्य भारतात सापडल्या आहेत. दक्षिण भारतात काही ठिकाणी उमेचे वाहन म्हणून गोधा (घोरपड) दाखवतात.
उमा-महेश्वरमूर्ती साधारणतः सातव्या-आठव्या शतकापासून तेराव्या शतकापर्यंत मोठ्या प्रमाणावर घडवलेल्या आढळून येतात. त्यासाठी स्थलकालपरत्वे बेसाल्ट, ग्रॅनाइट, वालुकाश्म, संगमरवर असे विविध प्रस्तर आणि पितळ, कांस्य व मिश्रधातूंचा वापर केलेला दिसून येतो.
उमामहेश्वरमूर्तीची काही निवडक उदाहरणे पुढीलप्रमाणे :
१. कुंभेश्वर, गौरिधारा (नेपाळ) येथील बाराव्या शतकातील उमामहेश्वराच्या मूर्ती उभयता चतुर्भुज आहेत.
२. नेपाळ येथीलच आणखी एका शिल्पात शंकर अठरा हातांचा असून पार्वती मात्र द्विभुज आहे. ही मूर्ती सध्या जर्मनीत आहे.
३. कनौज (उत्तर प्रदेश) येथील पुरातत्त्वीय वस्तुसंग्रहालयातील प्रतिहारकालीन मूर्ती. यात पार्वतीच्या मांडीवर बाळ स्कंदही असून ही मूर्ती बरीचशी भंगलेल्या अवस्थेत आहे.
४. उत्तर प्रदेशातील अलाहाबादजवळ येथील गुप्तकालीन मूर्ती. येथे शिव आणि पार्वती दोघेही द्विभुज असून पादपीठावर कुमारगुप्ताच्या काळातील लेख कोरला आहे.
५. पाटणा (बिहार) वस्तुसंग्रहालयात काही उमामहेश्वर प्रतिमा आहेत.
६. छत्तीसगढमध्ये मिळालेल्या काही मूर्तींमध्ये पार्वती चतुर्भुज आहे. अशी काही शिल्पे मल्हार संग्रहालय, बिलासपूर आणि आय. के. एस्. युनिव्हर्सिटी संग्रहालय, खैरागढ येथे आहेत.
७. गौरीशंकर मंदिर, भेडाघाट, मध्य प्रदेश येथे गौरीशंकर मंदिरात वृषभारूढ शिवपार्वती आहेत.
८. वृक्षाखाली बसलेले उमामहेश्वर या प्रकारची एक प्रतिमा भरतपूर, राजस्थान येथील संग्रहालयात असून एक इंदूरच्या संग्रहालयात आहे.
९. वाराणसी, खजुराहो या भागांमध्ये लिंगारूढ उमामहेश्वराच्या प्रतिमा प्रचारात असाव्यात. अशा प्रकारच्या प्रतिमा कोलकाता, वाराणसी (संस्कृत विश्वविद्यालय संग्रहालय), लखनऊ आणि अलाहाबाद येथील संग्रहालयात आहेत.
१०. मार्कण्डी (जि. गडचिरोली), महाराष्ट्र येथे एक सोमास्कंदाची प्रतिमा आहे. त्यात शिव आणि पार्वती हे एकाच आसनावर, पण वेगवेगळे बसलेले असून बाळ कार्तिकेय मध्ये उभा आहे.
११. वेरूळच्या कैलास लेण्यात, गाभाऱ्यासमोरील अंतराळाच्या दक्षिण भिंतीवर नंदीवर बसलेले सोमास्कंद शिल्प आहे.
१२. तंजावरच्या बृहदीश्वर मंदिरात एक उमामहेश्वर प्रतिमा आहे. तिचे आटपाडी (जि. सांगली) महाराष्ट्र येथील प्रतिमेशी बरेच साम्य आहे.
१३. मायावरम् (तमिळनाडू) येथील मयूरनाथस्वामी मंदिरात एक सुंदर उमामहेश्वर प्रतिमा आहे.
१४. कर्नाटकात अंगूर (जि. बळ्ळारी) आणि हवेरी (जि. धारवाड) येथे उमामहेश्वर प्रतिमा आहेत.
१५. ऐहोळे, कर्नाटक येथे एक उमामहेश्वर प्रतिमा आहे.
१६. त्रिवेंद्रम येथील कला विद्यालयात असलेली प्रतिमा हस्तिदंती असून शिवपार्वतीसह नंदी, बाल स्कंद व गणेश हेदेखील आहेत.
१७. महाबलिपुरम् येथील धर्मराज रथात सोमास्कंदाची उत्कृष्ट मूर्ती आहे.
उमा-महेश्वर प्रकारातील आणखी एक वैविध्य म्हणजे गौरीहर किंवा हरगौरी प्रतिमा. यात शिवाजवळ त्याचे वाहन नंदी आणि पार्वतीजवळ तिचे वाहन गोधा (घोरपड) दाखवतात. या गोधेबद्दल ‘गोधसना भवेद गोधा’ अर्थात गोधेवर आसनस्थ झालेली ती गौरी, असे म्हटले आहे. गौरीहर मूर्तीचे एक उत्तम उदाहरण म्हणजे निलंगा (जि. लातूर, महाराष्ट्र) येथील निळकंठेश्वर त्रिदल मंदिरात असलेली प्रतिमा. यात हर आणि गौरी वज्रपीठावर एकत्र बसलेले असून वर मकरतोरण आहे. हराच्या मागच्या दोन्ही हातांत त्रिशूळ, नाग असून पुढील उजव्या हातात अक्षमाला आहे व डावा हात पार्वतीच्या खांद्यावर आहे. गौरीनेही आपल्या उजव्या हाताने हरास आलिंगन दिलेले असून तिच्या डाव्या हातात बीजफल धारण केले आहे. शिवाजवळ शिवगण, मोरावर बसलेला कार्तिकेय आणि नंदी, तर गौरीच्या जवळ गणेश आणि तिचे वाहन गोधा आहेत. अशा प्रकारच्या मूर्ती राहेर (जि. नांदेड), वेळापूर (जि. सोलापूर), राजापूर (जि. हिंगोली), तसेच बदामी (जि. विजापूर) कर्नाटक येथे आढळतात.
संदर्भ :
- Rao, T. A. G., Elements of Hindu Iconography, Vol. II, Part I, Motilal Banarasidas Publishers Pvt. Ltd., Delhi, 1914; 1997.
- खरे, ग. ह., मूर्तिविज्ञान, भारत इतिहास संशोधक मंडळ, पुणे, १९३९; २०१२.
- जोशी, नी. पु., भारतीय मूर्तिशास्त्र, प्रसाद प्रकाशन, पुणे, १९७९; २०१३.
- देगलूरकर, गो. बं., शिवमूर्तये नम:, स्नेहल प्रकाशन, पुणे, २०१४.
समीक्षक : मंजिरी भालेराव